Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर आता अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, खोपोली ते कुसगाव दरम्यानची ही १३.३ किमीची नवीन मार्गिका लवकरच प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे.
Mumbai-Pune Expressway Missing Link: प्रकल्पाचे काम पूर्ण, चाचण्यांना होणार सुरुवात
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून सध्या केवळ फिनिशिंगची कामे सुरू आहेत. डांबरीकरणाचे काम येत्या २ दिवसांत संपवून या मार्गिकेवर ‘लोड टेस्टिंग’ (वजनासंबंधीच्या चाचण्या) सुरू केल्या जातील. ३० एप्रिलपर्यंत हा संपूर्ण मार्ग तांत्रिकदृष्ट्या वाहतुकीसाठी सज्ज करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Mumbai-Pune Expressway Missing Link: प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी वाचणार
सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून दररोज ७० हजारहून अधिक वाहने धावतात. घाटातील वळणदार रस्त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ही ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यानंतर प्रवाशांना घाटाचा अवघड वळसा घालावा लागणार नाही. यामुळे प्रवासातील तब्बल ३० मिनिटांचा वेळ वाचणार असून, मुंबई ते पुणे हे अंतर दीड ते दोन तासांत पूर्ण करणे शक्य होईल.
Mumbai-Pune Expressway Missing Link: मे महिन्याच्या मध्यात लोकार्पण?
हा प्रकल्प १ मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खुला करण्याचे नियोजन होते. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप लोकार्पणाची तारीख निश्चित झालेली नाही. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कोणत्याही दिवशी हा मार्ग जनतेसाठी खुला केला जाऊ शकतो. २०१९ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाला कोरोना काळ आणि भौगोलिक आव्हानांमुळे काहीसा विलंब झाला, मात्र आता हा मार्ग पूर्ण क्षमतेने सज्ज आहे.
एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी स्पष्ट केले की, तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारकडून मिळणाऱ्या तारखेनुसार या ऐतिहासिक मार्गिकेचे लोकार्पण केले जाईल.
हे देखील वाचा – Hormuz Strait Crisis: होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय जहाजांवर गोळीबार! भारताने इराणला बजावले; सागरी सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त











