Nashik Crime News : दक्षिण गंगेचे उगमस्थान आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानमध्ये देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक पिळवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी अत्यंत मोठी कारवाई करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थानचे विद्यमान विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना अटक केली आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीचा अशा प्रकारच्या गैरव्यवहारात थेट सहभाग आढळल्याने मंदिर प्रशासन आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना आणि फसवणुकीचे स्वरूप-
मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर मंदिरात ‘व्हीआयपी’ किंवा ‘विशेष दर्शना’चे प्रलोभन दाखवून भाविकांकडून अवैध रित्या पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त होत होत्या. ११ एप्रिल रोजी नाशिकच्या पंचवटी परिसरातील भाविक अनंता सुरेश मेहंदळे हे आपल्या मित्रांसह दर्शनासाठी आले होते. त्यांनी रितसर २०० रुपयांचा अधिकृत देणगी पास काढला होता. मात्र, रांगेत उभे असताना काही संशयित व्यक्तींनी त्यांना गाठले आणि “रांगेतून दर्शनासाठी ४ ते ५ तास लागतील, आम्ही तुम्हाला केवळ १० मिनिटांत दर्शन घडवून देतो,” असे आमिष दाखवले. या बदल्यात भाविकांकडून ३ हजार रुपये रोख स्वीकारण्यात आले. प्रत्यक्षात देवस्थान ट्रस्टची अशी कोणतीही ‘पेड दर्शन’ योजना अस्तित्वात नसताना, भाविकांना अनधिकृत मार्गाने प्रवेश देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. या फसवणुकीनंतर मेहंदळे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
तपासाची चक्रे आणि अटकेची कारवाई-
पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी गोटीराम मनाजी पेहरे आणि अभिषेक कडलग (पुरुषोत्तम कडलगचा पुतण्या) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गोटीरामला तात्काळ ताब्यात घेण्यात आले, मात्र अभिषेक कडलग अद्याप फरार आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीत आणि गोटीरामच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. या संपूर्ण रॅकेटचे सूत्रधार खुद्द विश्वस्त पुरुषोत्तम कडलग असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. सुरक्षारक्षकांना आदेश देणे आणि विनापरवाना भाविकांना आत सोडण्यासाठी पदाचा गैरवापर करणे, असे गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत. याच पुराव्यांच्या आधारे सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी कडलग यांना बेड्या ठोकल्या.
सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी आणि नैतिकतेचा प्रश्न-
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर या प्रकरणाने मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा विशेष प्रवेशद्वारातून प्रवेश मिळवण्यासाठी अत्यंत कडक नियमावली आहे. सुरक्षारक्षक केवळ विश्वस्तांच्या लेखी परवानगीने किंवा अधिकृत नोंदवहीतील नोंदीनंतरच प्रवेश देऊ शकतात. अशा परिस्थितीत बाहेरील मध्यस्थ व्यक्ती भाविकांना थेट मंदिरात कशी नेऊ शकतात, हा संशोधनाचा विषय होता.
त्र्यंबकेश्वर मंदिर भ्रष्टाचार: नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडून रॅकेटचा पर्दाफाश; ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे विश्वस्तांचे कारस्थान उघड-
जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अत्यंत कौशल्याने छडा लावला आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती देताना पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी मंदिर संस्थानमधील भ्रष्टाचाराचे भीषण वास्तव समोर आणले आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची कशा प्रकारे पद्धतशीर आर्थिक लूट केली जात होती, याचे पुरावे आता पोलिसांच्या हाती लागले आहेत. मंदिर समितीचे अध्यक्ष तथा सन्माननीय न्यायाधीश यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली असून, यामध्ये संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांचा आणि एजंटचा सहभाग निष्पन्न झाला आहे.
‘स्टिंग ऑपरेशन’ आणि तपासातील धक्कादायक माहिती-
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, त्र्यंबकेश्वर मंदिरात सशुल्क दर्शनासाठी संस्थानने केवळ २०० रुपयांचे अधिकृत शुल्क निश्चित केले आहे. मात्र, काही अनधिकृत मध्यस्थ (एजंट) भाविकांना गाठून दर्शनासाठी ३ ते ४ तास लागतील अशी भीती घालत होते. १० मिनिटांत दर्शन घडवून देण्याचे आमिष दाखवून या भाविकांकडून ३ हजार रुपयांपासून ते थेट १२ हजार रुपयांपर्यंतची अवाजवी रक्कम उकळली जात होती. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी स्वतः ‘स्टिंग ऑपरेशन’ राबवले. यामध्ये भाविकांची लूट कशी केली जाते, याचे सर्व चित्रीकरण आणि ध्वनीमुद्रण (रेकॉर्डिंग) करण्यात आले. या मोहिमेतून हे स्पष्ट झाले की, दररोज सुमारे १०० ते १५० भाविकांना अशा अनधिकृत मार्गाने मंदिरात प्रवेश दिला जात होता.
विश्वस्त आणि प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर-
या रॅकेटचे वैशिष्ट्य म्हणजे, भाविकांना मंदिरात सोडण्यासाठी संस्थानच्या ‘पूर्व दरवाजा’चा वापर केला जात होता. विश्वस्त पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून पुरुषोत्तम कडलग हे या बेकायदेशीर प्रक्रियेला पाठबळ देत असल्याचे तपासात समोर आले आहे. कडलग यांच्या सांगण्यावरूनच सुरक्षा रक्षक आणि संबंधित कर्मचारी या भाविकांना थेट प्रवेश देत होते. “कोणाच्या माध्यमातून आणि कोणाच्या दूरध्वनीवरून या भाविकांना आत सोडले गेले, याची सखोल चौकशी सुरू आहे,” असे पाटील यांनी स्पष्ट केले. या गैरव्यवहारात कडलग यांचे दोन नातेवाईक आणि एक एजंट यांना आधीच अटक करण्यात आली असून, आता खुद्द विश्वस्तालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
न्यायालयीन प्रक्रिया आणि पुढील कारवाई-
पोलीस अधीक्षकांनी पुढे नमूद केले की, या रॅकेटमध्ये आणखी काही विश्वस्तांचा किंवा कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यांनी ज्यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा दुरुपयोग करून भाविकांची लूट केली आहे, त्या सर्वांची विभागीय चौकशी आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.










