Home / महाराष्ट्र / Omraje Nimbalkar : प्रत्येक फुटीर जे कारण देतो तेच दिले ! निधी मिळत नाही! निंबाळकरांनी उबाठा सोडली

Omraje Nimbalkar : प्रत्येक फुटीर जे कारण देतो तेच दिले ! निधी मिळत नाही! निंबाळकरांनी उबाठा सोडली

Omraje Nimbalkar- मी अजूनही पक्षप्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे काल जाहीरपणे म्हणणारे धाराशीवचे उबाठाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज...

By: Team Navakal
Omraje Nimbalkar
Social + WhatsApp CTA

Omraje Nimbalkar- मी अजूनही पक्षप्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे काल जाहीरपणे म्हणणारे धाराशीवचे उबाठाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. हा निर्णय घेताना प्रत्येक लोकप्रतिनिधी जे कारण देतो, तेच विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचे कारण त्यांनी दिले. आज त्यांनी गोवर्धनवाडी येथील आपल्या कार्यकर्त्यांशी तब्बल चार तास चर्चा केली. मात्र ही चर्चा म्हणजे एक नाटकच होते. या चर्चेनंतर ते म्हणाले की, लोकांनी आम्हाला अपेक्षेने निवडून आणले. पण साधी ट्रान्सफॉर्मरची कामे होत नव्हती. त्यामुळे मी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.


ओमराजे निंबाळकर म्हणाले की, मी धाराशिवात आल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा आणि मते जाणून घेतली. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकात आपल्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला होता. त्यासोबत मी सामान्य लोकांसाठी 24 तास प्रामाणिकपणे कामे केली. मी आमच्या कामात कमी पडलो नाही. सत्तेत नसल्यामुळे काम करताना लोकप्रतिनिधी म्हणून अडचणी येत होत्या. त्यामुळे सर्वांच्या मताने मी निर्णय घेतला आहे की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून, त्यांच्या नेतृत्वात काम करणार आहे. काही लोक म्हणतात की, मी निकाल लावण्यासाठी गेलो होतो. पण जर तसे असते, तर मी 22 तारखेलाच गेलो असतो ना? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भागातील प्रश्नांची आणि कार्यकर्त्यांची दखल घेतली आहे. निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी माझे बोलणे झाले, त्यांनी अमित शहा यांच्याशी देखील माझे बोलणे करून दिले. आम्ही त्यांना इतकीच विनंती केली आम्हाला कोणाचा फेवर नकोय, पण आम्ही जो संघर्ष मागच्या 20 वर्षांपासून करत आहोत, न्याय मागत आहोत आणि तो न्याय आम्हाला मिळाला पाहिजे. त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे यांनी समोर येऊन म्हटले होते की, सीबीआय त्या ठिकाणी हायकोर्टात अपील दाखल करणार आहे.


फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंड थोपवण्यासाठी उबाठाने मध्यरात्री पक्षाचे सरचिटणीस वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांना पुण्यातील ओमराजेंच्या निवासस्थानी पाठवले. या गुप्त भेटीत त्यांची मनधरणी करण्यात आली. ही भेट अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती. या भेटीनंतर सरदेसाई यांनी पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालामुळे निंबाळकर कुटुंब खचले असल्याचे सांगत, त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो असे म्हटले. मात्र ओमराजे निंबाळकर हे उबाठा पक्ष सोडणार हे तोपर्यंत निश्चित झाले  होते. ओमराजे यांना बळ देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पुण्याहून तानाजी सावंत यांना त्यांच्याकडे पाठवले आहे. ओमराजे निंबाळकर पुण्याहून निघताना म्हणाले होते की, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत मी कोणत्याही पत्रकार परिषदेत किंवा माध्यमांमध्ये काहीही बोललेलो नाही. भविष्यातही काही बोलणार नाही. पक्षाबाबत कोणताही निर्णय मी अद्याप घेतलेला नाही. तरीही माझ्या संपूर्ण कुटुंबाची बदनामी करण्यात आली, तेही मी सहन केले. या राजकीय प्रक्रियेत माझ्या कुटुंबाने तुमचे नेमके काय बिघडवले आहे? केवळ एका चर्चेमुळे मी इतका वाईट ठरलो का? ‘रीलस्टार’ म्हणून मला हिणवण्यात आले. पण जर मी फक्त रीलस्टार असतो, तर जनतेने मला एवढ्या मतांनी निवडून दिले असते का?


उबाठाचे हिंगोलीचे बंडखोर खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी आज प्रथमच आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, मी उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज नाही. उद्धव ठाकरे यांनी मला खूप प्रेम दिले. संजय राऊत किंवा आणखी कोणी बोलत असेल तर त्यांचाही माझ्यावर हक्क आहे. त्यामुळे ते माझ्याविरोधात बोलले तरी मला वाईट वाटणार नाही. 18 तारखेपर्यंत आम्ही कोणीही कुठेच गेलेलो नव्हतो. मात्र, ज्या पद्धतीने अविश्वास दाखवला गेला किंवा बोलण्याचा अतिरेक झाला, त्यामुळे बर्‍याच मंडळींनी असा विचार केला की, आता उबाठात थांबून काही उपयोग होणार नाही. सत्तेशिवाय कोणतीही कामे होत नाहीत. त्यामुळे मी हे पाऊल उचलले आहे. माझ्या मतदारसंघात विकासकामे करावी लागतील, लोकांनी मला खूप मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेले आहे. त्यामुळे मला लोकांची कामे करणे क्रमप्राप्त आहे. विकासासाठी कुठलाही निधी मिळत नव्हता. केवळ खासदारांना मिळणारा 5 कोटींचा निधी गावोगावच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अतिशय अपुरा पडतो. प्रत्येक गावात गेल्यावर लोकांना विकासाची अपेक्षा असते. जर निधीच नसेल, तर मी लोकांची कामे कशी करू? माझा निर्णय कदाचित काहींना पटला असेल, तर काहींना पटला नसेल.

राजुल पाटील तूर्त ठाकरेंच्या बरोबरच
बंडखोर संजय दिना पाटील यांच्या समर्थनात मुंबईत शिंदे सेनेने जोरदार बॅनरबाजी केली. त्यानंतर उबाठामध्ये असलेल्या त्यांच्या कन्या नगरसेवक राजुल पाटील या आज उध्दव ठाकरे यांना भेटायला मातोश्रीवर गेल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की माझ्या वडिलांनी जो निर्णय घेतला तो ते सांगतील, मी उबाठातच आहे. राजुल पाटील या पहिल्यांदाच नगरसेविका झाल्या आहेत. उबाठाच्या स्थानिक कार्यकर्तीला डावलून संजय दिना पाटील यांच्या आग्रहाखातर त्यांना उध्दव ठाकरे यांनी तिकीट दिले असे संजय राऊत यांनी सांगितले होते. राजुल पाटील यांनी आज पक्ष सोडला तर त्यांचे नगरसेवक पद जाते. यामुळेच त्या उबाठा सोबत राहिल्या आहेत अशी चर्चा आहे. सुषमा अंधारे यांनी राजुल पाटील यांच्यावर टीका करताना म्हटले की वडिलांनी अशा पध्दतीने पक्ष सोडल्यावर आता आम्हाला त्यांच्या कन्येवर अजिबात विश्वास राहिलेला नाही.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या