Home / महाराष्ट्र / KEM Hospital : साध्या वेशातील आरोग्य समिती अध्यक्षांनाच प्रवेश प्रक्रियेसाठी अडीच तास लावले, मुजोर डॉक्टरांनी दिली उद्धट उत्तरे-केईएम रुग्णालयात मध्यरात्री झालेल्या धाडसी कारवाईने पालिका वर्तुळात मोठी खळबळ..

KEM Hospital : साध्या वेशातील आरोग्य समिती अध्यक्षांनाच प्रवेश प्रक्रियेसाठी अडीच तास लावले, मुजोर डॉक्टरांनी दिली उद्धट उत्तरे-केईएम रुग्णालयात मध्यरात्री झालेल्या धाडसी कारवाईने पालिका वर्तुळात मोठी खळबळ..

KEM Hospital : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या परळ येथील प्रसिद्ध केईएम (KEM) रुग्णालयातील अत्यंत ढिसाळ, बेजबाबदार आणि...

By: Team Navakal
KEM Hospital
Social + WhatsApp CTA

KEM Hospital : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या परळ येथील प्रसिद्ध केईएम (KEM) रुग्णालयातील अत्यंत ढिसाळ, बेजबाबदार आणि संतापजनक कारभाराचा पर्दाफाश खुद्द मनपाच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षांनीच केला आहे. भाजपचे प्रभाद क्र. १६४ चे नगरसेवक आणि पालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास सामान्य नागरिकाचे वेशांतर करून रुग्णालयात अचानक धाड टाकली. या धाडसी पाहणीदरम्यान रुग्णालयातील आपत्कालीन (कॅज्युअल्टी) विभागातील उपचारांमधील भयानक विलंब, कर्तव्यावर असताना डॉक्टरांची असलेली अनुपस्थिती आणि रुग्णांच्या हताश नातेवाईकांशी होणारे अरेरावीचे वर्तन अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

साध्या वेशातील अध्यक्षांनाही प्रवेश प्रक्रियेसाठी लागले अडीच तास!
या खळबळजनक कारवाईबाबत सविस्तर माहिती देताना आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी सांगितले की, “मी एका गरजू रुग्णाला सकाळी ११ वाजता उपचारांसाठी केईएम रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी विभागात पाठवले होते. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रात्री १०:३० वाजेपर्यंत, म्हणजेच तब्बल साडेअकरा तास उलटूनही त्या रुग्णाची साधी प्रवेश (Admission) प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती. रुग्णालयाची नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी कोणत्याही सुरक्षेशिवाय, वेशांतर करून स्वतः सामान्य नागरिकाप्रमाणे तिथे गेलो. तेथील अकार्यक्षमतेचा फटका मलाही बसला आणि ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मला स्वतःला तब्बल अडीच तास ताटकळत उभे राहावे लागले.”

भांदिर्गे यांनी पुढे सांगितले की, या पाहणीदरम्यान आपत्कालीन विभागात अनेक डॉक्टर आपल्या जागेवर हजर नव्हते. धक्कादायक बाब म्हणजे, तेथील काही मुजोर अधिकाऱ्यांनी ‘आम्ही आमदार असो किंवा खासदार, कोणाचेही फोन घेत नाही’ अशी उद्धट उत्तरे दिली. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

विद्यार्थिनींच्या जेवणात अळ्या; एफडीएकडून केईएमचे कॅन्टीन तात्काळ बंद-
रुग्णालयातील वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडालेला असतानाच, केईएम रुग्णालयाच्या परिचारिका वसतिगृहातील (Nurses Hostel) कॅन्टीनच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचाही गंभीर प्रश्न समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आज या कॅन्टीनवर मोठी कारवाई केली. प्रशिक्षणार्थी परिचारिका विद्यार्थिनींना देण्यात आलेल्या छोले-भाताच्या जेवणात जिवंत अळ्या आढळून आल्याने वसतिगृहात एकच खळबळ उडाली होती. या गंभीर घटनेची दखल घेत ‘एफडीए’च्या पथकाने तात्काळ कॅन्टीनची तपासणी केली आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅन्टीनचे कामकाज तातडीने बंद करण्याची नोटीस बजावली. तसेच, संबंधित अन्न पुरवठादाराचा परवानाही निलंबित करण्यात आला आहे.

नव्या अग्रवाल रुग्णालयात माजी महापौर किशोरी पेडणेकर ताटकळल्या
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील अनागोंदीचा फटका केवळ केईएम रुग्णालयापुरता मर्यादित नसून, मुलुंड येथील नव्याने उभारण्यात आलेल्या अग्रवाल रुग्णालयातही असाच अनुभव आला. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या रुग्णालयाची अचानक पाहणी केली. या पाहणीदरम्यान रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहाचे मुख्य प्रवेशद्वार कुलूप बंद असल्याने, विरोधी पक्षनेत्यांना तब्बल १५ मिनिटे तिथे ताटकळत उभे राहावे लागले.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या