NEET Paper Leak : देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET-UG) प्रवेश परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे आता बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचले असून, या प्रकरणातील ‘बीड कनेक्शन’ दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे. या महाघोटाळ्याचा मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी याचे नाव बीडशी जोडले गेल्यानंतर आता शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लातूर येथील नामांकित शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर हे बीडमधील ‘प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन’ या प्रतिष्ठित शिक्षक संघटनेचे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून कार्यरत होते, असे उघड झाले आहे. या खुलाशामुळे मोटेगावकर यांच्याशी व्यावसायिक हितसंबंध असलेल्या बीडमधील अनेक खाजगी क्लास चालकांचे धाबे दणाणले असून, ते आता संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
या प्रकरणातील गुपित उघड झाले ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या एका निवेदनामुळे. ‘प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन’ने २०२४ मध्ये ‘नीट’ परीक्षेच्या संदर्भात काही मागण्यांसाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक अधिकृत निवेदन सादर केले होते. या निवेदनाच्या लेटरहेडवर प्रा. शिवराज मोटेगावकर यांचा संघटनेचे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून अत्यंत ठळकपणे उल्लेख करण्यात आला होता. बीडमधील शाहूनगर हा भाग शैक्षणिक संकुलांचे केंद्र मानला जातो, जिथे एकाच छताखाली अनेक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दिले जाते. मोटेगावकर यांचे या भागातील अनेक मोठ्या क्लास चालकांशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जात असून, आता तपास यंत्रणा या व्यावसायिक संबंधांची सखोल चौकशी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या गंभीर विषयावर पडदा टाकण्यासाठी किंवा आपली बाजू सावरण्यासाठी संघटनेत आता हालचाली सुरू झाल्या आहेत. ‘प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन’चे माजी राज्याध्यक्ष विजय पवार यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्यांनी यापूर्वीच आपल्या पदाचा त्याग केला आहे. मात्र, नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकर यांचे नाव येताच संघटनेने नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांना तत्काळ सर्व पदांवरून मुक्त केले आहे. इतकेच नव्हे तर, संघटनेशी संबंधित सर्व सोशल मीडिया समूहांमधूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. या कृतीतून संघटनेने मोटेगावकर यांच्यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला आहे.
दुसरीकडे, संघटनेच्या सध्याच्या नेतृत्वाने मात्र या प्रकरणावर मौन बाळगणे पसंत केले आहे. विद्यमान अध्यक्ष प्रशांत कासार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मोटेगावकर यांच्या नियुक्तीबद्दल अनभिज्ञता व्यक्त करत या संवेदनशील विषयाला बगल दिली. “मोटेगावकर हे ब्रँड ॲम्बेसेडर होते की नाही, याची मला कल्पना नाही,” असे संशयास्पद उत्तर देऊन त्यांनी अंग झटकण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे तपास यंत्रणांचे जाळे विस्तारत असताना, बीडमधील या नवीन घडामोडींमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.










