Jai Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी आज पहिल्यांदा बारामतीत ‘जनता दरबार’ आयोजित केला. या दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी जय पवार यांनी म्हटले की 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील. यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. जय पवार यांनी आईच्या प्रचारावेळी पुढची आमदारकीची निवडणूक मी लढवणार असे म्हटले आणि खळबळ माजली.
जय पवार म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आमची सहकार्यांसोबत चर्चा झाली. सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की, दादांना एकदा मुख्यमंत्री पाहायचे आहे. आता वहिनीदेखील खूप कष्ट घेत आहेत, मला वाटते की, 2029 मध्ये बारामतीतून विधानसभेला वहिनीच उभ्या राहतील आणि आमची सर्वांची आशा आहे की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून जागा घ्यायला हवी.
दरम्यान, जय पवार यांनी आज बारामतीत घेतलेल्या पहिल्याच दरबारात विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक तक्रारी घेऊन आले होते. त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. जय पवार यांनी त्यांच्या तक्रारी केवळ ऐकून घेतल्या नाहीत, तर तत्काळ संबंधित विभागांच्या अधिकार्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत अनेक प्रश्न मार्गी लावले. प्रशासकीय दिरंगाई कमी करून नागरिकांना त्वरित दिलासा देण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीचे उपस्थितांनी कौतुक केले. नागरिकांच्या समस्या सातत्याने सोडवण्यासाठी दर आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी जनता दरबार आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही जय पवार यांनी केली. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी जय पवार यांचे नाव चर्चेत असतानाच त्यांनी जनता दरबार सुरू केल्याने त्यावरून ते राज्यसभेचे खासदार बनण्यास उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेच्या खासदारकीसाठी तुमचे नाव चर्चेत आहे, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी उत्तर दिले की, चर्चा होत आहे. पण माझी तशी इच्छा नाही. मी इथेच सर्वांसाठी काम करेन.









