Devendra Fadnavis on Sunetra Pawar : “अजितदादांनी बारामतीकरांच्या प्रगतीसाठी जी स्वप्ने पाहिली होती, ती सत्यात उतरवण्याची पूर्ण क्षमता सुनेत्रा पवार यांच्यामध्ये आहे. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला केवळ एक लोकप्रतिनिधी नव्हे, तर एक अत्यंत सक्षम आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांचे कौतुक केले. मंगळवारी बारामती लोकसभेच्या पोटनिवडणुकीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या भव्य सांगता सभेत ते बोलत होते.
अनुभवी नेतृत्वाची ग्वाही-
आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा दाखला देत मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून मी सुनेत्रा वहिनींची कार्यपद्धती जवळून अनुभवली आहे. एखाद्या व्यक्तीमधील नेतृत्वाची गुणवैशिष्ट्ये ओळखण्याची पारख मला प्राप्त झाली असून, त्या आधारावर मी खात्रीने सांगू शकतो की, अजितदादांची स्वप्नं पूर्ण करण्याची सर्व क्षमता सुनेत्रा वहिनींमध्ये आहे. सुनेत्रा वहिनींमध्ये दीर्घ पल्ल्याचे राजकारण करण्याची मोठी क्षमता आहे. अजितदादांच्या अनुपस्थितीत त्यांनी केवळ कर्तव्याच्या भावनेतून नव्हे, तर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर ही धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली आहे.
विमान अपघाताच्या चौकशीचे आश्वासन-
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अत्यंत महत्त्वाचे विधान केले. “अजितदादांच्या अपघाताबाबत जनसामान्यांच्या मनात अनेक शंका-कुशंका आहेत. या अपघातामागील सत्य जोपर्यंत पूर्णपणे समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असा शब्द त्यांनी बारामतीकरांना दिला. या गूढ अपघाताचा छडा लावणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
बारामतीकरांना भावनिक आवाहन-
आजची ही सांगता सभा म्हणजे अजितदादांच्या स्मृतीचा एक पवित्र ‘यज्ञ’ आहे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, “दादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांनी सुरू ठेवलेला विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा वहिनींना विक्रमी मताधिक्याने विजयी करणे हीच खरी आदरांजली ठरेल.










