Home / महाराष्ट्र / Manoj Jarange Patil : उष्माघाताने मेलो तर मरेन, पण मागे हटणार नाही…; मनोज जरांगे पाटील यांचा थेट इशारा,”माझ्या जीवाला बरं-वाईट झाल्यास सरकारच जबाबदार!

Manoj Jarange Patil : उष्माघाताने मेलो तर मरेन, पण मागे हटणार नाही…; मनोज जरांगे पाटील यांचा थेट इशारा,”माझ्या जीवाला बरं-वाईट झाल्यास सरकारच जबाबदार!

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात रान उठवणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात शड्डू...

By: Team Navakal
Manoj Jarange Patil
Social + WhatsApp CTA

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात रान उठवणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात शड्डू ठोकला आहे. सातत्याने दिलेल्या मुदतीनंतरही ठोस निर्णय होत नसल्याने संतापलेल्या जरांगे यांनी आता ‘आरपार’च्या लढाईची घोषणा केली असून, ३० मे पासून अत्यंत कठोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळचे उपोषण ऐतिहासिक आणि देशात कधीही झाले नसेल इतके टोकाचे असेल, असा इशारा त्यांनी दिला असून या आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषद घेत आपल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. यावेळी त्यांच्या बोलण्यातून सरकारप्रती असलेला प्रचंड उद्वेग आणि संताप दिसून येत होता. ते म्हणाले की, “या सरकारने मराठा समाजाला वारंवार केवळ आश्वासने देऊन वेळकाढूपणा केला आहे. २९ ऑगस्टच्या मुंबई दौऱ्यापासून ते आतापर्यंत अनेकदा मुदत देऊनही आरक्षणाबाबत सरकार दरबारी कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे आता केवळ उपोषण नाही, तर ही अस्तित्वाची लढाई असेल. ३० तारखेला मी आंदोलनाला सुरुवात करणार असून, यावेळेस कोणत्याही प्रकारचा मंडप टाकला जाणार नाही किंवा मी सावलीतही बसणार नाही. मे महिन्याच्या या रणरणत्या उन्हात मी थेट उघड्यावर उपोषणास बसेल.”

या आंदोलनादरम्यान आपल्या जिवाचे काही बरे-वाईट झाले किंवा उष्माघाताने मृत्यू ओढवला, तर त्याला सर्वस्वी राज्य सरकार आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असा थेट हल्लाबोलही त्यांनी केला. भाजप नेते प्रसाद लाड यांनी अलीकडेच जरांगे यांची भेट घेतली होती, मात्र या भेटीनंतरही आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले गेले नाही. “जर मी मेलो तर त्याला सरकारच जबाबदार असेल. ‘मेलो तर मेलो’ पण आरक्षण मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपली जिद्द बोलून दाखवली.

सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना जरांगे यांनी विचारले की, मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करण्यासाठी नेमका किती वेळ लागतो? पश्चिम महाराष्ट्रात ओबीसी सदन का नाही? सरकारला केवळ मराठ्यांची मते हवी आहेत की गरिबांच्या समस्यांशी काही देणेघेणे आहे? असे टोकदार सवाल त्यांनी सरकारला विचारले आहेत. विशेष म्हणजे, यावेळच्या आंदोलनात समाजबांधवांनी अंतरवलीकडे गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले असून हे आंदोलन पूर्णपणे वैयक्तिक स्तरावर तीव्र करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या