Bombay High Court Horse Trading: महाराष्ट्रातील चालू राजकीय उलथापालथीवर आणि लोकप्रतिनिधींच्या पक्षांतरावर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. एका आंदोलकाच्या तडीपारीच्या खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्तींनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर थेट भाष्य केले.
“सध्या संपूर्ण महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू आहे. तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत ना? मग तुम्हीही पक्ष बदलण्याचा विचार करा, तिथे एक वॉशिंग मशीन आहे,” अशी अत्यंत उपरोधिक आणि गंभीर टिप्पणी न्यायालयाने केली. कोर्टाच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने यावर तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे.
नेमके काय घडले? कोणत्या खटल्यात कोर्टाने सुनावले खडे बोल?
सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे (SDPI) राज्य सरचिटणीस सईद अहमद अब्दुल वाहीद चौधरी यांच्या तडीपारीच्या आदेशाविरोधात हायकोर्टात सुनावणी सुरू होती. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निदर्शने केल्याप्रकरणी त्यांच्यावर 5 गुन्हे दाखल करून त्यांना मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांतून 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती माधव जामदार यांनी सरकारला धारेवर धरले:
- आंदोलन करणे हा नागरिकांचा हक्क: केवळ केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली म्हणून कोणाला तडीपार कसे केले जाऊ शकते? नागरिक काय गुलाम आहेत का? असा संतप्त सवाल कोर्टाने विचारला.
- पेपर लीक आणि आंदोलने: देशात सध्या इतके पेपर लीक होत आहेत, त्यावर लोकांनी आवाज उठवला तर तुम्ही गुन्हे दाखल करणार का? ‘भाजप सरकार मुर्दाबाद’ किंवा ‘अमित शाह मुर्दाबाद’ अशा घोषणा देणे हा गुन्हा ठरत नाही, तो नागरिकांचा हक्क आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले.
“तिथे १० वर्षांचे मूल दगावले आणि विधानसभेत पक्षांतरावर चर्चा!”
न्यायालयाने विधिमंडळातील चर्चेच्या पातळीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती जामदार म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी एका अपघातात 10 वर्षांच्या निष्पाप बालकाचा मृत्यू झाला. त्यावर चर्चा करण्याऐवजी आमची विधानसभा कशावर चर्चा करत होती? तर पीठासीन अधिकाऱ्यांची निवड कशी झाली आणि त्यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कसे स्थलांतर केले. हे काय सुरू आहे?”
सईद चौधरी यांच्यावर २०१९ पासून सीएए (CAA), एनआरसी (NRC) आणि वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात निदर्शने आयोजित केल्याचे आणि ट्रॅफिक जाम केल्याचे आरोप होते. कोर्टाने ही तडीपारीची कारवाई चुकीच्या हेतूने प्रेरित असल्याचे सांगत तो संविधानाच्या कलम 14 आणि 21 चे उल्लंघन असल्याचे म्हटले.
खासदार फुटल्याच्या दुःखात असलेल्या ठाकरे गटाकडून कोर्टाचे आभार
लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आपल्या 9 पैकी 6 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओमप्रकाश राजेनिंबाळकर या ६ खासदारांच्या पक्षांतरानंतर ठाकरे गट कमालीचा आक्रमक आहे.
याच पार्श्वभूमीवर हायकोर्टाने ‘घोडेबाजार’ आणि ‘वॉशिंग मशीन’चा उल्लेख केल्यामुळे ठाकरे गटाने या विधानाचे स्वागत केले आहे. शिवसेना (UBT) नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी कोर्टाच्या या टिप्पणीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत “थँक्यू जस्टीस जामदार” म्हणत उच्च न्यायालयाचे जाहीर आभार मानले आहेत.










