FDA Action: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाची धुरा हाती घेताच आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पदभार स्वीकारून अवघे काही दिवस झाले असतानाच त्यांनी राज्यातील प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या छुप्या धंद्यांवर सर्जिकल स्ट्राईक सुरू केला आहे.
गेल्या ६ दिवसांत एफडीएच्या पथकांनी संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 203 ठिकाणी धडक छापे टाकले आहेत. या धडक कारवाईमुळे बेकायदेशीरपणे अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आणि मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.
६ दिवसांतील कारवाईचा धडाका
तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर संपूर्ण राज्यातील यंत्रणा वेगाने कामाला लागली असून अवघ्या ६ दिवसांत मोठी कारवाई करण्यात आली आहे.
- १०२ आरोपींना अटक: या विशेष मोहिमेदरम्यान बेकायदेशीर साठा आणि विक्री प्रकरणी 102 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
- हॉटेल्स आणि दुकानांना टाळे: गुटखा विक्रीत सामील असलेल्या 68 नामांकित दुकानांवर आणि हॉटेल्सवर थेट कारवाई करत ती कायमची बंद करण्यात आली आहेत.
- धुळ्यात १८.५ लाखांचा मुद्देमाल जप्त: एफडीएच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर एक संशयास्पद वाहन अडवून तब्बल 18.5 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी राजस्थानचा रहिवासी असलेल्या सुरेश कुमार गोवारीया नावाच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांसाठी थेट तक्रार निवारण यंत्रणा
गेल्या काही महिन्यांत एफडीए विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनियमिततेचे आरोप झाले होते. हे पाहता राज्य सरकारने 25 मे रोजी तुकाराम मुंढे यांच्याकडे या विभागाची जबाबदारी सोपवली. प्रशासनात पारदर्शकता आणि कडक शिस्त आणण्यासाठी त्यांनी आता थेट जनतेची मदत घेण्याचे ठरवले आहे.
भेसळयुक्त अन्न, बनावट औषधे आणि प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीबाबत नागरिक आता थेट आयुक्तांकडे तक्रार करू शकतात. त्यासाठी विभागाने खालील अधिकृत संपर्क यंत्रणा जाहीर केली आहे:
- टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक: 1800-222-365
- अधिकृत ईमेल आयडी: jc-foodhq@gov.in
आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय नाही!
आपल्या कडक कार्यपद्धतीसाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावले उचलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही घटकाला सोडले जाणार नाही.
नागरिकांनीही आपल्या परिसरात चालणाऱ्या अशा बेकायदेशीर अन्न व औषध भेसळीच्या प्रकारांबद्दल न भीता प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा – LPG Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा वाढ; पाहा नवीन दर










