उत्तर मध्य मुंबईतून भाजपाची उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

मुंबई – भाजपाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांची पत्ता कट करीत उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने (भाजपा) अखेर मराठी चेहऱ्याचा शोध करीत राजकारणात नवखे असलेले सुप्रसिध्द सरकारी वकील अॅड उज्ज्वल निकम यांना आज उमेदवारी जाहीर केली.
खासदार पुनम महाजन यांच्याबद्द्ल मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याने त्याचा फटका बसू नये म्हणून भाजपा त्यांना उमेदवारी देणार नाही, अशी चर्चा आधीपासूनच राजकीय वर्तुळात होती. त्या चर्चेवर भाजपाचे निवडणूक प्रभारी दिनेश शर्मा यांनी निकम यांचे नाव घोषित करून शिक्कामोर्तब केले.
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून मराठी चेहरा द्यायचा म्हणून भाजपाने आधी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना विचारले . त्यांनी नकार दिल्यावर अभिनेते सचिन खेडेकर यांच्या नावांचीही चर्चा सुरू झाली .मात्र आता निकम यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा झाल्याने या मतदारसंघात महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि महायुतीतून भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यात थेट लढत होईल,हे निश्चित झाले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यावर उज्ज्वल निकम म्हणाले की मी जळगावात असलो तरी महाराष्ट्रावर फिरलो आहे . गरिबाला न्याय मिळावा , देशात कायदा सक्षम असावा यासाठी मी प्रयत्न करीन . पुनम महाजन यांचेही मार्गदर्शन घेईन .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top