Gulbrao Patil on Girish Mahajan : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आणि मतभेद आता उघडपणे चव्हाट्यावर आले आहेत. जागावाटप आणि मित्रपक्षांमधील बंडखोरीमुळे अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी कमालीचा गदारोळ पाहायला मिळाला. विशेषतः नाशिक आणि जळगाव या मतदारसंघांतील जागावाटपावरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात तीव्र रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. या संपूर्ण गदारोळावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट शब्दांत निशाणा साधत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जागावाटप आणि बंडखोरीवरून नाराजीचा सूर
गुलाबराव पाटील यांनी महायुतीतील ‘मोठ्या भावा’च्या भूमिकेवर बोट ठेवत भाजपला खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, महायुतीत शिवसेनेने पाच जागांची मागणी केली होती, परंतु युतीचा धर्म पाळत आम्ही केवळ चार जागांवर समाधान मानले. असे असतानाही जर भाजपचे कार्यकर्ते आमच्या हक्काच्या जागांवर बंडखोरी करत असतील, तर हा थेट आमच्यावर झालेला अन्याय आहे. जर दोन्ही पक्षांनी परस्परांशी प्रामाणिक राहून काम केले, तरच निवडणुकीत सकारात्मक निकाल मिळतील. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महायुती पुढे चालवायची असेल, तर अशा प्रकारची बंडखोरी रोखणे अत्यंत आवश्यक आहे.
गिरीश महाजन यांच्यावर खोचक टीका
नाशिक विधान परिषद जागेसाठी महायुती अधिकृतपणे मैदानात असतानाही भाजपकडून स्वतंत्र अर्ज दाखल करण्यात आला. या संदर्भात बोलताना गुलाबराव पाटील यांनी नाशिकची जबाबदारी सांभाळणारे भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर खोचक टिप्पणी केली. अर्ज मागे घेण्याची मुदत संपत आली तरी कोणताही ठोस तोडगा निघाला नव्हता. “आता कुणाच्या मनात नक्की काय चालले आहे, हे आपण कसे सांगणार? गिरीश महाजन यांनी आधी शब्द दिला होता की जळगावची जागा तुम्ही घ्या आणि नाशिकची जागा आम्हाला द्या. मात्र, आता प्रत्यक्ष निर्णय घेण्याची वेळ निघून गेल्यावर चर्चा करण्यात काय हशील?” असा सवाल करत, “लग्न लागल्यावर बाजा वाजवण्याला काय अर्थ आहे?” अशा मर्मभेदी म्हणीचा वापर करून पाटील यांनी महाजन यांना टोला लगावला.
‘मोठ्या भावाने लहान भावाची काळजी घ्यावी’
शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या नाराजीविषयी विचारले असता, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी मांडल्याचे पाटील यांनी सांगितले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नाराजी दूर केली असली, तरी मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे ते म्हणाले. “आम्ही गुवाहाटीला जाऊन धाडसी उठाव केला नसता, तर आज राज्यातील राजकीय परिस्थिती काय असती?” याची आठवण करून देत, मोठ्या भावाने (भाजपने) लहान भावाची (शिवसेनेची) योग्य ती काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बंडखोरांना आश्रय दिल्याचा आरोप
भाजपकडून नेहमीच स्थानिक स्वराज्य संस्था किंवा कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत बंडखोरीला खतपाणी घातले जाते, असा थेट आरोप गुलाबराव पाटील यांनी केला. जळगावमध्ये तर यापूर्वी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता, उलट त्यांना महत्त्वाची पदे बहाल करण्यात आली. प्रभाकर गोटू सोनवणे यांना भाजपमध्ये चार वेळा प्रवेश देण्यात आल्याचे उदाहरण देत त्यांनी जळगाव भाजपच्या स्थानिक रणनीतीवर तीव्र आक्षेप घेतला. तसेच, जळगावमधील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अज्ञात स्थळी सहलीला गेल्याच्या वृत्तावर, “मी स्वतः शासकीय दौऱ्यावर असल्याने मला याची पूर्ण माहिती नाही, वस्तुस्थिती जाणून घेऊन मी संबंधितांशी चर्चा करेन,” अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली.









