MS Dhoni : इंडियन प्रीमिअर लीग’ (IPL) २०२६ च्या चालू हंगामात क्रिकेटप्रेमींच्या मनाला सतावणारा एकमेव प्रश्न म्हणजे, “महेंद्रसिंह धोनी प्रत्यक्ष खेळताना कधी दिसणार?” या हंगामातील चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) वाटचालीत धोनी अद्याप एकाही सामन्यात मैदानात उतरलेले नाहीत. मात्र, आता धोनीच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत सुखद आणि सकारात्मक वार्ता समोर आली असून, त्यांच्या पुनरागमनाचे संकेत मिळत आहेत.
दुखापतीमुळे प्रदीर्घ विश्रांती-
हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनी यांच्या पिंडरीला (Calf Injury) दुखापत झाली होती. सुरुवातीला ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचे सांगण्यात आले होते आणि ते केवळ दोन आठवडे विश्रांती घेतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात महिनाभरापेक्षा जास्त कालावधी उलटूनही चेन्नईचा हा ‘थाला’ मैदानात दिसला नाही. संघाने आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये ते अंतिम अकरा खेळाडूंमध्ये (Playing XI) स्थान मिळवू शकले नाहीत, इतकेच नव्हे तर चेन्नईतील घरच्या मैदानावरील सामन्यांनाही ते मुकले होते.
लखनौ दौऱ्यासाठी विशेष तयारी-
संघासोबत प्रवासाला सुरुवात केल्यापासून चाहत्यांच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत. हैदराबाद आणि मुंबई दौऱ्यात धोनी संघासोबत वास्तव्यास होते, परंतु त्यांनी प्रत्यक्ष खेळात सहभाग घेतला नव्हता. आता ‘क्रिकबज’ने दिलेल्या ताज्या अहवालानुसार, चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) काशी विश्वनाथन यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. आगामी लखनौ विरुद्धच्या सामन्यासाठी धोनी यांच्या नावे ‘इंडिगो’ विमान कंपनीचे तिकीट आरक्षित करण्यात आले आहे.
व्यवस्थापनाला पुनरागमनाची खात्री-
चेन्नई सुपर किंग्सचा सुमारे ६० सदस्यांचा ताफा व्यावसायिक विमानाने लखनौकडे रवाना होणार आहे. या ताफ्यामध्ये महेंद्रसिंह धोनी यांचाही समावेश असून, ते या दौऱ्यात सक्रिय सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. सराव सत्रातील त्यांची कामगिरी आणि दुखापतीतून सावरण्याचा वेग लक्षात घेता, लखनौच्या मैदानात धोनी पुन्हा एकदा यष्टींमागे आणि फलंदाजीसाठी सज्ज झालेले दिसू शकतात.











