राज ठाकरेंची मुख्यमंत्र्‍यांशी भेट विविध समस्यांवर तासभर चर्चा

मुंबई- आज सकाळी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर काही वेळातच वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री शिंदे यांची राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या शिष्टमंडळाने वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी त्यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत एक तासाहून अधिक चाललेल्या बैठकीला पोलिस वसाहतीतील रहिवासी आणि राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीदेखील उपस्थित होते. बैठकीत मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, वरळी पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर चर्चा झाली. मुंबईतल्या पोलिसांना राहण्यासाठी घरे नाहीत. आपल्याला पोलिसांसाठी लवचिक भूमिका ठेवावी लागेल, म्हाडा, सिडको, एमएमआरडीए, नगरविकास विभाग यांना एकत्रितपणे आपल्याला कशा पद्धतीने मुंबई आणि परिसरात पोलिसांसाठी सेवा सदनिका उपलब्ध करून देता येतील, ते प्राधान्याने आणि कालबद्ध पद्धतीने ठरवावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले. वरळी येथील पोलिस वसाहतीच्या समस्या तत्काळ दूर करण्यासाठी ८ दिवसांच्या आत कार्यवाही व्हावी असे ते म्हणाले. बीडीडी चाळीतील दुकानदारांना वाढीव जागा कशी देता येईल याबाबत नव्या इमारतींच्या आराखड्याचा विचार करून तसा प्रस्ताव तयार करण्यास शिंदेंनी सांगितले. यामुळे बीडीडी चाळीतील दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी नियम झुगारून देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करण्याचे तसेच एसआरए इमारतीतील ज्या सदनिका विक्रीसाठी खुल्या आहेत त्यांची विक्री थांबविण्याच्या नोटीसा देण्याचे निर्देशही शिंदे यांनी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांना दिले.

कल्याण ते शिळ रस्त्यावर पलावा समोरील पूल आणि कल्याण येथील पत्री पूल येथे रेल्वेच्या आवश्यक त्या मान्यता मिळालेल्या नाहीत. येथील वाहतूक कोंडी अजूनही सुटत नाही याकडे आमदार राजू पाटील यांनी लक्ष वेधले.त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या बैठकीतूनच मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांना दूरध्वनी लावून याविषयी तातडीने परवानगी देण्याच्या सूचना केल्या. त्यासोबत नवी मुंबई येथे अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरण व उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीची हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी यांच्यात सुरू असलेला संघर्ष, राज्यात निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अशा विविध विषयांवरदेखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली.

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर काहीवेळात शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत शरद पवारांनी आरक्षणासह राज्यातील विविध विकासकामे यावर चर्चा झाली. दुपारी २ वाजता वर्षा निवासस्थानी शरद पवार भेटीसाठी दाखल झाले होते. या आठवड्यातील ही दुसरी भेट आहे. याआधी २२ जुलैला एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची भेट झाली होती. शरद पवार यांची आठवड्याभरात ही दुसरी भेट असल्याने या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

आदित्य ठाकरे हेच लक्ष्य ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जे विषय मांडले ते प्रामुख्याने वरळी विधानसभा मतदारसंघातील आहेत . या मतदारसंघातून मनसे नेते संदिप देशपांडे यांना उभे केले जाणार आहे . यामुळे शिंदे , फडणवीस विरोधातील जी मते उबाठाचे येथील उमेदवार आदित्य ठाकरे यांना मिळणार आहेत त्या मतांची फोड होऊन त्यातील काही प्रमाणातील मते संदिप देशपांडे यांना मिळतील आणि त्यामुळे महायुतीचा उमेदवार निवडून येईल हे चक्रव्यूह रचले आहे . याचाच एक भाग म्हणून मनसेच्या उमेदवाराची मते वाढवण्यासाठी राज ठाकरे यांनी अचानक पोलीस घरे , बीडीडी हे प्रश्न उचलले आहेत . त्यांचा खरा नेम हा आदित्य ठाकरे आहे अशी चर्चा या भेटीनंतर सुरू झाली आहे .