अदानीचा नवा उद्योग जहाजबांधणी करणार

मुंद्रा – भारताचा सर्वात वेगवान प्रगती करणारा वादग्रस्त उद्योजक गौतम अदानी आता जहाजबांधणी उद्योगात उतरणार आहे. कच्छ जिल्ह्यातील स्वत:च्या मालकीच्या मुंद्रा बंदरात या उद्योगाची सुरुवात केली जाणार आहे. जहाजबांधणीत आघाडीवर असलेले चीन, दक्षिण कोरिया आणि जपान या प्रमुख देशांनी 2028 पर्यंतच्या जहाजांच्या ऑर्डर घेतल्या असल्याने हे देश आणखी मागणी पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती जागतिक पातळीवर निर्माण झाली आहे. याचाच फायदा उठविण्यासाठी अदानी समूह जहाजबांधणी क्षेत्रात उतरणार आहे.
भारतात जहाजबांधणी ही इतर देशांच्या तुलनेने 35 टक्के महाग असल्याने भारताला अधिक ऑर्डर मिळत नव्हत्या. मात्र आता मोदी सरकारने 2030 पर्यंत जहाजबांधणीत भारताला पहिल्या दहा क्रमांकात नेऊन ठेवण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी ‘अमृत काल 2047’ अंतर्गत जहाजबांधणीला उत्तेजन दिले जाणार आहे. 15 मे रोजी अदानीच्या मुंद्रा बंदराला केंद्र सरकारकडून विस्ताराची परवानगी मिळाली. या विस्ताराचाच एक भाग म्हणून हा नवा उद्योग सुरू केला जाणार आहे. जगभरातील जुनी जहाजे निवृत्त करून नवीन जहाजे आणायची तर पुढील 30 वर्षांत 50 हजार जहाजे बांधावी लागणार आहेत. सध्या जहाज बांधणीत चीन, दक्षिण कोरिया आणि जपानच्या कंपन्या आघाडीवर आहेत. स्वस्त कामगार पुरवठा, सरकारचा पाठिंबा आणि व्यापार साखळी यामुळे चीन सरकारी जहाजबांधणी कंपनी, मित्सुबिशी अवजड उद्योग कंपनी, सॅमसंग अवजड उद्योग कंपनी आणि देवू जहाजबांधणी व मरीन इंजिनिअरिंग कंपनी या कंपन्या जोमात आहेत. त्यात आता भारतात अदानीची कंपनी स्पर्धेत उतरणार आहे. मोदी सरकारच्या क्रियाशील पाठिंब्याने गौतम अदानींची ही नवी जहाजबांधणी कंपनीही वेगाने प्रगती करील, यात शंका नाही.
विमानतळ, वीज पुरवठा, संरक्षण साहित्य आणि बंदरे यानंतर जहाज बांधणीही अदानी समूहाकडे गेली आहे.