सातारा – खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड होते. सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वातावरणातील बदलामुळे तसेच सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.खटाव तालुक्यातील वडूज, पुसेसावळी, मायणी व अन्य मोठ्या बाजारपेठांमध्ये असलेला सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी आशा आहे.
दिवाळी सण तोंडावर आला असताना काही ठिकाणी धान्याची आवक दिसून येत नाही. ऑक्टोबर महिना संपत आला तरी वरुणराजा मात्र अधून मधून बरसत आहे. बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वीच सोयाबीनची विक्री केली. तर काही ठिकाणी सोयाबीनचे पीक काढले, पण सततच्या पावसाने दाणे काळवंडले व बारीक झाले आहे. सोयाबीनची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्यानंतर भावात घसरण होत गेली. आज भाव ४,३०० ते ४,५०० च्या घरात आहे. दिवाळी सण साजरा करण्यासाठी हातात पैसे पडतील, अशी आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्याला या घसरणीचा फटका बसला आहे.
