अमरावती, पुण्यात इसिस! एनआयएचे छापे! 19 वर्षांच्या दोघा तरुणांना घरातून अटक

अमरावती- इसिस या दहशतवादी संघटनेला समूळ नष्ट करण्यासाठी आज 19 जिहादी संघटनांशी संबंधित व्यक्ती व कार्यालयांवर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली, कर्नाटकात अनेक ठिकाणी छापे टाकले. राज्यात पुणे, भिवंडी, अमरावतीत पुन्हा एकदा मोठी कारवाई केली. येथून तर अगदी 19 वर्षांच्या दोन कट्टर दहशतवादाशी संबंधित मुलांना अटक केली. अमरावती ग्रामीणच्या अचलपूरमध्ये काल मध्यरात्री एनआयएने छापा टाकला. एनआयएच्या 15 गाड्यातून पथके अचलपूर येथे दाखल झाली. तिथे सय्यद नावाच्या 19 वर्षांच्या संशयित विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. अकबारी चौक बियाबानी गल्ली येथे त्याच्या राहत्या घरी 2 ते 3 तास त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. तो जिहादी संघटनेशी संबंधित होता. त्याने व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून हे काम सुरू ठेवले होते. त्याला अमरावतीला नेण्यात आले आणि तिथून त्याला गुप्त ठिकाणी नेण्यात आले.
एनआयएने रविवारी रात्रीपासून देशभरात कारवाई सुरू केली आहे. सोमवारी इसिसशी संबंध असल्या प्रकरणी चार राज्यांमधील 19 ठिकाणी छापे टाकले. कर्नाटकात 11, झारखंडमध्ये चार, महाराष्ट्रात तीन आणि दिल्लीत एका ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. आज मिनाज, मोहम्मद सुलेमान आणि सय्यद समीर यांना बल्लारी येथून, अनस इक्बाल शेख मुंबईतून, मोहम्मद मुनिरुद्दीन, सय्यद समिउल्लासामी, बेंगळुरूमधून मोहम्मद मुझम्मिल, दिल्लीतून शायान रहमान हुसेन आणि मोहम्मद शाहबाज झुल्फिकार, गुड्डू यांना जमशेदपूर येथून अटक करण्यात आली.
काही दहशतवादी संघटना देशात दहशतवादी कारवाया करण्याची तयारी करत असून, यासाठी त्या तरुणांची संघटनेत भरती करत आहेत. या तरुणांना कट्टरवादाचे धडे दिले जात आहेत. ही माहिती मिळाल्यावर एनआयएने ही शोधमोहीम राबवली. एनआयएच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बेहिशेबी रोकड, शस्त्रे, तीक्ष्ण साधने, संवेदनशील कागदपत्रे आणि विविध डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.
गेल्या आठवड्यात केंद्रीय दहशतवाद विरोधी संस्थेने महाराष्ट्रात 40 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आणि 15 जणांना अटक केली होती. त्यावेळी भिवंडीजवळच्या पडघा-बोरिवली गावातही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये साकिब नाचण या इसिसच्या महाराष्ट्र मॉड्यूलच्या म्होरक्याचाही समावेश होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top