Omraje Nimbalkar : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर हे सहा खासदार पक्षाची साथ सोडणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. या मोठ्या राजकीय भूकंपानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. पक्ष सोडण्याचा हा निर्णय भावनिक पातळीवर चुकीचा आणि वेदनादायी वाटत असला, तरी स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी आणि मतदारसंघाच्या हितासाठी तो राजकीयदृष्ट्या अत्यंत योग्य व अनिवार्य असल्याचा सूर त्यांनी आळवला आहे. मतदारसंघातील विकासकामांसाठी लागणाऱ्या निधीचा प्रचंड अभाव आणि भविष्यातील राजकीय अस्तित्वाचे संकट ही या बंडखोरीमागील मुख्य कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याबाबतचा अंतिम निर्णय आपण २० जूननंतर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुलाखतीदरम्यान आपल्या मनातील घालमेल व्यक्त करताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, “मी सध्या अत्यंत मोठ्या धर्मसंकटातून जात आहे. जर मी केवळ भावनेच्या भरात विचार केला, तर हे पाऊल पूर्णपणे चुकीचे वाटते; कारण पक्षाशी आमचे भावनिक ऋणानुबंध आहेत. परंतु, जेव्हा मी व्यावहारिक आणि राजकीय दृष्टिकोनातून विचार करतो, तेव्हा हा निर्णय अत्यंत योग्य वाटतो. एक खासदार म्हणून जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मला माझी हक्काची माणसे निवडून आणता येत नसतील, तर भविष्यात माझे राजकीय अस्तित्वच धोक्यात येईल. मतदारसंघात रस्ते, पूल, वीज वितरण रोहित्र (डीपी) यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी मी शासनाकडे वारंवार प्रस्ताव सादर केले. परंतु, दुर्दैवाने आमच्याकडे सत्ता आणि विकासनिधी नसल्याने ही कामे रखडली आणि आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो नाही. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना लोकांची कामे न होणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे.”
या पक्षांतरामागे सत्ताधारी महायुतीकडून मिळालेले कोणतेही आमिष नसल्याचे स्पष्ट करत ओमराजे निंबाळकर यांनी पैशांचे आणि सुरक्षेचे सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, “माझ्यावर शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे. परंतु, माझे दिवंगत वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल प्रलंबित असून, तो निकाल आल्यानंतर मी सर्व कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष चर्चा करूनच अंतिम निर्णय घेईन. काही माध्यमांमध्ये मला ‘वाय प्लस’ सुरक्षा मिळाल्याच्या किंवा आर्थिक सौदेबाजी झाल्याच्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्या संपूर्णपणे तथ्यहीन आणि खोट्या आहेत. हा निर्णय केवळ आणि केवळ माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी घेतला जात आहे.” यावेळी त्यांनी महायुतीच्या नेतृत्वाचे कौतुक करताना उबाठाच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे अहोरात्र मेहनत घेत जनतेत फिरत असतात, असे सांगून ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणास्तव सातत्याने फिरणे शक्य नसले, तरी युवा नेते आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहून पक्ष सांभाळायला हवा होता.
दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांच्या या भूमिकेनंतर उबाठा गटातील त्यांचे निकटवर्तीय आमदार कैलास पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमदार पाटील म्हणाले की, “खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी माझा अद्याप कोणताही संपर्क झालेला नाही. आम्ही पक्षाचे निष्ठावान पदाधिकारी असून पक्षाच्या आगामी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी मुंबईला जात आहोत. उद्या मुंबईत पक्षप्रमुखांनी सर्व आमदार, जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आम्हाला ज्या काही सूचना आणि आदेश देतील, त्यानुसार आम्ही पुढील रणनीती आखू आणि पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत राहू.











