Home / महाराष्ट्र / Pune Crime Gang : पुण्यात आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरचा भयंकर थरार! आधी नातू, मग आरोपीचा भाऊ अन् आता…; सूडाची रक्ताळलेली मालिका थांबेना, वाचा काय आहे मूळ पार्श्वभूमी!

Pune Crime Gang : पुण्यात आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरचा भयंकर थरार! आधी नातू, मग आरोपीचा भाऊ अन् आता…; सूडाची रक्ताळलेली मालिका थांबेना, वाचा काय आहे मूळ पार्श्वभूमी!

विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाने डोके वर काढले असून, गुन्हेगारी विश्वातील वर्चस्ववादातून रक्ताचा सडा पडला आहे....

By: Team Navakal
Pune Crime Gang
Social + WhatsApp CTA

विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाने डोके वर काढले असून, गुन्हेगारी विश्वातील वर्चस्ववादातून रक्ताचा सडा पडला आहे. पुण्यातील धनकवडी-बालाजीनगर परिसरात बुधवारी दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या आणि कोयत्याने केलेल्या हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने, त्या प्रकरणातील एका आरोपीच्या भावावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत अक्षय ऊर्फ बाळा बापू म्हस्के (वय २६, रा. आंबेगाव पठार) हा युवक गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांनी तत्परता दाखवत गुन्हे शाखेच्या माध्यमातून आंदेकर टोळीशी संबंधित चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

घटनेच्या सविस्तर तपशिलानुसार, जखमी अक्षय म्हस्के हा आंदेकर खून प्रकरणातील आरोपी आकाश म्हस्के याचा सख्खा भाऊ आहे. आकाशवर मध्य प्रदेशातून गुन्ह्यासाठी पिस्तुले पुरवल्याचा आरोप असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. बुधवारी सकाळी अक्षय हा पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर येथील राजर्षी शाहू बँकेसमोरील एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी आला होता. तो तिथे थांबला असतानाच, दुचाकीवरून आलेल्या सहा हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी प्रथम पिस्तुलातून गोळ्या झाडल्या, ज्यातील एक गोळी अक्षयच्या पायाला लागली. तो जखमी अवस्थेत खाली कोसळल्यानंतर नराधम हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले आणि तिथून पळ काढला. या थरारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांनी भीतीपोटी दुकाने बंद केली होती.

पुण्यातील या टोळीयुद्धाची मुळे सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या वनराज आंदेकर यांच्या हत्येत दडलेली आहेत. नाना पेठेतील डोके तालीम चौकात वर्चस्ववाद आणि कौटुंबिक संपत्तीच्या वादातून माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात आंदेकर यांच्या बहिणीसह, मेहुणे आणि इतर १६ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, या हत्येचा बदला घेण्याचे सत्र थांबलेले नाही. यापूर्वी ५ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आरोपी गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष याची आंदेकर टोळीकडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर १ नोव्हेंबर २०२५ रोजी कोंढवा परिसरात समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याचाही गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

बदल्याच्या या अग्नीत आता अक्षय म्हस्के याला लक्ष्य करण्यात आल्याने पुण्याचे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. आंदेकर आणि कोमकर या दोन गटांमधील वैमनस्य आता तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत. प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वैमनस्यातून आणि वनराज आंदेकर हत्येचा सूड घेण्यासाठीच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शहरात पुन्हा एकदा गँगवॉर भडकल्याने गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या