MLA Sanjay Gaikwad : महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील बिनीचे शिलेदार राहिलेले विचारवंत आणि कम्युनिस्ट कार्यकर्ते दिवंगत गोविंद पानसरे यांनी सुमारे 37 वर्षांपूर्वी ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची थोरवीच लिहिलेली आहे. परंतु या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत बुलडाणाचे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करत शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि जीभ हासडून मारण्याची धमकी दिली. भाजपाचे मंत्री गिरीष महाजन यांना अलिकडेच एका महिलेने भररस्त्यात जाब विचारला. यामुळे सामान्य माणूस खूश झाला. ही घटना ताजी असताना सत्ताधार्यांची गुर्मी उतरलेली नाही हे गायकवाडांच्या गुंडगिरीच्या भाषेवरून दिसते.
शिवाजी महाराजांविषयी एकेरी उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण, असाही सवाल ताळतंत्र सुटलेल्या आ. गायकवाड यांनी केला. या संतापजनक प्रकाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर महाराष्ट्रातून त्यांचा निषेध होत आहे. आ. गायकवाड प्रकाशकाला फोन करून म्हणाले की, एका कार्यक्रमात हे पुस्तक माझ्या पत्नीला देण्यात आले. तिने हे पुस्तक घरी आणल्यावर मी ते वाचले. त्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाशी छेडछाड करण्यात आल्याचे दिसले. पुस्तकाच्या प्रत्येक पानावर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे. शिवाजी महाराज क्षत्रिय होते की नाही, ते 96 कुळी होते की नाही, असे बेछूट प्रश्न विचारण्यात आले आहेत. शिवाजी महाराजांविषयी असा उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण होता ? मला हे पुस्तक वाचायची गरज नाही. तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत बोलतात. तुला माहीत आहे ना, त्या गोविंद पानसरेचे काय झाले, त्याची अवस्था काय झाली? मी तुलाही घरात घुसून मारेन. तुला चिरडून टाकेन. तुझी जीभ छाटेन.
प्रकाशक प्रशांत आंबी यांनी आ. गायकवाड यांना समजावण्याचा प्रयत्न केला की, हे जुने पुस्तक आहे. ते पानसरे यांनी लिहिले आहे. तरीही ते आंबी यांना आक्षेपार्ह भाषेत सुनावत राहिले. त्यांनी आंबी यांना तू ब्राह्मण आहेस का, असाही प्रश्न विचारला. आंबी यांनी नकार दिल्यानंतरही आ. गायकवाड यांनी धमकावणे सुरू ठेवले. या संभाषणाबद्दल बोलताना नंतर आंबी म्हणाले की, आ. संजय गायकवाड यांच्यासोबत 9 मिनिटे फोन सुरू होता. त्यांना ते पुस्तक वाचण्यात कोणताही रस होता असे मला वाटले नाही. हे पुस्तक मी लिहिलेले नसून कॉम्रेड पानसरे यांचे लिखाण आहे. हे पुस्तक 1988 साली प्रकाशित झाले होते. त्यात शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही. त्यामुळे तुम्ही आधी ते पुस्तक वाचा, असे सांगितले. आ. गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिले. मात्र, त्यामध्येही त्यांनी आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत म्हटले की, मी पूर्ण पुस्तक वाचले. इतिहासाची तोडफोड करून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख या पुस्तकात केलेला आहे. मी प्रकाशकाला भाऊ म्हणून बोललो. त्याची मग्रुरीची भाषा होती. त्याने मला डिवचले. त्यामुळे मी त्याला शिव्या दिल्या. अशांना शिव्याच दिल्या पाहिजे. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणार्याची जीभ हासडलीच पाहिजे.
आ. गायकवाड यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेधा पानसरे म्हणाल्या की, आ. संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याविषयी ज्या पद्धतीची भाषा वापरली त्याचा मी तीव्र निषेध करते. कॉम्रेड गोविंद पानसरेंना अनेक धमक्या आल्या, पण त्यांनी पुस्तकाचे शीर्षक बदलले नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे सौजन्यशील, न्यायप्रिय आणि गोरगरीबांचा, रयतेचा राजा म्हणून ओळखले जातात. त्यांचा वारसा सांगत आणि नाव घेत या पद्धतीची भाषा करणारे नक्की शिवरायांचा कोणता वारसा पुढे नेत आहेत? कॉम्रेड पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचले आहे. त्यांनी जो विचार सांगितला आहे तो मारता येत नाही, त्यावर दुसरा तुल्यबल विचार त्यांच्यापाशी नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा विचार केला जात आहे. गायकवाड यांनी हे पुस्तक वाचले आहे असे मला वाटत नाही. त्यांनी केवळ पुस्तकाचे शीर्षक बघून हे वक्तव्य केल्याचे दिसते. त्यांनी हे पुस्तक वाचावे हे आवाहन आहे. पुस्तकात कोणत्या प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराज सांगितले आहेत हे बघावे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही एक पोस्ट करून आ. गायकवाड यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले की, बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा विडाच आमदार संजय गायकवाड या व्यक्तीने उचलला आहे. मग ते आमदार निवासातील कँटीनमध्ये हाणामारी करणे असो, सुरक्षेसाठी असणार्या पोलिसांना स्वतःची गाडी धुवायला सांगणे असो की आता प्रशांत आंबी यांना धमकी असो. राज्यातील एक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी पक्षातील आमदार, शिवरायांचा वंशज म्हणवून घेणार्या या व्यक्तीची भाषा आणि शिव्यांची पातळी बघितली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही यांच्या ओठावर असू नये. कारण ती लायकी यांची नाही. महाराजांनी या भूमीला घालून दिलेले संस्कार भ्रष्ट करण्याचे, महाराष्ट्राची संस्कृती नासवण्याचे, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुसण्याचे काम यांच्यासारख्या विकृत व्यक्तींमुळे होते आहे. तर काँग्रेसचे आ.विजय वडेट्टीवार म्हणाले की, आंबी यांना काही झाले तर संजूला गंजू करुन सोडू, संविधानात जे आहे त्यात राहून बोलावे, पण अशी धमकी देणे हे योग्य नाही. आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे. प्रा.गोविंद पानसरे यांनी जे लिहिले आहे, खरे लिहिले आहे.
वादग्रस्त आमदार
बुलडाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांची कारकीर्द कायम वादग्रस्त राहिली आहे. ते 2019 मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा ही जागा जिंकली. त्यांचे शिक्षण नववीपर्यंत झालेले आहे. गेल्या वर्षी मुंबईत आकाशवाणी आमदार निवासस्थानी शिळ्या अन्नावरून त्यांनी एका कॅन्टीन कर्मचार्याला मारले होते. नंतर हे अन्न शिळे नसल्याचा अहवाल आला. कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असताना संजय गायकवाडांनी त्यावेळचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजकारण करत असल्याची टीका करत म्हटले होते की, मला जर कोरोनाचा विषाणू मिळाला तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबेन. गेल्या वर्षी शिवजयंतीच्या मिरवणुकीत संजय गायकवाड यांनी एका तरुणाला काठीने मारहाण केली होती. राहुल गांधींची जो जीभ कापेल त्याला 11 लाख रुपये बक्षीस देणार, अशीही घोषणा त्यांनी केली होती. 1987 साली आपण वाघ मारला होता आणि त्याचा दात गळ्यात घालून फिरतोय असाही त्यांनी दावा केला होता. 2021 मध्ये गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केल्याचा आरोप झाला. विधानसभेच्या निवडणुकीत कमी मते पडल्यानंतर एका जाहीर सभेत त्यांनी मतदारांना शिव्या देत म्हटले होते की, मतदारांना फक्त दारू आणि मटण पाहिजे. हे दोन हजारांत विकले जातात. यांच्यापेक्षा वेश्या बर्या. आ. संजय गायकवाड हे इतके बेताल वागत असूनही एकनाथ शिंदे यांनी त्यांची प्रत्येक कृती पाठीशी घातली आहे. शिंदे गायकवाड यांना आवर का घालत नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.











