Priyanka Gandhi – महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक काल विरोधकांच्या एकीमुळे लोकसभेत नामंजूर झाले. आज काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी यावरून मोदी सरकारविरोधात निशाणा साधत आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, काल लोकसभेत जे घडले तो लोकशाहीचा मोठा विजय आहे. महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून मतदारसंघ पुनर्रचना करीत सत्तेत राहण्याचा कट सरकार रचत होते. तो आम्ही उधळून लावला. 2023 मध्ये सर्वसंमतीने मंजूर झालेले 33 टक्के महिला आरक्षण विधेयक तत्काळ अंमलात आणा, ही आमची मागणी आहे. आम्ही त्याला पाठिंबा देऊ.
प्रियंका गांधी आज पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, काल जे घडले तो संविधानाचा, देशाचा आणि विरोधकांच्या ऐक्याचा विजय आहे. सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावरच हे स्पष्ट दिसत होते. गृहमंत्री आणि पंतप्रधान यांनी आपल्या भाषणात म्हटले की तुम्ही आमच्याशी असहमत असाल तर तुम्ही इथे बसू शकत नाही. सत्तेत येऊ शकत नाही. जिंकू शकत नाही. हे धक्कादायक होते. 2011 च्या जनगणनेनुसार मतदारसंघ फेरफार केला तर जात जनगणना करावी लागणार नाही, असे त्यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी महिला आरक्षण मुद्दा त्याला जोडला. म्हणजे हे मंजूर झाले तर चांगले आणि मंजूर झाले नाही तर विरोधक महिला विरोधी आहेत, असे सांगत फिरायचे ही त्यांची योजना आहे.विरोधकांनी या विधेयकाला समर्थन देणे शक्यच नव्हते.
प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या की, कालचा दिवस काळा होता, असे ते म्हणतात. हा दिवस त्यांच्यासाठी निश्चित काळा दिवस होता. कारण पहिल्यांदाच त्यांना धक्का बसला आहे. तो बसायलाच हवा आहे. महिला मुर्ख नाहीत. पीआर मीडियाबाजी सगळे बघत आहेत. काही ठोस करायचेच असेल तर जे 2023 साली महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले ते आता लगेच लागू करा. आम्ही सतत मागणी करणार आहोत की 2023 साली मंजूर केलेले महिला आरक्षण विधेयक अंमलात आणा.सध्या सरकार जे काही करते आहे, त्यावरून स्पष्ट दिसते आहे की, ते प्रचंड दबावाखाली आहेत. त्यामुळेच त्यांनी अमेरिकेशी तसा करार केला. कुणीही पंतप्रधान असा करार करणारनाहीत हे लोक समजत आहेत. सगळ्यांना त्याचा फटका बसतो आहे. त्यांना माहीत होते की, हे विधेयक मंजूर होणार नाही. पण राजकीय फायद्यासाठी त्यांनी हे सर्व केले.
भाजपाचे आक्रोश आंदोलन
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. हे अपयश मोदी सरकारच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. भाजपाने मंगळवारपासून देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. विरोधी पक्षांनी महिलांना आरक्षण देऊ दिले नाही असा आरोप करीत इंडिया आघाडीतील नेत्यांच्या घराबाहेर भाजपा आंदोलन करणार आहे. आजही मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालय आणि दहिसर येथे असे आंदोलन झाले. ठाण्यात आणि मुंबईत शिंदे गटानेही आंदोलन केले. त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत अनेकांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या चित्रांवर चपला मारल्या.
‘नारीशक्ती’च्या विरोधकांना त्यांच्या पापाची सजा मिळेल!
संसदेत काल नारीशक्ती विधेयक फेटाळण्यात आल्यानंतर आज पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केले. विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांवर घणाघाती टीका करत ते म्हणाले की, हे विधेयक मंजूर न झाल्याबद्दल माता-भगिनींची क्षमा मागतो. काही लोकांसाठी पक्षहित देशहितापेक्षा महत्त्वाचे ठरले. काँग्रेस, द्रमुक, तृणमूल, समाजवादी पक्ष यांसारख्या पक्षांनी केलेल्या स्वार्थी राजकारणाची किंमत देशातील महिलांना मोजावी लागली. महिलांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मांडलेल्या या विधेयकाचा पराभव होत होता, तेव्हा घराणेशाहीवर चालणारे हे पक्ष आनंदाने बाक वाजवत होते. हे बाक वाजवणे नव्हते, तर तो महिलांच्या सन्मानावर केलेला आघात होता. संसदेत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केलेल्या वर्तनाची सल महिलांच्या मनात कायम राहील. महिला आरक्षणाच्या मार्गात अडथळा निर्माण करून विरोधकांनी जे पाप केले आहे, त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल. या पक्षांनी राज्यघटनेच्या निर्मात्यांच्या भावनांचा अपमान केला आहे. जनतेकडून दिली जाणारी शिक्षा त्यांना कोणत्याही प्रकारे टाळता येणार नाही. आमचा एकविसाव्या शतकातील महिलांना नवी संधी, नवी भरारी देण्याचा प्रयत्न होता. त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचा महायज्ञ होता. काँग्रेसने त्याची भ्रूणहत्या केली. देशामध्ये दुफळी निर्माण करणाऱ्या भावनांना काँग्रेसने नेहमीच खतपाणी घातले आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, तो एक सुधारणा-विरोधी, नकारात्मक राजकारण करणारा पक्ष आहे. आमचा काल पराभव झाला असला तरी आम्ही हरलेलो नाही. आमची हिंमत, उमेद व मनोबल कायम आहे. पुढे अनेक संधी येतील. आम्ही प्रयत्न थांबवणार नाही.











