Mumbai’s manholes : मुंबईत पावसाळा सुरू होताच चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून एका निष्पाप विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटनेने मुंबईकरांना हादरवले होते. या घटनेच्या अवघ्या दोन दिवसांनी मुंबई महापालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे आणखी एका मुंबईकराचा बळी गेला आहे. साकीनाका येथील खैराणी रोड परिसरात उघड्या ठेवलेल्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम इसाक शेख यांचा मृत्यू झाला. संतापजनक गोष्ट अशी की, या दुर्घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी राजकीय नेते आपली जबाबदारी झटकून एकमेकांवर आरोप करण्यामध्येच गुंतल्याचे दिसले. 9 वर्षांपूर्वी मुंबईत उघड्या मॅनहोलमध्ये पडून प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. यानंतर मॅनहोलना जाळी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र इतक्या वर्षांनंतरही त्या न बसवण्यात आल्याने आज आणखी एका मुंबईकराचा बळी गेला, हे दुर्दैवी वास्तव आजच्या घटनेने ठळकपणे उघडकीस आणले. पालिका उपायुक्त अश्विनी भिडे यांनी मात्र दावा केला की, मुंबईतील सर्व मॅनहोलवर जाळ्या बसविल्या आहेत. मात्र एकदोन ठिकाणी हे काम सुरू होते. जिथे अपघात झाला तिथे जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल.
मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले होते. साकीनाका येथील खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलसमोरील मॅनहोल उघडे ठेवण्यात आले होते. घटनास्थळी कोणतेही बॅरिकेड, इशारा फलक किंवा सुरक्षेची व्यवस्था नव्हती. तिथे जाळी बसविण्याचे काम सुरू होते, त्यासाठी ते उघडे केले होते असा पालिकेचा दावा आहे. 55 वर्षीय अस्लम शेख हे सकाळी कामावर निघाले होते. परंतु पावसामुळे पाणी साचल्याने त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. ते इथून जात असताना मॅनहोलमध्ये 25 ते 30 फूट खोल कोसळले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. अस्लम शेख मॅनहोलमध्ये पडताच जवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हाती केवळ शेख यांची छत्री लागली आणि प्रचंड वेगाने वाहणार्या पाण्यामुळे शेख नाल्यात ओढले गेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिका कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जवळपास चार तासांच्या शोधमोहिमेनंतर 200 मीटर अंतरावरील पुढील मॅनहोलमधून शेख यांना बाहेर काढण्यात आले. त्यावेळी ते बेशुद्धावस्थेत होते. मात्र, राजावाडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अधिकारी आणि नेते यांच्या बेजबाबदारपणामुळे एका नागरिकाचा जीव गेला. यानंतर एकमेकांवर आरोप करण्याचा राजकीय तमाशा सुरू झाला. उद्यापर्यंत हा तमाशा बंद होईल आणि कसलीही कारवाई न होता पुढेही असे धोकेकायम राहतील.
या गंभीर घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हे मॅनहोल उघडे कसे राहिले? कुठल्या कंत्राटदाराने ते उघडे ठेवले? ऐन पावसाळ्यात मॅनहोलचे काम का हाती घेण्यात आले होते? त्याला कामाचे आदेश कुणी दिले होते? मॅनहोल उघडे असताना तिथे बॅरिकेड का लावले नव्हते? असे अनेक प्रश्न नेहमीप्रमाणे उपस्थित केले जात होते. मुंबईच्या महापौर भाजपाच्या रितू तावडे यांनी या दुर्घटनेला जबाबदार धरून पालिकेच्या एल विभागाचे सहाय्यक आयुक्त धनाजी
हेर्लेकर, दुय्यम अभियंता दीपक चौघुले, कनिष्ठ अभियंता अभिजित चौघुले, सहाय्यक अभियंता उत्तम पाटील या चार अधिकार्यांना निलंबित केले आहे. परंतु अधिकार्यांना निलंबित करायचे आणि काही महिन्यांनी त्यांना पुन्हा महत्त्वाच्या जागी कामावर घ्यायचे हे नेहमीच केले जाते. मृत शेख यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी महापौरांच्या पाहणी दौर्यात त्यांच्या समोरच एक अधिकारी उघड्या मॅनहोलमध्ये पडला होता. त्याची चौकशी सुरू आहे.
आजच्या घटनेची माहिती दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास प्रशासनाला मिळाली. त्यानंतर तब्बल दोन तासांनंतर म्हणजेच दुपारी 2 वाजता उपायुक्त संध्या नांदेडकर आणि अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. एका नागरिकाचा जीव धोक्यात असताना प्रशासनाकडून झालेला विलंबही संतापजनक होता. घटनास्थळी माध्यमांनी आणि स्थानिकांनी प्रश्न विचारल्यानंतर आयुक्त संध्या नांदेडकर यांनी म्हटले की, वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात आली होती. मी केवळ सूचना देते आणि सर्वांना वेगवेगळ्या जबाबदार्या देण्यात आल्या आहेत, असे सांगितले. एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मॅनहोल परिसरात खासगी कंत्राटदारामार्फत देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र, काम सुरू असताना सुरक्षेच्या मूलभूत नियमांचे पालन करण्यात आले नव्हते. मॅनहोलचे झाकण पूर्णपणे उघडे ठेवण्यात आले होते. मात्र नागरिकांना इशारा देण्यासाठी कोणतेही बॅरिकेड, सुरक्षा फलक लावण्यात आले नव्हते. हे काम दोन वर्षांपूर्वीच संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले होते.
महापौर रितू तावडे यांनी सारवासारव करत सगळा दोष खासगी कंत्राटदारावर टाकला. त्या म्हणाल्या की, या कामासाठी कोणतीही वर्क ऑर्डर प्रशासनाने काढली नव्हती. खासगी कंत्राटदाराने हे काम केल्याचे समजते. पावसाचा रेड अलर्ट असताना खासगी कंत्राटदाराने हे काम केले. मॅनहोल उघडे ठेवून ते निघून गेले. ही प्रशासनाची मोठी चूक आहे. मी प्रशासनाला कुठेही पाठीशी घालणार नाही. पावसाळ्यात ही कामे करायची काही गरज नव्हती. मॅनहोल उघडे ठेवू नका. ठेवल्यास त्याला बॅरीकेड लावा, अशा सक्त सूचना दिल्या असतानाही जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करण्यात आल्याचे दिसते. मी तातडीने संबंधित अधिकार्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. या अधिकार्यांचे नुसते निलंबन नाही तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करा, अशी माझी मागणी आहे. कंत्राटदारावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. (कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकायचे आणि कालांतराने पुन्हा त्यांनाच कंत्राट द्यायचे हाही नेहमीचा खेळ आहे.
महापालिकेत भाजपाबरोबर सत्तेत असलेल्या शिंदे गटाने थेट पालिका प्रशासनावरच आरोप केले. शिंदे गटाचे उपमहापौर संजय घाडी यांनी या दुर्घटनेचे खापर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावर फोडत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. संजय घाडी म्हणाले की, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यासाठी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे याच जबाबदार आहेत. मी 4-5 दिवसांपूर्वी आयुक्तांना पुराव्यांसकट पत्र दिले होते. मॅनहोलचे कंत्राट दोन वर्षांपूर्वी वॉर्ड स्तरावर काढले होते. त्याची मुदत संपली आहे. त्यावर संरक्षण जाळ्या लावण्यात आल्या नसून, काही ठिकाणी तुटल्या आहेत. त्यामुळे चौकशी करून त्याचे दुरुस्ती काम करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मी केली होती. परवा भेटलो तेव्हाही मी त्यांना आठवण करून दिली होती. पण आयुक्तांनी त्यावर अत्यंत ढिम्म प्रतिक्रिया दिली होती. आता आयुक्तांनी याची जबाबदारी घ्यावी, अशी मी मागणी करतो. आयुक्त अजून किती बळी घेणार आणि त्याची जबाबदारी आमच्यावर टाकणार का?
ही घटना घडली तेथील शिंदे गटाचे स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी आरोप केला की, आधी आचारसंहिता, त्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया आणि मग अर्थसंकल्पीय कामकाज यामुळे यंदाची नालेसफाई वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. पालिकेने नालेसफाईचे कंत्राट उशिरा काढले. यामुळे नालेसफाईचे काम समाधानकारक झालेले नाही. 50 टक्के कामदेखील पूर्ण झालेले नाही. याची कल्पना आपण यापूर्वीच अधिकार्यांना दिली होती. या घटनेवरून बोध घेऊन महानगरपालिकेने आपली जबाबदारी स्वीकारावी. उबाठाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही घटनास्थळी भेट देत या घटनेवरून प्रशासनावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, मुंबईकरांना पूर्णपणे वार्यावर सोडण्यात आले आहे. डॉ. दीपक अमरापूरकर मॅनहोलमध्ये वाहून गेल्यानंतर सर्व मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्याची तरतूद करण्यात आली होती. जाळ्या बसवण्याचे कामही सुरू झाले होते. गेल्या काही वर्षांत त्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले आणि आजही परिस्थिती फारशी बदललेली दिसत नाही. पावसाळ्यापूर्वी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या आढावा बैठका होणे आवश्यक असते. मात्र, यंदा त्या बैठका प्रभावीपणे झाल्या नाहीत. पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे 31 मेपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. ती वेळेत पूर्ण झालेली दिसत नाहीत. पावसाळ्यापूर्वी गटनेत्यांची बैठक मे महिन्यातच होणे आवश्यक होते. त्या बैठकीत प्रत्येक वॉर्डमधील धोकादायक ठिकाणांची माहिती नगरसेवक आणि गटनेते प्रशासनाला देत असतात. किशोरी पेडणेकर रोज कॅमेरा पुढे येतात तेव्हा याआधी त्यांनी या तक्रारी करीत आंदोलन का केले नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.
मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार म्हणाले की, अशा प्रकारच्या घटनांची संख्या वाढत आहे. चुकांवर केवळ तात्पुरते उपाय केले जातात. काही अधिकार्यांना निलंबित करून ठराविक काळासाठी बदलले जाते. पण काही काळानंतर त्यांना पुन्हा घेतले जाते. ही पद्धत चुकीची आहे. कारण यामुळे बदल होत नाही. अभियंत्यांकडूनही पूर्ण तपासणी केली जात नाही. प्रशासनाने योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र याची जबाबदारी सत्ताधार्यांवरही आहे. कारण शासन आणि प्रशासन हाताळण्यात ते अपयशी ठरत आहेत. (सर्वांना सर्व माहीत आहे पण बदल घडावा इतका जोर कोणताच पक्ष लावत नाही.
या घटनेनंतर मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुंबईत अजून किती जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. प्रत्येक पावसाळ्यात मान्सुनपूर्व तयारीचे दावे केले जातात, कोट्यवधी रुपयांची कामे झाल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना जीवघेण्या निष्काळजीपणाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप होत आहे. वकील पंकज मिश्रा यांनी या घटनेची मानवधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे.
2017 मध्ये डॉ. अमरापूरकरांचा
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू
29 ऑगस्ट 2017 रोजी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला विस्कळीत केले होते. मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले होते. या अतिवृष्टीदरम्यान एक दुःखद घटना घडली. बॉम्बे हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह वरळी कोळीवाडा समुद्रात सापडला होता.
दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास डॉ. अमरापूरकर आपल्या कामानिमित्त बाहेर पडले होते. लोअर परळ परिसरात आपली गाडी सोडल्यानंतर प्रभादेवी येथील निवासस्थानी पायी जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यावेळी या भागात गुडघाभर पाणी साचले होते. त्यातून मार्ग काढत ते पुढे जात होते. मात्र, ते घरी पोहोचलेच नाहीत. मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एल्फिन्स्टन परिसरातील एका मॅनहोलचे झाकण उघडले होते. ही गोष्ट डॉ. अमरापूरकर यांच्या लक्षात आली नाही. ते या उघड्या मॅनहोलमध्ये पडले. त्यांचा मृतदेह तब्बल दोन दिवसांनी वरळी कोळीवाडा परिसरातील समुद्रात आढळला. मूळचे सोलापूरचे असलेले डॉ. दीपक अमरापूरकर हे देशातील नामांकित गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट (पोटविकारतज्ज्ञ) म्हणून ओळखले जात. या घटनेनंतर उघड्या मॅनहोल्सचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने धोकादायक मॅनहोलच्या आत संरक्षक लोखंडी जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतला होता.
विशेष समितीकडून चौकशी
पालिका आयुक्तांची प्रतिक्रिया
आजच्या दुर्घटनेचे खापर पालिका प्रशासनावर फुटल्यानंतर आयुक्त अश्विनी भिडे यांनी आकडेवारी सादर करत प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेकडून शहरातील सुमारे 13,926 मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. यामध्ये पर्जन्य जलवाहिन्या (स्टॉर्म वॉटर ड्रेन्स) आणि मलनिस्सारण वाहिन्यांमधील मॅनहोलचा समावेश आहे. सुमारे 1,800 हून अधिक मॅनहोलवरील जाळ्या तात्पुरत्या हटविण्यात आल्या होत्या, तर 4,446 मॅनहोलची विविध कामे करण्यात आली. संबंधित कामे पूर्ण होताच त्या ठिकाणी पुन्हा जाळ्या आणि झाकणे बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भातील माहिती उच्च न्यायालयातही सादर करण्यात आली आहे. ‘एल’ वॉर्डमध्ये काही दिवसांपूर्वी 75 मॅनहोलवर जाळ्या बसविण्याचे काम प्रलंबित होते. मात्र आता केवळ चार मॅनहोलवर जाळ्या बसविण्याचे काम शिल्लक आहे. दुर्दैवाने, या चारपैकी एका मॅनहोलवर काम सुरू असताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मॅनहोलची झाकणे अत्यंत जड आणि आयताकृती आकाराची असल्याने त्यावर काम करताना विशेष दक्षता घेणे आवश्यक असते. संबंधित कंत्राटदार आणि कामगारांनी बॅरिकेड उभारणे, ट्रायपॉड बसविणे तसेच इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे बंधनकारक होते. सीसीटीव्हीच्या तपासणीत या सुरक्षा नियमांचे पालन झाले नसल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तसेच उपायुक्त (पायाभूत सुविधा) यांचा समावेश असून, ही समिती संपूर्ण घटनेची चौकशी करून अहवाल सादर करणार आहे.










