Raj Thackeray : आपल्या सदाबहार आणि अवीट गाण्यांनी जागतिक संगीतविश्वात अजरामर ठरलेल्या गानसम्राज्ञी पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आशाताईंच्या निधनानंतर राज्य विधिमंडळाचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने, विधानसभा सभागृहात त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ शोकप्रस्ताव मांडण्यात आला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा शोकप्रस्ताव वाचून दाखवला. मात्र, हा प्रस्ताव वाचताना अध्यक्षांकडून झालेल्या चुकीच्या नावांच्या उल्लेखावरून आणि अशुद्ध उच्चारांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र संताप आणि उद्वेग व्यक्त केला आहे.
“कागदावर लिहिलेलं मराठीही वाचता येत नाही का?” – राज ठाकरेंचा उपरोधिक टोला
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या शोकप्रस्तावाचे वाचन करताना विधानसभा अध्यक्षांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली, त्यावर राज ठाकरेंनी कडक शब्दांत आक्षेप घेतला. ते म्हणाले, “कागदावर लिहून दिलेले शुद्ध मराठी देखील विधानसभा अध्यक्षांना नीट वाचता येत नाही, हे पाहून संताप आणि उद्वेग दोन्ही दाटून आले. हा शोकप्रस्ताव वाचण्यापूर्वी त्यांनी त्या कागदातून भेळ खाल्ली होती की काय?”
पुढे टोला लगावताना राज ठाकरे म्हणाले की, हा शोकप्रस्ताव राहुल नार्वेकरांनी स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चालले असते; कारण त्यांचे मराठी कोणाला कळले नाही आणि स्वाहिली किंवा हिब्रू भाषा तशीही कोणाला समजत नाही. यापेक्षा मोठी शोकांतिका म्हणजे, नार्वेकर हे संगीत महर्षी पंडित दीनानाथ मंगेशकर यांचा उल्लेख चक्क ‘दीनदयाल मंगेशकर’ असा करत होते. त्यांना ना दीनानाथ मंगेशकर माहीत आहेत, ना दीनदयाल उपाध्याय माहीत आहेत. भारतीय जनता पक्षाने (भाजप) जी काही ‘खोगीरभरती’ सुरू केली आहे, त्यात त्यांची अवस्था ‘तेलही गेले, तूपही गेले, हाती आले धुपाटणे’ अशी झाली आहे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी भाजपच्या रणनीतीवरही निशाणा साधला.
सभागृहातील आमदारांच्या मौनावर आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका
विधानसभा अध्यक्षांकडून एवढी मोठी चूक होत असताना सभागृहात उपस्थित असलेल्या एकाही आमदाराने आक्षेप नोंदवला नाही, याबद्दल राज ठाकरेंनी आश्चर्य आणि खंत व्यक्त केली. “शोकप्रस्तावाच्या वेळी सभागृहात अनेक ज्येष्ठ आमदार उपस्थित असणार, तरीही एकानेही या चुकीचा विरोध का केला नाही?” असा सवाल त्यांनी केला.
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करताना राज ठाकरे म्हणाले, “स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात ‘गुलाबी आँखें जो तेरी देखी’ सारखी गाणी म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यातील विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करत आहोत, याचे गांभीर्य समजायला हवे होते. परंतु, फडणवीसांचे गणित सोपे आहे—सांगितलेली राजकीय फोडाफोडीची कामे व्यवस्थित होत आहेत ना, अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना? बस, झाले. मग कोणी दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो, त्यांच्यासाठी काय फरक पडतो! त्यांच्या दृष्टीने शोकप्रस्ताव हा देखील केवळ एक उपचारच होता, जो पार पडला.” माणूस सुशिक्षित असण्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे.
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली…
— Raj Thackeray (@RajThackeray) June 23, 2026
एकनाथ शिंदेंवर प्रहार आणि मराठी भाषेच्या आस्थेवर प्रश्नचिन्ह
या वादात राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही धारेवर धरले. “एकनाथ शिंदेंना या विषयाशी काही देणेघेणे असण्याचे कारणच नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचे त्यांचे विमान थेट ५० हजार फुटांवरून चालले आहे, त्यामुळे त्यांचा याच्याशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. ही आज आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे,” अशी टिप्पणी त्यांनी केली.
आपल्या निवेदनाचा समारोप करताना राज ठाकरे यांनी अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केला की, ज्या महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोर कागदावर लिहिलेले मराठी शब्दही नीट वाचता येत नाहीत, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार? किंवा महाराष्ट्रात मराठी भाषेची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी कोणती ठोस कारवाई करणार? सभापतींचे हे रेकॉर्ड झालेले भाषण पुढच्या पिढ्या पाहतील, याचे भान सध्याच्या राज्यकर्त्यांना राहिलेले नाही, अशी तीव्र खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.










