Home / महाराष्ट्र / Vidhan Parishad Election 2026 : वरिष्ठांचे फोन, मनधरणी अन् थेट मोठ्या ऑफर-‘या’ बड्या नेत्यांनी घेतली माघार; तुमच्या जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय चित्र एका क्लिकवर!

Vidhan Parishad Election 2026 : वरिष्ठांचे फोन, मनधरणी अन् थेट मोठ्या ऑफर-‘या’ बड्या नेत्यांनी घेतली माघार; तुमच्या जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय चित्र एका क्लिकवर!

Vidhan Parishad Election 2026 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीने आता अत्यंत चुरशीचे वळण...

By: Team Navakal
Vidhan Parishad Election 2026
Social + WhatsApp CTA

Vidhan Parishad Election 2026 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीने आता अत्यंत चुरशीचे वळण घेतले आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष दुपारी ३ वागाडेकडे लागले आहे. ३ वाजेनंतर निवडणुकीच्या रिंगणात नेमके कोण उरणार आणि कोणाची माघार होणार, याचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांना मोठ्या प्रमाणावर बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी आणि पक्षांतर्गत वाद शमवण्यासाठी गेल्या २४ तासांपासून सर्वपक्षीय नेत्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काही बंडखोर उमेदवारांनी पक्षाच्या आदेशाचा मान राखत माघार घेण्याची तयारी दर्शवली असली, तर अनेकांनी आपले मोबाईल बंद ठेवून निवडणुकीच्या मैदानातून हटणार नसल्याचे संकेत दिले आहेत. या बंडखोरीमुळे सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली असून, विशेषतः या निवडणुकीत आपले पारडे जड असल्याचा दावा करणाऱ्या सत्ताधारी ‘महायुती’समोर बंडखोरांना शांत करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील या बंडखोरीचे आणि राजकीय घडामोडींचे सविस्तर वृत्त खालीलप्रमाणे:

नांदेड: माजी आमदारांची माघार, काँग्रेसची अधिकृत उमेदवारी कायम
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला बंडखोरी रोखण्यात यश आले आहे. काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाचा मान राखत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून जवळगावकर यांच्यासह रामदास पाटील सुमठाणकर यांनीही अर्ज दाखल केला होता, ज्यामुळे पक्षांतर्गत पेच निर्माण झाला होता. मात्र, जवळगावकर यांनी माघार घेतल्याने आता सुमठाणकर यांची पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी कायम राहिली आहे. “पक्षादेशाचा आदर करून मी माझा अर्ज मागे घेतला असून, आता काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला विजयी करण्यासाठी संपूर्ण ताकदीने काम करणार आहे,” अशी प्रतिक्रिया माधवराव पाटील जवळगावकर यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर दिली.

सांगली-सातारा: शिवसेना आणि काँग्रेसच्या बंडखोरांवर नेत्यांची नजर
सांगली-सातारा मतदारसंघामध्येही राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील हे बंडखोरीच्या पवित्र्यात होते. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीनंतर ते दुपारी ३ वाजेपूर्वी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांनी मात्र अद्याप नमते घेतलेले नाही; पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून थेट आदेश आल्यावरच पुढील निर्णय घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याच मतदारसंघात महाविकास आघाडीत सामील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातही संभ्रम असून, अभयसिंह जगताप की बाळासाहेब पाटील यांपैकी कोण माघार घेणार, यावर वरिष्ठ नेत्यांमध्ये गुप्त खलबते सुरू आहेत.

जळगाव: बंडखोर उमेदवार ‘सहली’वर; मंत्री गिरीश महाजन मैदानाात
जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण सर्वाधिक तापले आहे. येथे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही सत्ताधारी पक्षांतील स्थानिक नेत्यांनी बंड पुकारले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या दोन तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तीन नेत्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे, शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार आणि जिल्हाप्रमुख रेश्मा काळे या पक्षातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन अज्ञात स्थळी ‘सहली’वर रवाना झाल्या आहेत. जळगावमधील ही बंडखोरी मिटवण्यासाठी भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकचा आपला दौरा अर्धवट सोडून तातडीने जळगावकडे धाव घेतली आहे. अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांची मनधरणी करून त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी महाजन स्वतः मैदानात उतरले आहेत.

यवतमाळ: महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराची नाट्यमय माघार
यवतमाळ मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मविआचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी नाट्यमयरित्या आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अधिकृत उमेदवारानेच माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली असून, तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत. या घडामोडींनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला बाळासाहेब मांगुळकर, राहुल ठाकरे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांच्यासह मविआचे अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत. ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही, अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली असून, रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार फारूक सय्यद यांना मविआकडून पुरस्कृत उमेदवार जाहीर करण्याबाबत या बैठकीत चाचपणी सुरू आहे.

ठाणे: रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवडीची शक्यता
ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सत्ताधारी महायुतीसाठी अत्यंत दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. या ठिकाणी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना (शिंदे गट) उमेदवार रवींद्र फाटक यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अभिजीत पवार यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, अभिजीत पवार यांनी अचानक वैयक्तिक कारणांचे दाखला देत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. ते फाटक यांच्या विरोधातील एकमेव प्रमुख उमेदवार असल्याने आता रवींद्र फाटक यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. हालांकि, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून याबाबतची अधिकृत घोषणा दुपारनंतर केली जाईल.

अहिल्यानगर: अपक्ष उमेदवार ‘नॉट रिचेबल’; भाजपचे प्रयत्न पणाला
अहिल्यानगर (अहमदनगर) विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. येथील अपक्ष उमेदवार करण ससाणे हे अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. ससाणे हे श्रीरामपूर नगरपालिकेचे काँग्रेसचे विद्यमान नगराध्यक्ष आहेत. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर एकमत न झाल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकला होता. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्राजक्त तनपुरे रिंगणात असून, त्यांच्या व्यतिरिक्त करण ससाणे, दत्ता पानसरे, मच्छिंद्र धुमाळ आणि कमलेश गांधी हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात होते; मात्र करण ससाणे हे सकाळपासून कोणाच्याही संपर्कात नसल्याने आणि त्यांचा फोन बंद असल्याने राजकीय वर्तुळात चुरस आणि उत्सुकता दोन्ही वाढली आहे. दुपारी ३ वाजेची वेळ संपल्यानंतरच राज्यातील सर्व १७ जागांचे वास्तविक चित्र आणि बंडखोरांचा अंतिम पवित्रा स्पष्ट होणार आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या