Vidhan Parishad Election 2026 : राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस आहे. दुपारी ३:०० वाजता ही मुदत संपत असल्याने राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून रविवारी रात्री झालेल्या मॅरेथॉन बैठकीत विक्रम काकडे यांचे नाव निश्चित झाल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, आज सोमवारची सकाळ उजाडली तरी त्यांच्यापर्यंत पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ (AB Form) न पोहोचल्यामुळे या जागेभोवतीचा सस्पेन्स अधिकच वाढला होता. या पार्श्वभूमीवर, आता खुद्द विक्रम काकडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि महायुतीचे अनेक ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पुण्यातील ‘जिजाई’ या निवासस्थानी दाखल झाले असून, गेल्या एक तासापासून येथे अत्यंत महत्त्वाची खलबतं सुरू आहेत.
’जिजाई’ बंगल्यावर दिग्गज नेत्यांची मांदियाळी-
उमेदवारीचा हा अत्यंत क्लिष्ट झालेला पेच सोडवण्यासाठी ‘जिजाई’ निवासस्थानी सध्या सुरू असलेल्या या हायव्होल्टेज बैठकीला पवार कुटुंबासह राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. यामध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह राज्याचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार संजय काकडे हे तातडीने या बैठकीसाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबतच आमदार सुनील शेळके, आमदार अनिल पाटील, आमदार शंकर मांडेकर, आमदार चेतन तुपे, माजी आमदार विलास लांडे आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. पुणे विधानपरिषदेची अधिकृत उमेदवारी विक्रम काकडे यांनाच द्यायची की ऐनवेळी दुसरा एखादा अनपेक्षित राजकीय निर्णय घ्यायचा, यावर या बंद दाराआड होणाऱ्या बैठकीत सखोल मंथन सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
रात्री नाव निश्चित होऊनही सकाळी ‘एबी फॉर्म’ का रखडला?
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील या जागेवर हक्क सांगण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक स्थानिक आणि ज्येष्ठ नेते प्रचंड इच्छुक होते. ही जागा कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीकडेच राहावी, असा स्थानिक नेत्यांचा आग्रह होता. दुसरीकडे, महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या भाजपचाही या जागेवर डोळा होता.
अखेर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोननंतर महायुतीत या जागेवरील राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा निश्चित झाला. मुख्यमंत्र्यांनी माजी खासदार संजय काकडे यांचे सुपुत्र विक्रम काकडे यांच्या नावाला ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यानंतर रविवारी रात्री ८:३० ते मध्यरात्री १:३० वाजेपर्यंत तब्बल पाच तास चाललेल्या बैठकीत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात होते. मात्र, आज सकाळी ऐनवेळी अधिकृत ‘एबी फॉर्म’ न मिळाल्याने विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवर तात्पुरते प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले. आज दुपारी ३:०० वाजेपर्यंतच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द करण्याची अंतिम मुदत आहे. वेळेची ही मर्यादा लक्षात घेता ‘जिजाई’ बंगल्यावरील या बैठकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.










