Home / महाराष्ट्र / Shivsena UBT : उबाठा पुन्हा फुटली! यावेळी मात्र माफी नाही! पक्षाचा आदेश ! जिथे दिसेल तिथे बंडखोराला तुडवा! शरद पवारांचीही साथ

Shivsena UBT : उबाठा पुन्हा फुटली! यावेळी मात्र माफी नाही! पक्षाचा आदेश ! जिथे दिसेल तिथे बंडखोराला तुडवा! शरद पवारांचीही साथ

Shivsena UBT : उबाठाने आज सकाळी 11 वाजता व्हिप काढून दिल्लीत बोलावलेल्या खासदारांच्या तातडीच्या बैठकीला दहापैकी सहा खासदार गैरहजर राहिले....

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Shivsena UBT : उबाठाने आज सकाळी 11 वाजता व्हिप काढून दिल्लीत बोलावलेल्या खासदारांच्या तातडीच्या बैठकीला दहापैकी सहा खासदार गैरहजर राहिले. यामुळे हे खासदार फुटले यावर आज शिक्कामोर्तब झाले.  उबाठाला फुटीचा दुसरा मोठा धक्का आहे. यावेळी मात्र उबाठाने शांत न बसण्याचा निर्णय घेतला आहे. ऑपरेशन टायगरला ऑपरेशन तुडवा याने उत्तर द्या, असे पक्षातर्फे संजय राऊत यांनी जाहीर केले. शरद पवारही या मोहिमेत मैदानात उतरणार असून, या खासदारांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघात सभा घेणार आहेत.


फुटीर खासदारांवर हल्ले होणार हे लक्षात येताच महाराष्ट्र सरकारने या सर्व खासदारांना वाय सुरक्षा बहाल करून त्यांच्या घराभोवतीही सुरक्षा तैनात केली. दिल्लीच्या लीला हॉटेलमधून निघून सध्या हे खासदार राजस्थानमध्ये जयपूर येथे आहेत असे सांगितले जाते. पण ते आज रात्री पवईच्या वेस्ट इन हॉटेलात रात्री पोहोचतील आणि उद्या शिंदेंच्या शिवसेना पक्ष वर्धापन दिनाला हजर राहतील, असे सांगण्यात येते. येथेच त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार आहे. त्यानंतर ते आपापल्या मतदारसंघात जातील तेव्हा ऑपरेशन तुडवा सुरू झाल्यास काय होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.


उबाठाच्या बैठकीला पक्षाचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत, मुख्य प्रतोद अनिल देसाई यांच्या व्यतिरिक्त नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे तिघे उपस्थित होते. बैठकीनंतर संजय राऊत यांनी फुटीर खासदारांना सज्जड इशारा दिला. यावेळी गद्दारांना मुळीच माफ करणार नाही. जिथे दिसेल तिथे बंडखोरांना तुडवा, हेच आता आम्ही करणार आहोत. आमच्या या भूमिकेला शरद पवार यांनीही पाठिंबा  दिला असून ते स्वतः बंडखोरांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन सभा घेणार आहेत, असे राऊत यांनी सांगितले. संजय राऊत यांच्या वक्तव्याला फक्त बीड जिल्ह्यात त्वरित प्रतिसाद मिळाला. उबाठा कार्यकर्त्यांनी सहाही खासदारांचे प्रतीकात्मक पुतळे जाळले. मात्र इतरत्र शांतता होती.


बैठकीला हजर न राहिलेल्या सहा फुटीर खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, सात दिवसांत नोटिशीला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे, असे अरविंद देसाई यांनी सांगितले. नोटीसला उत्तर दिले नाही तर कारवाई करण्याचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात येईल. हे सर्व घडत असताना एकनाथ शिंदे हे भिवंडीत होते. नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी ते नगरसेवकांशी बोलण्यात व्यग्र होते.


फुटीर खासदारांबद्दल बोलताना आज राऊत यांचा पारा चढलेलाच होता. त्यांनी फुटीरांचा उल्लेख गांडू असा केला. बाळासाहेब ठाकरेंचे जन्मशताब्दी वर्ष सुरू असतानाच या गांडू लोकांनी विश्वासघात केला, म्हणून माझ्या मनात प्रचंड संताप आहे. त्यांच्या या कृत्याबद्दल शिवसैनिकच नव्हे तर महाराष्ट्राची जनता  माफ करणार नाही. त्यांच्या मतदारसंघांत जाऊन त्यांना धडा शिकऊ, असे राऊत म्हणाले. या संपूर्ण तमाशाला सर्वोच्च न्यायालयच जबाबदार आहे, असा थेट आरोपही राऊत यांनी केला. यावर मंत्री गिरीष महाजन यांनी तुम्ही काय राडा घालणार म्हणत हेटाळणी केली. त्यावर राऊत अधिकच संतापले. ते म्हणाले की माझ्याकडे ईडी, सीबीआय एक दिवस येऊदे, मी महाजनलाच फोडून दाखवतो. कुंभमेळ्यात कसा भ्रष्टाचार सुरू आहे त्याची माहिती माझ्याकडे आहे.


फुटीर खासदारांना उद्देशून संजय राऊत म्हणाले की, तुमच्यात हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या आणि खुशाल पक्ष सोडून निघून जा. पुन्हा निवडणुकीला सामोरे जा आणि स्वतःच्या बळावर विजय मिळवून दाखवा. मग आम्ही तुम्हाला गद्दार म्हणणार नाही. उलट आम्ही अभिमानाने सांगू की, सध्याच्या राजकारणातले हे आधुनिक संत आहेत. त्यांचे ऑपरेशन काय होते टायगर? लपणारे कधी टायगर नसतात. आम्ही खरे टायगर आहोत. त्यामुळे आम्ही म्हणतो आहोत आम्ही ऑपरेशन तुडवा सुरू करणार. ‘तुडवा’ हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा आम्हाला आदेश होता. गद्दारांना आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणार्‍यांना कसे तुडवायचे हे शिवसैनिकांना चांगले ठाऊक आहे. तुम्हाला तोडले नाही तर शिवसेना बापाचे नाव सांगणार नाही. आमच्या बापाचे नाव बाळासाहेब ठाकरे आहे. तुम्ही लोकशाहीचा खेळ लावला का? याला फोडू त्याला फोडू, पैशांची मस्ती आलीय का? ईडी सीबीआयची धमकी कोणाला देता आहात, आम्ही जेलमध्ये जाऊन आलो आहोत, पुन्हा जेलमध्ये जाण्यास तयार आहे. तुम्हाला धडा शिकवून तुरुंगात जाऊ.


दिल्लीत कालपासून राजकीय  नाट्य सुरू झाले. असे सांगण्यात येत आहे की फुटीर खासदारांनी आठ दिवसांपूर्वीच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे कळवले आहे. त्यांचा स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया कधीच पूर्ण झाली आहे. उबाठाचे नेतृत्व बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ विचारांपासून भरकटले आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा त्याग केला आहे. लवकरच उबाठा काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या हालचाली सुरू आहे. हे आपल्याला मान्य नसल्याने आपण उबाठापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, असे खासदार म्हणत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आजच शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर म्हणाले की, शरद पवार गटाचे आमदार फुटून अजित पवार गटात जातील. त्यांच्या या वक्तव्याने आणखी खळबळ माजली.


उबाठाच्या ईशान्य मुंबईतील
पदाधिकार्‍यांची आज बैठक

सहा खासदारांनी साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर आता उबाठाकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या ईशान्य मुंबईतील पदाधिकार्‍यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे हे स्थानिक पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी शुक्रवारी दुपारी 12 वाजता ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत संजय दिना पाटील यांच्या बंडखोरीनंतर ईशान्य मुंबईतील पदाधिकार्‍यांची भूमिका काय याची विचारणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

कायदेतज्ज्ञांचा खासदारांना सल्ला
गट स्थापन करून विलीन करावे

निवृत्त विधिमंडळ प्रधान सचिव अनंत कळसे म्हणाले की, सहा खासदार फुटले इतके हे सोपे नाही. त्यांची खासदारकी टिकायची असेल तर पक्ष उभा फुटायला हवा, म्हणजे खासदार, आमदार ते नगरसेवक सर्वच फुटले हे सिद्ध करावे लागेल. ही प्रक्रिया लगेच पूर्ण होऊ शकत नाही. आता संसदीय बैठकीला व्हिप लागू होतो का? हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या खासदारांना स्वतंत्र गट करावा लागेल, त्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मान्यता लागेल आणि मग तो गट दुसर्‍या पक्षात विलीन होऊ शकतो. पण त्यासाठी पक्षात उभी फूट पडावी लागेल. उबाठा आता या खासदारांना अपात्र करण्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांकडे देऊ शकतात, त्यावर अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. अ‍ॅड. उज्ज्वल निकम म्हणाले की, या खासदारांनी पक्ष सोडलेला नाही, त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या स्वतंत्र गटाने स्वतःचा प्रतोद नेमून व्हिप बजावला असेल, मग उबाठाचा व्हिप ग्राह्य धरायचा की नवीन गटाचा व्हिप ग्राह्य धरायचा हे अध्यक्षांनी ठरवायचे आहे. या खासदारांना स्वतंत्र गट करून दुसर्‍या पक्षात विलीन व्हावे लागेल. कायदेतज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले की, संसदेत मतदान असते तेव्हा व्हिप लागू होते. आजच्या अशा बैठकीला व्हिप लागू होत नाही. पण पक्षाच्या बैठकीला बोलावले आणि उपस्थित राहिले नाही तर अपात्र करा, असे पत्र उबाठा देऊ शकते. इथे गट बाहेर पडला तर मान्यता द्यायची की नाही हा विषय आहे, हा विषय कोर्टात आहे. त्यावर गेली चार वर्षे निर्णय आलेला नाही.

मोठे मोठे गार केले गंमतमध्ये
उदय सामंतांचे स्टेटस चर्चेत

मुंबई – उबाठाच्या सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवले आहे. या फोटोत ‘मोठे मोठे गार केले गंमतमध्ये’ असा मजकूर आहे. या स्टेटसचा संबंध उबाठातील खासदारांच्या फुटीशी जोडला जात असल्याने ते चर्चेचा विषय ठरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू होती. ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. आज हे सहा खासदार उबाठाच्या दिल्लीतील बैठकीला उपस्थित न झाल्याने त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर शिंदे गटाकडून या घडामोडींना मोठे यश मानले जात आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या