Watermelon : मुंबईतील पायधूनी येथे काही दिवसांपूर्वी कलिंगड खाल्ल्यानंतर डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पसरले आणि खळबळ माजली. मात्र, एक महिन्याच्या तपासाअंती त्यांचा मृत्यू कलिंगडमुळे झाला नसून उंदराच्या औषधामुळे झाला हे स्पष्ट झाले. त्यानंतर काही दिवसात पुन्हा कलिंगड खाऊन मृत्यू झाल्याचे वृत्त आले. आता तिसर्यांदा हाच प्रकार घडल्याचे वृत्त आहे.
मध्य प्रदेशातील शेओपूर येथे कलिंगड खाल्ल्यानंतर इंद्रकुमार परिहार या 43 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून, त्यांच्या 21 वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर आहे. इंद्रकुमार हे शेओपूर येथे चालक म्हणून काम करत होते आणि कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होते. काल रात्री त्यांची आणि त्यांच्या 21 वर्षीय मुलगा विनोदची प्रकृती अचानक बिघडली. त्याआधी दोघांनी कलिंगड खाल्ले होते, असा दावा कुटुंबियांनी केला आहे. प्रकृती गंभीर झाल्याने दोघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंद्रकुमार यांची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोटा येथे हलवण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मुलगा विनोदवर रुग्णालयात उपचार सुरू असून, तो व्हेंटिलेटरवर आहे.
जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. आर. बी. गोयल यांनी सांगितले की, दोघांनी आधी रात्री जेवणात भोपळा खाल्ला होता आणि त्यानंतर प्रकृती बिघडली. कलिंगड त्यांनी नंतर खाल्ले होते. त्यांना उलट्या, जुलाब असा त्रास झाला नाही. मात्र श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे हा प्रकार कलिंगडमुळे झाला असावा असे वाटत नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र कलिंगड खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडल्याने पुन्हा कलिंगडवर संशय निर्माण झाला आहे.
याआधी अशाच प्रकारची घटना छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यात घडली होती. कलिंगड खाल्ल्यानंतर 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता आणि तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते मृत्यू कलिंगड खाऊन झाले की नाही हे निश्चित झाले नाही. पण कलिंगड खाल्ल्यावर त्याला उलट्या व जुलाबाचा त्राससुरू झाला होता.












