Home / महाराष्ट्र / Devendra Fadnavis : बुडत्या बोटीमध्ये ते पाय ठेवणार नाहीत..देवेंद्र फडणवीसांनी ‘बुडत्या जहाजा’चा हवाला देत विरोधकांना डिवचलं..

Devendra Fadnavis : बुडत्या बोटीमध्ये ते पाय ठेवणार नाहीत..देवेंद्र फडणवीसांनी ‘बुडत्या जहाजा’चा हवाला देत विरोधकांना डिवचलं..

Devendra Fadnavis : देशातील तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या राजकीय...

By: Team Navakal
Devendra Fadnavis
Social + WhatsApp CTA

Devendra Fadnavis : देशातील तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या विशेष पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या या विलीनीकरणाच्या कथित दाव्यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी काँग्रेसवर कडाडून टीका करतानाच संजय राऊत यांना अत्यंत तिखट शब्दांत टोला लगावला.

“बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना”
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या संपूर्ण प्रकरणावर ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. जी व्यक्ती मूळ काँग्रेसची नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीही नाही, तीच व्यक्ती या विलीनीकरणावर सर्वात जास्त भाष्य करत आहे.”

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, विरोधी पक्षांचे नेते अत्यंत चतुर आणि राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आहेत; त्यामुळे काँग्रेससारख्या ‘बुडत्या जहाजात’ ते कधीही पाय ठेवणार नाहीत. राजकारणात अतिशयोक्तीपूर्ण बोलणे योग्य नसले, तरी समजा उद्या जर या पक्षांनी काँग्रेसमध्ये स्वतःचे विलीनीकरण केलेच, तर त्याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षालाच होईल. विरोधी पक्ष जेवढा मागे हटेल, तेवढी अतिरिक्त राजकीय जागा (पॉलिटिकल स्पेस) भाजपला उपलब्ध होईल. त्यामुळे या सर्व घडामोडींवर आम्ही सध्या केवळ ‘वेट अँड वॉच’ (प्रतीक्षा करा आणि पहा) या भूमिकेत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचा गौरव; ६ कोटी महिला होणार ‘लखपती’
केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले. गेल्या १२ वर्षांत केंद्र सरकारने देशात ‘३६० डिग्री’ म्हणजेच सर्वसमावेशक आणि क्रांतिकारी बदल घडवून आणल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे देशातील ३ कोटी महिला ‘लखपती दीदी’ झाल्या असून, आगामी काळात हा आकडा ६ कोटींवर नेण्याचा सरकारचा संकल्प आहे. तसेच, गेल्या १२ वर्षांत मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नसून, हे सरकार पूर्णपणे बेदाग राहिले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सरकारच्या प्रयत्नांमुळे देशातील २५ कोटी जनता गरिबीरेषेच्या बाहेर आली असून, त्यांना सन्मानाचे आयुष्य जगता यावे यासाठी मोफत अन्नधान्य योजना सातत्याने सुरू ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

४० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी; अर्थखात्याबाबत महत्त्वाचे विधान
राज्यातील शेतकरी आणि कृषी क्षेत्राविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी एका महत्त्वपूर्ण उपसमितीची (सबकमिटी) स्थापना करण्यात आल्याची माहिती दिली. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही कर्जमाफी करण्यात आलेली नाही, तर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने आतापर्यंत ४० लाख शेतकऱ्यांना कोणताही अडथळा न आणता कर्जमाफीचा थेट लाभ दिला आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपरिक सोयाबीन आणि कापसाच्या पीक पद्धतीमधून बाहेर पडून आधुनिक शेतीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. चालू हंगामाचा विचार करता शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पेरण्या कराव्यात, तसेच जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासू नये म्हणून सरकार लवकरच वैरण उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या