Sharad Pawar : भाजपाने लोकसभा व राज्यसभेत पाशवी बहुमत असावे यासाठी फोडाफोडीची सीमा पार केली आहे. उबाठाचे खासदार फोडल्यानंतर आता शरद पवार गटाचे सर्वच्या सर्व नऊ खासदारांना आपल्यासोबत घेण्याचे जाळे टाकले आहे. हे खासदार भाजपात जातील किंवा भाजपाला पाठिंबा जाहीर करतील. शरद पवार आपले पत्ते शेवटच्या क्षणापर्यंत कधीच उघड करीत नाहीत, पण यावेळी त्यांच्या सहकारी काँग्रेस पक्षाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आजच सांगितले की, होय याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राला सत्ता व संपत्तीच्या लालसेपोटी होणार्या भूकंपांची आता सवय करण्याची वेळ आली आहे.
‘ऑपरेशन टायगर’मुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उडालेली खळबळ शांत होत नाही तोच महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याची जोरात चर्चा होत आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएत सहभागी होण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, अशी चर्चा सुरू असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलिन होणार अशी चर्चाही गेले काही दिवस सुरू आहे. ती मुद्दाम सुरू ठेवली आहे का, असा संशय आता येत आहे. शरद पवार गट एनडीएत सामील झाल्यास आजवर अनेकदा उलटसुलट राजकीय भूमिका घेणार्या शरद पवार यांच्या धक्कादायक राजकारणाचा आणखी एक अध्याय पाहायला
मिळणार आहे.
सत्तेत नसल्यामुळे मतदारसंघातील विकासकामे करता येत नाहीत, अशी तक्रार असलेले शरद पवार गटाचे काही खासदार आणि आमदार थेट ‘एनडीए’मध्ये जाण्यास उत्सुक असल्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यातील गुप्त बैठक महत्त्वाची मानली जात आहे. भाजपाला संसदेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करायचे आहे. यासाठी दोन तृतियांश बहुमताची गरज असल्याने 319 खासदार असलेल्या एनडीएला अधिकाधिक खासदार आपल्या गोटात हवे आहेत. शरद पवार गटाकडे लोकसभेचे 8 खासदार आणि राज्यसभेचा 1 खासदार (स्वतः शरद पवार) आहेत. शरद पवार यांचा गट एनडीएत आल्यास दोन तृतियांश खासदार मिळवण्याच्या दृष्टीने त्यांची वाट सोपी होईल, असे गणित या ‘ऑपरेशन
तुतारी’मागे आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत पाटील- बैठकीत शरद पवार जर एनडीएमध्ये अधिकृतपणे सहभागी झाला, तर त्यांच्या वाट्याला सत्तेत नेमके काय येऊ शकते, यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर बोलणे झाले. महायुतीत थेट सामील न होता केवळ बाहेरून पाठिंबा देण्याच्या पर्यायावरही तावडे आणि पाटील यांच्यात चाचपणी झाली. तावडे यांच्याशी झालेल्या या दीर्घ चर्चेनंतर जयंत पाटील यांनी आपल्या पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांशीही संपर्क साधून पुढील रणनीतीबाबत संवाद साधल्याची माहिती आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे किमान 5 खासदार आमच्या पक्षात (राष्ट्रवादी अजित पवार गट) येऊ शकतात. येत्या 12 डिसेंबरपर्यंत या खासदारांचा प्रवेश सोहळा होऊ शकतो, असे म्हटले होते.
शरद पवार गट एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चांबाबत आ. रोहित पवार यांना विचारले असता त्यांनी ही शक्यता स्पष्ट फेटाळून लावली. ते म्हणाले की, अशी फक्त चर्चा सुरू आहे. मात्र त्यात कुठलेही तथ्य नाही. आमची केंद्रात कोणत्याही एनडीएच्या नेत्यासोबतही चर्चा सुरू नाही. राज्यातही कोणासोबत चर्चा चालू नाही. काँग्रेसच्या नेत्यांसोबतही चर्चा सुरू नाही. आम्ही विरोधातील पक्ष, पुरोगामी विचारांचा पक्ष, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष म्हणून पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली 60 वर्षे भाजपाच्या विचारांच्या विरोधात लढत आहोत. आम्ही फक्त महाराष्ट्र धर्म आणि सर्वसामान्यांची भूमिका मांडत आहोत. आम्ही विरोधी पक्ष म्हणून सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि कष्टकर्यांचे प्रश्न असेच मांडत राहू.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार मात्र यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, चर्चा करण्याला अर्थ नाही. पण चर्चा सुरू आहे एवढे मात्र नक्की आहे. आता त्यांना कोणता रस्ता सोयीस्कर ठरतो हे त्यांनी ठरवायचे आहे. वैचारिक की सत्तेचा? सत्ता हवी आहे की पुरोगामी महाराष्ट्राचे पुरोगामित्व सांभाळून छत्रपती शिवरायांच्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, आई सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर विश्वास ठेवायचा आहे, की धन, संपत्ती आणि सत्ता मंत्री यावर विश्वास ठेऊन काम करायचे आहे, याचा संबंध त्यांच्याशी आहे. त्यावर मी भाष्य करायची गरज नाही.
ठाकरे गटाला एकाकी पाडण्याची ही शरद पवारांची ही खेळी असल्याचीही चर्चा होत आहे. मात्र, ठाकरे गटाकडून याबाबतीत कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा रंगली होती. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले असते, तर ते एनडीएसोबत राहणार की इंडिया आघाडीसोबत, हा प्रश्न अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे कायमचा अनुत्तरित राहिला. मात्र, आता जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात झालेल्या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवीन कलाटणी मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नर्मदा प्रकल्पाच्या बैठकीसाठी दिल्लीत आलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याविषयी म्हणाले की, महाराष्ट्रातून कोणत्याच नव्या पक्षाला एनडीएत प्रवेश दिला जाणार नाही. शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार, खासदार आम्ही फोडणार नाहीत.
शरद पवार-फडणवीस यांची
आज विधान भवनात बैठक
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात होणार्या आगामी सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उद्या विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील वरिष्ठ नेते, तज्ज्ञ तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयातील लढ्याची पुढील रणनीती, कायदेशीर बाजू अधिक भक्कम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि सीमाप्रश्नी राज्याची भूमिका यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या अनेक महिन्यांपासून उच्चाधिकार समितीची बैठक बोलावण्याची मागणी केली होती. त्यानुसार 30 जून रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, प्रशासकीय कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.
पवारांचे चक्रावणारे राजकारण
शरद पवार यांचे राजकारण भल्याभल्यांना उमगत नाही, असे म्हटले जाते. कारण शरद पवार यांनी आपल्या चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा चकीत करणार्या भूमिका घेतल्या आहेत. काँग्रेसमधून आपल्या राजकारणाची सुरुवात करणारे शरद पवार 1978 मध्ये राज्यातील वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधून 40 आमदारांसह बाहेर पडले होते. त्यानंतर पुरोगामी लोकशाही दल (पुलोद)ची स्थापन करून ते महाराष्ट्राचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री बनले. यावेळी वसंतदादा पाटील खंजीर खुपसण्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. शरद पवार यांनी काँग्रेस एस स्थापन करून काँग्रेसशी फारकत घेतली. 1986 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. मात्र, 1999 मध्ये सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळाचा उपस्थित करत पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने स्वतंत्र निवडणुका लढवल्या. मात्र, नंतर दोन्ही पक्षांनी आघाडी करून सत्ता स्थापन केली. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दिल्लीतील सरकारमध्येही सामील झाला. 2014 च्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला बहुमत मिळाले होते. त्यावेळी दोन्ही पक्षांत खातेवाटपावरून तणाव सुरू असताना शरद पवार यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. 2019च्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि शिवसेनेसोबत महाविकास आघाडी स्थापन करून राष्ट्रवादी पक्ष उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाला.










