Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य मानले जाणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईत आयोजित एका विशेष कार्यक्रमात बोलताना पवार यांनी मोदींच्या जागतिक धोरणांचे समर्थन केल्याने महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये आश्चर्याचे आणि नाराजीचे वातावरण पसरले आहे.
मोदींच्या जागतिक प्रतिमेचे पवारांकडून समर्थन
या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी अत्यंत अनपेक्षितपणे पंतप्रधानांची स्तुती केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात भारताची प्रतिष्ठा आणि मान उंचावण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत,” असे गौरवद्गार त्यांनी काढले. एरव्ही केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवणारे पवार अचानक मोदींच्या समर्थनात बोलल्याने सगळ्याच्याच भुवया उंचावल्या आहेत. केवळ मोदीच नव्हे, तर यावेळी त्यांनी अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या कामाचेही कौतुक केले. या विधानांमुळे शरद पवार गटाचे युवा आमदार रोहित पवार नाराज असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे.
भूमिकेतील अचानक बदल चर्चेच्या केंद्रस्थानी
विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट असून केंद्र सरकारने सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती. मात्र, अल्पावधीतच त्यांनी आपली भूमिका बदलून थेट पंतप्रधानांचे कौतुक केल्यामुळे त्यांच्या या ‘नव्या राजकीय खेळी’मागे नेमका काय हेतू आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
संजय राऊत यांचा आक्रमक पवित्रा
शरद पवारांच्या या विधानावर ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत आपली असहमती दर्शवली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, “आम्ही शरद पवारांच्या या भूमिकेशी मुळीच सहमत नाही. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अगदी मनमोहन सिंग यांच्यासारख्या महान नेत्यांनी परदेश दौऱ्यात कधीही पत्रकारांपासून पळ काढला नाही. ते नेहमीच पारदर्शकपणे संवाद साधत असत. मात्र, गेल्या १२ वर्षांपासून पंतप्रधान मोदी माध्यमांना सामोरे जाणे का टाळत आहेत? याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, त्यांना काहीतरी सत्य लपवायचे आहे.”
रोहित पवारांची नाराजी नव्हे तर ‘रणांगण’; मुंबईतील बैठकीकडे पाठ फिरवत शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नासाठी सिंचन भवनावर धडक-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाची महत्त्वाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीला आमदार रोहित पवार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत रोहित पवार यांनी आपण शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी मैदानात असल्याचे स्पष्ट केले. पुण्याच्या सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी ‘जनाई-शिरसाई’ पाणीप्रश्नावरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
सिंचन भवनात अधिकाऱ्यांची झाडाझडती
कुकडी आणि बारामती परिसरातील ‘जनाई-शिरसाई’ उपसा सिंचन योजनेच्या रखडलेल्या निर्णयावरून रोहित पवार यांनी आज पुण्यात सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती केली. “शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा देत त्यांनी या पाणीप्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.
निर्णयातील विलंब आणि शेतकऱ्यांची कोंडी
प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “जनाई-शिरसाई धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्याचा निर्णय किमान दोन दिवसांपूर्वीच होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. फेब्रुवारी महिन्यात कालवा फुटल्याने शेतीला योग्य वेळी पाणी मिळू शकले नाही, त्याचे आवर्तन चुकले. आता पुन्हा उशीर होत असल्याने उभ्या पिकांचे नुकसान होत असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.”
बारामतीच्या पाणीप्रश्नावरून राजकीय टोला
यावेळी रोहित पवार यांनी आपल्या वक्तव्यातून राजकीय निशाणाही साधला. “बारामती हा सुनेत्रा पवार यांचा मतदारसंघ आहे. जर स्वतःच्या मतदारसंघातच शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न सुटत नसतील, तर याला जबाबदार कोण?” असा रोकडा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.










