कर्जत – राज्यातून वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गेल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात येईल असे सांगितले होते. वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात आला का असा प्रश्न शिवसेनेचे माजी मंत्री व युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. भाजपापेक्षा आपलाच पक्ष मोठा असल्याचा दावा त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यानंतर आता शिवसेनेने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्याकडून आजपासून विधानसभानिहाय दौरे सुरू करण्यात आले. आज कर्जत आणि उरण मतदार संघाचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी कर्जत येथे आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, महायुती सरकार आपल्या कंत्राटदार मित्रांसाठी काम करते. राज्याला लुटण्याचा काम सुरू आहे. यांचे डोके फक्त फोडाफोडीमध्ये चालते. यांनी कधी राज्यासाठी मोदींकडे निधी मागितला का, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीत भाजपाने २४२ जागा जिंकल्या. केंद्रात कधीही खेळ घडू शकतो आणि कधीही इंडिया आघाडीचा सरकार येऊ शकते. भाजपा त्यांचा पक्ष मोठा असा दावा करते. इलक्ट्रोल बॉण्डमध्ये सर्वाधिक निधी यांना मिळाला. त्यांच्याकडे ईडी, पोलीस आदी यंत्रणा आहेत. असे असतानाही त्यांना राज्यात केवळ ९ जागा जिंकता आल्या. आपला पक्ष फोडला तरी आपण ९ जागा जिंकल्या. मग कोणता मोठा पक्ष असा प्रश्न उपस्थित करत येथे लागलेली गद्दारांची कीड आपल्याला काढून टाकायची आहे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
