Elections : विधानपरिषद निवडणुकीत विजयासाठी 17 पैकी एकाही मतदारसंघात पुरेसे संख्याबळ नसताना मविआने निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी महायुतीविरोधात आव्हान उभे केले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 5 ठिकाणी मविआच्या उमेदवारांनी धक्कादायक माघार घेऊन महायुतीच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे 17 पैकी ठाणे, पुणे, कोकण, यवतमाळ, वर्धा, अहिल्यानगर या 6 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.निवडणूक होऊ न देता बिनविरोध जिंकायची, हे सूत्र गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात सत्ताधार्यांनी प्रचलित केले आहे. त्यानुसार महायुतीने विधान परिषदेची निवडणूकही एकतर्फी करण्यासाठी अखंड धावपळ केली. 6 ठिकाणी मविआला जोरदार धक्का दिला. यासाठी महायुतीने साम, दाम, दंड, भेद, अशा सगळ्याचा वापर केल्याचा आरोप मविआने केला आहे.
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संख्याबळ नसूनही मविआने महायुतीला आव्हान देण्याचा निर्णय घेतला होता. अनेक ठिकाणी महायुती आणि मविआ दोन्हींकडील काही बंडखोरही निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे निवडणुकीत काही प्रमाणात चुरस निर्माण झाली होती. परंतु आज अर्ज भरण्याची मुदत संपण्यापूर्वी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी चक्रे फिरवत अनेकांचे बंड थंड केले. शिवाय पडद्यामागून सूत्र हलवत मविआच्या उमेदवारांनाही माघार घ्यायला लावली. ठाणे, पुणे, कोकण, यवतमाळ, सोलापूर मतदारसंघात महायुती उमेदवारांविरोधात एकही उमेदवार रिंगणात उतरला नाही. मतदानाच्या आधीच या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
कोकण मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते खा. सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली होती. रायगड जिल्ह्यात तटकरे आणि शिंदेंचा गोगावले गट यांच्यात जुने वैर आहे. त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला शिंदे गटाकडून जोरदार विरोध झाला. शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी हिने अपक्ष अर्ज भरला होता. परंतु सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची मनधरणी करण्यात यश मिळवले. त्यामुळे ज्युईली दळवी यांनी काल आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, अनिकेत तटकरे यांना उबाठाच्या बाळ माने यांचे आव्हान कायम होते. तिथेही बाळ माने यांना आपल्या गोटात घेण्यात भाजपा यशस्वी झाली. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत बाळ माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. सूचक म्हणून माझ्या अर्जावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सह्या मिळाल्या नाहीत. मविआतील घटक पक्षाकडून मला कोणतीही साथ मिळाली नाही. त्यामुळे नाईलाजाने मला निर्णय घ्यावा लागला. शिवाय मला घोडे बाजार टाळायचा होता. त्यामुळेही मी या निवडणुकीतून माघार घेतली आहे, असे बाळ माने म्हणाले. परंतु या निर्णयानंतर नाराज झालेल्या उबाठाने ताबडतोब त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. याचा परिणाम असा झाला की, सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे बिनविरोध विधानपरिषदेवर निवडून गेले.
ठाण्यातही आज नाट्यमय घडामोड घडली. या मतदारसंघात शिंदे सेनेचे रवींद्र फाटक यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे अभिजीत पवार यांनी आव्हान दिले होते. ते फाटक यांच्या विरोधातील एकमेव उमेदवार होते. आज त्यांनी अचानक माघार घेतली. त्यांनी आपण वैयक्तिक कारणासाठी माघार घेत असल्याचे सांगितले. परंतु महायुतीकडे 790 आणि महायुतीकडे केवळ 130 मते होती. त्यामुळे त्यांनी माघार घेतली, असे म्हटले जात आहे.
पुणे मतदारसंघात भाजपातून ऐनवेळी अजित पवार गटात प्रवेश करून तिकीट मिळवलेले माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांच्या विरोधात भाजपाचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे बंडखोर सुनील टिंगरे यांनी उमेदवारी केली होती. या दोन्ही बंडखोरांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माघार घ्यायला लावली. या मतदारसंघात मविआकडून निवडणूक लढणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. संजय काकडे आणि सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांना फोन करून पाटील यांच्या माघारीची विनंती केली. त्यानंतर शरद पवार यांनी पाटील यांना अर्ज मागे घ्यायला लावला, असे म्हटले जात आहे. यामुळे विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली.
यवतमाळमध्ये शिंदे गटाचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्याविरोधात मविआचे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी माघार घेतली. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या फोटोवर नकली नोटांची उधळण केली. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार साजिद बेग आणि भाजपाचे बंडखोर उमेदवार नितीन भुतडा यांनीही अर्ज मागे घेतले.
चंद्रपूर मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचे व्याही आणि भाजपाचे उमेदवार अरुण लाखाणी यांच्याविरोधात काँग्रेसच्या शैलेशकुमार अग्रवाल यांनी माघार घेतली. त्यामुळे लाखाणी यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला.
अहिल्यानगरमध्ये शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली होती. परंतु त्यांनी अर्ज भरलाच नाही. आज सर्व अपक्षांनी माघार घेतल्याचे सांगण्यात आले. परंतु दत्तात्रय पानसरे या अपक्ष उमेदवाराने असा आरोप केला की, माझ्या परवानगी आणि सहीशिवाय माझा अर्ज मागे घेण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उबाठाच्या देवयानी डोणगावकर यांनी भाजपाच्या सुहास शिरसाट यांच्या विरोधात अर्ज भरला होता. त्यांनीही आज शेवटच्या दिवशी माघार घेतली. पक्षाकडे विनंती करूनच अर्ज मागे घेतला, अशी माहिती देवयानी यांचे पती कृष्णा डोणगावकरांनी दिली. त्यांनी असा आरोप केला की, देवयानी डोणगावकरांचा अर्ज दाखल केल्यानंतर गंगापूर साखर कारखान्याची समिती बरखास्त करण्याची मला नोटीस मिळाली. भाजपाने दबाव टाकण्यासाठी मला नोटीस पाठवली. मी त्या नोटिशीला घाबरत नाही. पण आहे ते घालवायचे नाही म्हणून माघार घेत आहे.
देवयानी डोणगावकर त्यांचा अर्ज माघार घेणार याची कुणकुण आधीच ठाकरे गटाला लागली होती. त्यामुळेच ठाकरे गटाकडून गणेश लोखंडे यांचाही अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला होता. देवयानी यांनी त्यांचा अर्ज माघार घेतल्यानंतर महाविकास आघाडीने गणेश लोखंडे यांना त्यांचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे, तर देवयानी व कृष्णा डोणगावकर यांची पक्षातून हकालपट्टी केली, याच मतदारसंघात शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी बंडखोरी केली होती. त्यांनीही आज माघार घेतली. समीर सत्तारांना आता जिल्हा बँकेवर संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती-संभाजीनगर-जालना, भंडारा-गोंदिया या मतदारसंघात मविआचा उमेदवारच रिंगणात नसल्याने इथली निवडणूक महायुतीसाठी एकतर्फी झाली आहे. तरीही 12 ठिकाणी निवडणूक होणार आहे.
पुणे विधान परिषदेसाठी 60 कोटींची
डील! रोहित पवारांचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या निवडणुकीसाठी 50 ते 60 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा केला. या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. रोहित पवार म्हणाले की, राज्यातील अनेक ठिकाणी उमेदवारीसाठी पैशांचे व्यवहार झाल्याची चर्चा आहे. पुण्यातील जागेसाठीही मोठी आर्थिक डील झाल्याची माहिती आहे. यासाठी 50 ते 60 कोटी रुपये देऊन उमेदवारी मिळाल्याची चर्चा आहे. पुण्यातल्या उमेदवारांना पैसे घेऊन उमेदवारी दिली. अनेक उमेदवार घाबरत आहेत, म्हणून माघार घेत आहेत. उमेदवार आपण सगळीकडे उभे केले आहेत.
मात्र भाजपा आणि महायुतीकडून पैशाचा मारा केला जात आहे. सोलापूरमध्येदेखील उमेदवाराला पैसे दिले. सरकार घोडा बाजार करत आहे. गलिच्छ पातळीवर राजकारण करत आहेत. भाजपा आणि मित्र पक्षांकडून करोड रुपये दिले जात आहे. राज्यात महायुतीने असे काही उमेदवार दिले आहेत. त्यांच्याकडे खूप पैसे आहेत. अनेक बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी दिली. या माणसाने अजित पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते, हे सगळे भयानक आहे. आमचे प्रामाणिक कार्यकर्ते लढायला
इच्छुक आहेत.
आमचा बाप काढला, शिवीगाळ केली
नाशिकमध्ये गोकुळ गीतेंची माघार नाहीच
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महायुतीने प्रतिष्ठा पणाला लावली पण याच ठिकाणी बंडखोरी झाली. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून ते अर्ज माघारीच्या अखेरच्या क्षणापर्यंत नाशिकमध्ये मोठे राजकीय नाट्य रंगले. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी फोनवरून शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करत भाजपाचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेल्या मनधरणीच्या प्रयत्नांनाही यश आले नाही. नाशिक विधान परिषद निवडणुकीची जागा शिंदे गटाच्या वाट्याला गेली असून नरेंद्र दराडे हे अधिकृत उमेदवार आहेत. पण जागावाटप होण्यापूर्वीच भाजपाचे नेते गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याचवेळी त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. गीते बंधूंनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, उदय सामंत तसेच महायुतीतील अन्य वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही यासंदर्भात चर्चा केली. या मध्यस्थीमुळे गणेश गीते यांनी अखेर माघार घेतली. गोकुळ गीते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. गोकुळ गीते यांच्या भावाने त्यांना फोन करून माघार घेण्याची विनंती केली. पण गोकुळ गीते यांनी आरोप केला की, कुणाल दराडे याने संपर्क साधून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. आमचा बाप काढला. अशा प्रकारची भाषा आणि दबाव टाकला जात असेल, तर मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. हा वाद मुंबईपर्यंत पोहोचल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले. त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नाशिकचे नेते निलेश बोरा हेही गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून होते. अर्ज माघारीच्या दिवशी निलेश बोरा आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात सातत्याने चर्चा सुरू होती. पण अर्ज मागे घेण्यासाठी अवघी 10 मिनिटे शिल्लक असतानाही गोकुळ गीते यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू होते. पण गोकुळ गीते यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.









