NEET : पेपरफुटीमुळे पुन्हा घ्यावी लागलेली नीट परीक्षा आज देशभरात अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत निर्विघ्नपणे पार पडली. यापूर्वी झालेला घोळ लक्षात घेऊन परीक्षा केंद्रांवर कडक तपासणी, सीसीटीव्ही आणि जॅमरची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच या परीक्षेसाठी 2 लाखांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र अजमेर, अहमदाबाद आणि गुरुग्राम येथील केंद्रांवर बुरखा, हिजाब, कलावा (गंडा) आणि धार्मिक प्रतीकांवरून वाद निर्माण झाले. तर मुंबईसह काही ठिकाणी उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याने केंद्रांबाहेर काहीसा गोंधळ उडाला.
देशभरातील 551 शहरांतील 5,440 केंद्रांवर आणि परदेशातील 14 केंद्रांवर 22.79 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. एनटीएच्या माहितीनुसार, 95 हजारांहून अधिक परीक्षा कक्षांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा, 1.38 लाखांहून अधिक कॅमेरे आणि 51 हजारांहून अधिक जॅमर लावण्यात आले होते. मात्र, काही ठिकाणी किरकोळ कारणावरून वाद झाला. राजस्थानमधील अजमेर येथे कुलसुम बानो नावाच्या विद्यार्थिनीने आरोप केला की, परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी तिला बुरखा काढण्यास सांगितले. या विद्यार्थिनीने सांगितले की, 3 मे रोजी झालेल्या परीक्षेलाही तिने हाच पोशाख करून परीक्षा दिली होती. एनटीएने परवानगी दिली असेल, तर इतर कुणी मला आम्हाला रोखू शकत नाही. या पोशाखात परीक्षा देऊ दिली नाही, तर मी परीक्षा देणारच नाही. माझ्यासाठी परीक्षा महत्त्वाची नाही, माझी ओळख आणि माझा बुरखा महत्त्वाचा आहे. तर गुजरातमधील अहमदाबादच्या वस्त्रापूर भागातील परीक्षा केंद्रात काही मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब काढण्यास सांगण्यात आल्याचा आरोप केला. त्याचवेळी काही हिंदू विद्यार्थ्यांच्या हातातील कलावा (पवित्र गंडा) सुरक्षा तपासणीदरम्यान कापल्याची तक्रार पालकांनी केली. या घटनेनंतर केंद्राबाहेर पालकांनी आक्षेप घेतला. पोलिसांनी नंतर स्पष्ट केले की, काही सुरक्षा कर्मचार्यांना परीक्षेच्या मार्गदर्शक सूचनांची पुरेशी माहिती नव्हती. त्यानंतर मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाबसह प्रवेश देण्यात आला, तर हिंदू विद्यार्थ्यांनाही कलावा ठेवण्याची परवानगी देण्यात आली. मात्र ज्यांचे कलावे आधीच कापण्यात आले होते,
त्यांच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली. हरियाणातील गुरुग्राममध्येही काही विद्यार्थ्यांनी गळ्यातील रुद्राक्ष माळ काढल्याचा आणि हातातील लाल-काळे धार्मिक दोरे कापल्याचा आरोप केला. कादीपूर वरिष्ठ माध्यमिक विद्यालय आणि सेक्टर-9 येथील सरकारी महाविद्यालयासह काही केंद्रांवर या घटना घडल्याचे पालकांनी सांगितले. राजस्थानमधील अलवर येथे एका विद्यार्थिनीला जुन्या प्रवेशपत्रामुळे धावपळ करावी लागली. ती मे महिन्यातील परीक्षेच्या जुन्या केंद्रावर पोहोचली होती. दस्तऐवज तपासणीदरम्यान तिचा रोल नंबर आणि परीक्षा केंद्र बदलल्याचे अधिकार्यांच्या लक्षात आले. ऑनलाईन नोंदी तपासल्यानंतर तिचे खरे परीक्षा केंद्र राजगढ येथे असून, ते सुमारे 40 किलोमीटर दूर होते. कुटुंबीय निघून गेले असल्याने शाळा प्रशासनाने वाहनाची व्यवस्था करून तिला वेळेत योग्य केंद्रावर पोहोचवले. मुंबईत कुर्ला आणि डोंबिवली येथील दोन विद्यार्थी परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेनंतर पोहोचल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. कर्नाटकातील बंगळुरूमध्येही दुपारी 1.30 नंतर परीक्षा केंद्रावर पोहोचल्यामुळे चार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यांच्या पालकांनी काँग्रेसच्या रॅलीमुळे वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप केला. मात्र परीक्षा अधिकार्यांनी एनटीएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वेळेनंतर प्रवेश देता येणार नाही, अशी भूमिका घेतली. या परीक्षेत पेपरफुटी रोखण्यासाठी पहिल्यांदाच भारतीय वायुसेनेची विमाने आणि हेलिकॉप्टर वापरण्यात आली. वायुसेनेने 200 हून अधिक उड्डाणे करून प्रश्नपत्रिका देशभरातील वेगवेगळ्या झोनपर्यंत पोहोचवल्या. दरम्यान, दरम्यान, पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू असून, अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे.










