Praful Patel : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) अंतर्गत संघर्षाची एक नवी ठिणगी पडली आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सर्वोच्च पदाला आता पक्षातूनच थेट आव्हान देण्यात आले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठवून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. सिंह यांनी ९ जुलै (२०२६) रोजी ही नोटीस बजावली असून, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नव्याने आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या कायदेशीर नोटीसमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर सोपवली होती धुरा; अध्यक्षपदावरून नवा वाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षाला मोठा धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर, पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी २६ फेब्रुवारी (२०२६) रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभेत पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा केली होती. मात्र, आता अवघ्या काही महिन्यांतच या निवडीला पक्षांतर्गत नेत्याकडूनच न्यायालयात खेचण्याची तयारी सुरू झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या कायदेशीर आव्हानाला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृतपणे काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“माझा नोटीसशी संबंध नाही, पण पक्षात सुधारणांची गरज” – प्रफुल पटेल
सुनेत्रा पवार यांना पाठवण्यात आलेल्या कायदेशीर नोटीसवर भाष्य करताना प्रफुल पटेल म्हणाले की, “या नोटीसशी माझा वैयक्तिक किंवा राजकीय दृष्ट्या कोणताही संबंध नाही. तसेच या नोटीसला राजकीय वर्तुळात फारसे महत्त्व देण्याचे काहीच कारण नाही. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड पूर्णपणे पक्षाच्या घटनेला आणि नियमांना धरूनच झालेली आहे.”
मात्र, पुढे बोलताना त्यांनी पक्षात अंतर्गत बदलांचे संकेत दिले. “अजित पवार यांच्या निधनामुळे पक्षामध्ये एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. ही पोकळी भरून काढणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी पक्षसंघटनेत काही महत्त्वाच्या सुधारणा करणे आवश्यक आहे. हे मत मी ही नोटीस येण्यापूर्वीच एका अनौपचारिक गप्पांदरम्यान मांडले होते. माझ्या त्या वैयक्तिक मताचा आणि या नोटीसचा कोणताही संबंध जोडला जाऊ नये,” असे स्पष्टीकरण पटेल यांनी दिले.
कोण आहेत आक्षेप घेणारे सच्चिदानंद सिंह?
सुनेत्रा पवार यांच्या निवडीला आव्हान देणारे सच्चिदानंद सिंह हे पक्षातील जुने आणि महत्त्वाचे पदाधिकारी आहेत:
१. झारखंडचे प्रदेशाध्यक्ष: ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे झारखंड राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
२. १५ वर्षांचा कार्यकाळ: ते गेल्या १५ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठेने जोडलेले आहेत.
३. अजित पवारांचे विश्वासू: अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असताना, डिसेंबर २०२३ मध्ये कर्जत येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात सिंह यांची पक्षाचे ‘राष्ट्रीय सचिव’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
४. कार्यकारिणीतून डावलले: २६ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीत सच्चिदानंद सिंह यांचा समावेश करण्यात आला नव्हता, ज्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे.
वरिष्ठ नेत्यांच्या पदांबाबत संभ्रम; पडद्यामागच्या सूत्राचा शोध सुरू-
फेब्रुवारी महिन्यात प्रफुल पटेल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाशी (ECI) केलेला पत्रव्यवहार सुनेत्रा पवार यांनी मार्च महिन्यात एक पत्र पाठवून अधिकृतपणे रद्द केला होता. त्या पत्रात प्रफुल पटेल यांचा उल्लेख केवळ ‘राज्यसभेचे गटनेते’ आणि सुनील तटकरे यांचा उल्लेख ‘लोकसभेचे गटनेते’ असा करण्यात आला होता. या घटनेला ४ महिने उलटून गेले तरी अद्याप या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या पक्षातील मूळ पदांबाबतचा संभ्रम कायम आहे. निवडणूक आयोगाशी नव्याने कोणताही अधिकृत पत्रव्यवहार झाला आहे की नाही, यावर पक्षाने अद्याप मौन बाळगले आहे.
जय पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष; पक्षात पुन्हा गटबाजीची चर्चा
सच्चिदानंद सिंह यांनी हे पाऊल स्वतःहून उचलले आहे की यामागे पक्षातीलच एखाद्या बड्या नेत्याचे डोके आहे, याचा शोध आता राष्ट्रीय अध्यक्षांच्या गोटातून घेतला जात आहे. यापूर्वी पक्षात प्रफुल पटेल व सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार व पार्थ पवार असा सुप्त संघर्ष पाहायला मिळाला होता.









