Girls Missing : आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी बेपत्ता होणार्या मुलांबाबत निर्माण झालेल्या भीतीबद्दल बोलताना म्हटले की, राज्यात मुली बेपत्ता होण्यामागे अपहरणापेक्षा प्रेमप्रकरणे सर्वात मोठे कारण आहे. तर मुलांमध्ये कौटुंबिक वाद हे घर सोडून जाण्याचे सर्वात मोठे कारण असल्याचे म्हटले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 2021 ते 2026 या कालावधीत राज्यात एकूण 2 लाख 34 हजार 811 महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली. त्यापैकी 2 लाख 17 हजार 758 महिला, म्हणजेच सुमारे 93 टक्के महिला शोधून त्यांच्या घरी पोहोचवण्यात आल्या आहेत. 2021 ते 2026 दरम्यान बेपत्ता झालेल्या मुलींच्या कारणांचा आढावा घेतला असता 46.32 टक्के प्रकरणात मुली या प्रेमप्रकरणातून घर सोडून गेल्याचे आढळले. 20 टक्के प्रकरणात मुली कौटुंबिक वादांमुळे पळाल्या, 2.81 टक्के मानसिक तणावामुळे, तर केवळ 5.25 टक्के प्रकरणांमध्ये अपहरण हे कारण आहे. मुलांच्या बाबतीत कारणांचे स्वरूप काहीसे वेगळे आहे. मुलांच्या बेपत्ता होण्यामागे 32 टक्के कौटुंबिक वाद, 9.12 टक्के प्रेमप्रकरणे, तर 4.47 टक्के अपहरण हे कारण आहे. ही आकडेवारी दिशाभूल करणारी वाटू शकते. मात्र बेपत्ता झालेल्यांपैकी मोठ्या प्रमाणावर व्यक्ती सुरक्षितपणे परत येत असल्याने समाजातील कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले की, दरवेळी आपला अंतिम आठवड्याचा प्रस्ताव कायदा आणि सुव्यवस्थेवर असतो. या सभागृहात अनेकवेळा चुकीचे आकडे दिले जातात. महाराष्ट्राच्या गुन्हेगारीची आकडेवारी जास्त आहे असे सांगितले जाते. क्राईम रेट प्रति एक लाख लोकसंख्येनुसार मोजायचा असतो. आपण आता देशात आपण 7 व्या क्रमांकावर आहोत. गुन्हेगारीत आपले राज्य पहिले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. महिलांच्या विरोधातील अपराधांमध्ये आपण 9 व्या क्रमांकावर आहोत. लहान बालकांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये आपण 7 व्या क्रमांकावर आहोत. बलात्काराच्या गुन्ह्यांत महाराष्ट्र 17 व्या क्रमांकावर आहे. मी कुठल्याही गोष्टीचे समर्थन करत नाही. पण महाराष्ट्र आजही सुरक्षित आहे. मे 2025 ते मे 2026 या कालावधीत विनयभंगाचे गुन्हे 374 ने कमी झाले, दुखापतीचे गुन्हे 187 ने, जबरी चोरीचे गुन्हे 271 ने, घरफोडीचे गुन्हे 295 ने, चोरीचे गुन्हे 394 ने कमी झाले. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही आता 82 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. पूर्वीदेखील गुन्हे घडत होते. पण समाजाच्या दबावाखाली गुन्हा नोंदवला जात नव्हता. आता गुन्हे नोंदवण्यात वाढ झाली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात 4,434 प्रकरणात ओळखीचे आरोपी आहेत. त्यात नातेवाईकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचा नवा नियम लागू करण्यात आला आहे. ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून हरवलेल्या 43 हजार 541 बालकांचा शोध लावला असून, त्यांना घरी पोहोचवले आहे. मात्र, पोलीस आपला तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करू शकतात. त्यानंतरचे काम न्यायव्यवस्थेचे आहे. सायबर गुन्ह्यांचा विचार केला तर, जून 2026 पर्यंत आपण 439 कोटी रुपयांची रक्कम गोठवण्याचे काम पोलिसांनी केले आहे. सायबर गुन्ह्यात 50 हजारांपेक्षा कमी रक्कम असेल तर तत्काळ आपण परतकेली जाते.
अंमली पदार्थांचा आंतरराष्ट्रीय तस्कर सलीम डोला आणि त्याच्या साथीदारांना अटक केली असून, त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय ड्रगच्या तस्करीची माहिती मिळाली आहे. त्यांची संपूर्ण लिंक मिळाली आहे. आरोपींकडून 256 कोटींचा माल जप्त केला आहे. ड्रग प्रकरणात दोषी आढळलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. 24 पोलिसांना निलंबित केले असून, त्यातील 18 पोलिसांना बडतर्फ केले आहेत. एमडी ड्रगमधील एक अमली पदार्थ विरोधी कायद्यामध्ये येत नव्हता. त्याचा अमली पदार्थांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. एनडीपीएसचे खटल्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करणार आहोत. त्यातील 4 मुंबईत, 1 ठाण्यात, 1 नागपूरला स्थापन करण्यात येणार आहे. पोलिसांना दिलेली घरे छोटी आहेत. आता अधिकारी व अमलदार यांच्यासाठी नवी गृहयोजना सुरू करणार आहोत. आम्ही भूखंड शोधले असून, त्यावर 40 हजार घरे बांधणार आहोत. पोलिसांसाठी 40 हजार शासकीय निवासस्थाने उभारणार आहोत. तसेच 93 सुसज्ज आणि नवी पोलीस ठाणी बांधण्यात येणार आहेत.
आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही. पण शेतकर्याला सावकाराकडे जावे लागू नये यासाठी ती केली जाते. कर्जमाफीसाठी आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो. कारण तोपर्यंत निवडणुका नाहीत. पण तरी आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला. आधीच्या ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील त्रुटी दूर करून सरकारने ही नवी योजना अधिक लवचिक बनवली आहे. आधीच्या योजनेत शेतकर्याची थकबाकी 2 लाख रुपयांपेक्षा केवळ 1 रुपया जरी जास्त असली, तरी त्याला कर्जमाफीचा लाभ मिळत नव्हता. मात्र, अहिल्यादेवी होळकर योजना या नव्या योजनेत ज्या शेतकर्यांची थकबाकी 2 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनाही सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. शेतकर्यांना सतत कर्जमाफी दिली तर बँका कोसळतील. त्यामुळे कर्जमाफी देताना शिस्त लावण्याची शेतकर्यांकडून थोडी रक्कम घ्यावी ही शिफारस परवीन परदेशी समितीने केली. तरीही आधीच्या योजनेचा फायदा घेतलेल्या शेतकर्यांनाही कर्जमाफी दिली जाईल. आधीच्या तीनपैकी दोन वर्षे ज्यांनी कर्जाचे हप्ते भरले त्यांना योजना लागू होईल. या योजनेमुळे केवळ 36 लाख शेतकर्यांवर अन्याय होईल आणि 12-13 हजार कोटींचाच लाभ मिळेल, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. ही योजना 56 लाख शेतकर्यांना तब्बल 36 हजार 585 कोटी रुपयांचा लाभ मिळवून देणारी ऐतिहासिक योजना आहे. शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या व्यतिरिक्त दरवर्षी 25,000 कोटी रुपयांची वीजमाफीही आपण देतो. हे पैसे भरावे लागतात, हे माफ होत नाहीत.
अजित पवार यांच्या पुण्यतिथीआधी रिपोर्ट
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासाबाबत फडणवीस म्हणाले की, या प्रकरणाचा दोन प्रकारे तपास सुरू आहे. एक तपास सीआयडी आणि दुसरा एएआयबी करत आहे. आपण सीबीआयलाही विचारले होते की, याचा तपास तुम्ही का घेत नाही? त्यावर त्यांनी सांगितले की, एएआयबीचा रिपोर्ट आल्याशिवाय आम्हाला त्यात हस्तक्षेप करता येणार नाही. आतापर्यंत सीआयडीने जो तपास केला आहे, त्यात वेगवेगळ्या गोष्टींसोबत पायलट सुमित कपूर यांच्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यांचे बँक खाते, गुंतवणूक हे सगळे तपासले असून, त्यात काहीही संशयास्पद आढळून आले नाही. मिळालेल्या फुटेजचे विश्लेषण करण्यात आले आहे. एएआयबीचा रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याची माहिती घेतली आहे. उपकरणांतून सगळी माहिती डाऊनलोड करण्यात आली आहे. अहवाल एका वर्षात मिळण्याची अपेक्षा आहे. अजित पवार यांच्या पुण्यतिथीआधी एएआयबी रिपोर्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे.










