कोल्हापूर – श्री क्षेत्र जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पन्हाळा तालुक्यातील जाखले गावाजवळ सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. हलमत खडीजवळ शेतात वैरण काढण्यास गेलेल्या दोघा शेतकऱ्यांना हा बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जाखले गावच्या सरपंच जयश्री देशमुख यांनी सांगितले की,जाखले गावातील सागर बोराटे, कृष्णात डोंबे हे शेतकरी मोटारसायकलवरून शेतात जाताना हनुमान मंदिराजवळ हलमत खडीवरून बिबट्या दिसला. थोडा तेथेच थांबून तो जोतिबा डोंगराकडील भागात निघून गेला. दोन दिवसांपूर्वी मानसिंग चौगुले यांनादेखील सायंकाळच्या सुमारास कुरणाजवळ खोद्रे वस्तीशेजारी बिबट्या दिसला होता. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सरपंच जयश्री देशमुख यांनी केले आहे.