Home / महाराष्ट्र / Supriya Sule : आम्हाला फक्त मनसेत पाठवायचं बाकी राहिलंय…’; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची मिश्कील टोलेबाजी, शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर-३’ मुळे राजकीय वातावरण तापले

Supriya Sule : आम्हाला फक्त मनसेत पाठवायचं बाकी राहिलंय…’; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची मिश्कील टोलेबाजी, शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर-३’ मुळे राजकीय वातावरण तापले

Supriya Sule : महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने रंगणाऱ्या पक्षांतराच्या आणि गुप्त बैठकांच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि...

By: Team Navakal
Supriya Sule
Social + WhatsApp CTA

Supriya Sule : महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने रंगणाऱ्या पक्षांतराच्या आणि गुप्त बैठकांच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या खास मिश्कील व उपरोधिक शैलीत भाष्य केले आहे. नाशिक येथे यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय युवा पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून विरोधकांचे लोकप्रतिनिधी फोडण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर-३’ (Operation Tiger 3) राबवले जात असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या विधानामुळे कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला आणि सत्ताधाऱ्यांच्या कथित मोहिमेची हवा काढून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

“आमच्या ८ खासदारांना ‘कमोडिटी’ करून ठेवलंय” – सुप्रिया सुळे
पक्षांतराच्या अफवांवर तीव्र नाराजी व्यक्त करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमच्या पक्षाच्या निवडून आलेल्या ८ खासदारांचा व्हॉट्सॲपवर एक स्वतंत्र ग्रुप आहे. मात्र, वृत्तवाहिन्यांवर रोज सकाळी आम्हाला उठून एका नवीन राजकीय पक्षात पाठवले जाते. आम्ही त्या ग्रुपवर गमतीने आणि उपरोधाने एकमेकांशी बोलतो की, आतापर्यंत मीडियाने आम्हाला सर्वच पक्षांमध्ये पाठवून झाले आहे, आता केवळ राज ठाकरे यांच्या ‘मनसे’ (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) मध्ये पाठवायचे बाकी राहिले आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, “लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे बाजारातील वस्तू (कमोडिटी) करून ठेवले आहे, याचे आम्हाला मानसिक अस्वस्थता वाटते आणि हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. आता या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतील आणि आम्ही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली काम करणार, असे जाहीर करावे लागेल. सध्या लोकप्रतिनिधींचा अशा प्रकारे विनोद केला जात आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.”

काय आहे एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर-३’?
सुप्रिया सुळे यांनी हा उपरोधिक टोला लगावला असला, तरी दुसरीकडे महायुतीचे नेते आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विरोधकांना मोठा धक्का देण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर-३’ ची पूर्ण तयारी केल्याची विश्वासनीय माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील ६ खासदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर, आता या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात केवळ ठाकरे गटच नाही, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेही काही आमदार आणि खासदार हे शिंदेंच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून काही विशिष्ट लोकप्रतिनिधींसोबत गुप्त बैठका आणि संपर्क सुरू असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे.

१० आमदारांचे मतपरिवर्तन; पक्षांतरबंदी कायद्याची अडचण सोडवण्याचे प्रयत्न-
अधिकच्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुमारे १० आमदारांचे मनपरिवर्तन करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या पक्षांतरबंदी कायदा (Anti-Defection Law) लागू होऊ नये आणि कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक असणारे दोन तृतीयांश संख्याबळ गाठणे गरजेचे आहे. त्यामुळे आणखी ५ आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सध्या वेगाने सुरू आहेत. याशिवाय, ठाकरे गटातील आणखी एका विद्यमान खासदाराशीही वरिष्ठ पातळीवरून थेट संपर्क साधण्यात आल्याची चर्चा आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या