Home / महाराष्ट्र / Sandeep Deshpande : आज हुकूमशाहीविरोधात लढलो नाही, तर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल ; नीट घोटाळ्यावरून मनसे नेते संदीप देशपांडेंचा केंद्र सरकारवर प्रहार

Sandeep Deshpande : आज हुकूमशाहीविरोधात लढलो नाही, तर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल ; नीट घोटाळ्यावरून मनसे नेते संदीप देशपांडेंचा केंद्र सरकारवर प्रहार

Sandeep Deshpande : दिल्लीत ‘नीट’ (NEET) परीक्षा गैरव्यवहाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या कार्यकर्त्यांवर आणि निष्पाप विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी...

By: Team Navakal
Sandeep Deshpande
Social + WhatsApp CTA

Sandeep Deshpande : दिल्लीत ‘नीट’ (NEET) परीक्षा गैरव्यवहाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या कार्यकर्त्यांवर आणि निष्पाप विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) मुख्य सरचिटणीस आणि धडाडीचे नेते संदीप देशपांडे यांनी मंगळवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र सरकार आणि पोलीस प्रशासनावर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला. दिल्लीतील पोलीस कारवाईची तुलना थेट ‘जालियनवाला बाग’ हत्याकांडाशी करत त्यांनी लोकशाहीत हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला. तसेच, मुंबईतील नागरी दुर्घटनांवरून पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावरही त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

“विद्यार्थ्यांवर लाठीमार करणारे पोलीस नव्हे, तर ‘कायर’!”; देशपांडेंचा संताप
पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, “सोमवारी दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर ज्या क्रूरतेने लाठीमार केला, ते पाहून जालियनवाला बाग हत्याकांडात जनरल डायरने केलेल्या अमानुष गोळीबाराची आठवण झाली. काल लाठी चालवणारे पोलीस नसून ते ब्रिटिश मानसिकतेचे ‘कायर’ (भित्रे) होते. स्वतंत्र भारतात स्वतःच्या देशातील विद्यार्थ्यांशी साधे संवाद साधण्याचे सौजन्य हे सरकार दाखवू शकत नाही, ही अत्यंत शरमेची बाब आहे. पारतंत्र्यात असताना ब्रिटिश देखील महात्मा गांधी यांच्याशी चर्चा करायचे, मात्र हे सत्ताधारी चर्चेलाही तयार नाहीत. पोलिसांनी गुंडांसारखे वागणे बंद करावे. त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की, ते कोणत्याही तात्पुरत्या सरकारला नाही, तर देशाच्या ‘जनतेला’ उत्तरदायी आहेत.”

या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या भाषणांची आठवण करून दिली. “पंतप्रधान मोदी जेव्हा विरोधात होते, तेव्हा ते तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आंदोलकांवर लाठी चालवू नका, असा सल्ला द्यायचे. आता पंतप्रधानांनी स्वतःचे तेच जुने भाषण पुन्हा एकदा ऐकण्याची वेळ आली आहे,” असा टोला त्यांनी लगावला. मुंबईतील दादर येथे झालेल्या आंदोलनात पोलिसांनी तरुणींचे केस ओढून केलेल्या कारवाईचा निषेध करत देशपांडे म्हणाले, “आम्ही लोकशाहीत आंदोलनही करायचे नाही का? आता जर आपण या हुकूमशाहीविरोधात एकवटलो नाही, तर येणारी पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल.” त्यांनी अन्यायविरुद्ध लढणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, मनसे आणि देशातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे सांगितले. तसेच या संपूर्ण घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

“मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडेंचा ‘इगो’ मोदींपेक्षाही मोठा!”
दिल्लीतील आंदोलनासोबतच संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ढिसाळ कारभारावर आणि मुंबईकरांच्या सुरक्षेशी होत असलेल्या खेळखंडोबावर तीव्र आक्षेप घेतला. चेंबूर परिसरात झाड कोसळून एका चिमुरड्याचा झालेला दुर्दैवी मृत्यू आणि मुंबईत अन्य एका घटनेत गटारात पडून झालेल्या नागरिकाच्या मृत्यूचा संदर्भ देत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

ते म्हणाले, “मुंबईत पालिकेच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. मात्र, पालिकेने तयार केलेल्या चौकशी अहवालात या मृत्यूंसाठी कोणालाही जबाबदार धरण्यात आलेले नाही. ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब आहे. चेंबूरच्या दुर्घटनेत केवळ कंत्राटदाराला नाममात्र दंड ठोकून अधिकाऱ्यांना वाचवण्यात आले. मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांचा ‘इगो’ (अहंकार) देशाच्या पंतप्रधानांपेक्षाही जास्त आहे. आम्ही या नागरी समस्यांबाबत त्यांना अधिकृत पत्र लिहिले होते, परंतु त्यांनी पत्राचे उत्तर देणे तर लांबच, पण लोकप्रतिनिधींना भेटण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही.”

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या