मुंबई – मुंबईच्या दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क येथे प्रवीण मोहरे या तरुण निर्मात्याने आज भडकून सरळ झाडावर चढून आत्महत्येची धमकी दिली. आपण तयार केलेल्या चित्रपटाला अंतिम मंजुरीसाठी अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया पैसे मागत असल्याचा आरोप करत त्यांनी यासंदर्भात प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश कोठारे यांच्याशी बोलणे करून देण्याची मागणी केली. पोलिसांनी त्याची समजूत घातल्यानंतर अखेर तासाभराने निर्माता झाडावरून खाली उतरला.
आज सकाळी आठच्या सुमारास प्रवीणकुमार मोहरे हा निर्माता झाडावर चढला. त्याने गळ्यात कुलूप असलेली साखळी घातली होती. त्याच्या हातात ‘करप्शन फाईट’ असा फलक आणि कात्री होती. आपण आत्महत्या करणार असल्याचे तो वारंवार ओरडून सांगत होता. याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आल्यावर ते तातडीने घटनास्थळी पोहोचले तेव्हा तो एक चित्रपट निर्माता असून त्याने ‘सेंट लेडी’ नावाच्या एका चित्रपटाची निर्मिती केली आहे, अशी माहिती त्याने दिली. त्याने आरोप केला की, मराठी चित्रपटांच्या परवानगीसाठी नेहमी पैसे मागितले जातात. मराठी माणसाला चित्रपट बनवू दिले जात नाहीत. शिवाजी पार्कमध्ये अचानकपणे हे आंदोलन सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली.
प्रवीण मोहरे यांनी म्हटले की चित्रपटात प्राण्यांचा वापर करायचा असल्यास अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाला परवानगीचे 30 हजार रुपये द्यावे लागतात. त्यानंतर त्यांच्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळते. हे शुल्क भरले नाही तर प्राण्याचे दृश्य चित्रपटातून वगळावे लागते. याचा अर्थ 30 हजार रुपये भरले तर शुटिंग दरम्यान प्राण्यांसोबत अन्याय होत नाही, असे समजायचे का? असा सवाल त्यांनी केली.
पोलिसांनी प्रवीणची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्याला झाडावरून उतरवण्याचा प्रयत्न केल्यास गळफास लावून आत्महत्या करू, अशी धमकी त्याने दिली. प्रसिद्ध मराठी निर्माते आणि अभिनेते महेश कोठारेंना भेटून त्यांच्याशी मराठी चित्रपटासंदर्भातील परवानग्यांसाठी केल्या जाणार्या पैशांच्या मागणीच्या समस्येबद्दल बोलायचे आहे. त्यांना लवकर बोलवा. ते आले तर मी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी झाडावरून खाली उतरेन, असे त्याने म्हटले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी चर्चा केल्यावर अखेर तासाभराने तो झाडावरून उतरला.
