उबाठा गटाचे ‘लाव रे तो व्हिडिओ’ पक्षघटनेच्या चित्रफितीच दाखवल्या

मुंबई – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि उबाठा गटाबाबत जो निर्णय दिला तो कसा अयोग्य होता हे जनतेपुढे सिद्ध करण्यासाठी आज उबाठा गटाने कार्यकारिणी बैठकींचे आणि सदस्य निवडीचे व्हिडिओच मोठ्या स्क्रीनवर दाखविले. शिवसेनेची घटना, कार्यकारिणीतील निर्णय आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना दिलेले सर्व अधिकार आयोगाकडे आणि त्याची प्रत नार्वेकरांना दिल्याची छायाचित्रेही झळकवली. या चित्रफिती दाखवताना एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या पाया पडताना दिसले तेव्हा सभागृहात गहजब झाला.
राहुल नार्वेकर यांच्या निकालाच्या ‘चिंधड्या उडविण्यासाठी’ आज उबाठा गटाने महापत्रकार परिषद आयोजित केली होती. वरळीच्या डोममध्ये आयोजित कार्यक्रमाला प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी निकालाची चिरफाड करताना अ‍ॅड. असीम सरोदे एकेक मुद्दा समजावून सांगत अखेरीस म्हणाले की, नार्वेकरांनी न्यायाच्या चिंधड्या उडवल्या. त्यांनी जो निर्णय दिला तो येणार हे लहान मुलालाही माहीत होते. यावेळी त्यांनी तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका करीत त्यांना ‘फालतू माणूस’ म्हटले.
अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या कायद्याच्या मांडणीनंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी मुद्दे मांडले. ते म्हणाले की, शिवसेनेची घटना, 2013 साली घटनेत केलेले बदल, राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड, त्यानंतर 2018 साली झालेली कार्यकारिणीची निवड ही सर्व कागदपत्रे आम्ही वेळोवेळी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. त्याची पोचपावतीही आहे. पण आम्हाला ही कागदपत्रे मिळाली नाहीत, असे आयोग म्हणते. आयोगाला सादर केलेली कागदपत्रे आम्ही विधानसभा अध्यक्षांनाही सादर केली. परंतु ते ही कागदपत्रे मान्य करण्यास तयार नाहीत.
13 जानेवारी 2013 या दिवशी शिवसेना पक्षाच्या घटनेत बदल करून ‘पक्षप्रमुख’ हे पद निर्माण केले. उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदावर निवड झाली. पक्षप्रमुख हेच अध्यक्ष असतील असा ठराव झाला. अध्यक्षांकडे पक्षाबाबत निर्णयाचे अंतिम अधिकार असतील, ते कुणाचीही नेमणूक, बडतर्फी करू शकतात, कार्यकारिणी कधीही बरखास्त करू शकतात असे ठराव मंजूर झाले. यावेळी रितसर निवडणूक झाली. राष्ट्रीय कार्यकारिणीत मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ता नलावडे, लीलाधर डाके, सुभाष देसाई, रामदास कदम, दिवाकर रावते, संजय राऊत आणि गजानन कीर्तिकर यांची निवड झाली. 21 उपनेत्यांची निवड झाली. अ‍ॅड. बाळकृष्ण जोशी यांनी ही निवडणूक प्रक्रिया राबवली. या संपूर्ण बैठकीची चित्रफित यावेळी स्क्रीनवर दाखवण्यात आली.
त्यानंतर पाच वर्षांनी 2018 साली पुन्हा निवडणूक झाली. त्यात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, नेते व उपनेत्यांची निवड याची माहिती देत या बैठकीची चित्रफित दाखवण्यात आली. अ‍ॅड. अनिल परब शेवटी म्हणाले की, आम्ही कोणतीही घटना, निवडणूक याची कागदपत्रे सादर केली नाहीत, असा खोटा प्रचार सुरू आहे म्हणून हे पुरावे दाखविले. आता आम्ही
सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. तिथे आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. उबाठा नेते उद्धव ठाकरे अखेरीस म्हणाले की, नार्वेकर आणि मिंधे गटाने संरक्षण न घेता यावे. मीही येतो, मग शिवसेना कुणाची आहे हे कळेल.
नार्वेकर यांनी आरोप फेटाळले
आमदार अपात्रतेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच मी निकाल दिला, असे स्पष्ट करून राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंनी महापत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप फेटाळले. नार्वेकर म्हणाले की, मी चौकटीबाहेर निर्णय दिला, असे ठाकरे म्हणतात. पण मी चौकटी बाहेर कसा निर्णय दिला हे सांगितले नाही. ते म्हणतात की, निवडणूक आयोगाला आम्ही पक्षाच्या घटनेतील बदलबाबत माहिती दिली होती, पण प्रत्यक्षात त्यांनी केवळ संघटनात्मक निवडणुका आणि त्याद्वारे झालेल्या नियुक्त्या यांचीच माहिती दिली होती. त्यांनी घटनादुरुस्ती कशी केली, कुणाला काय अधिकार दिले, हे सांगितले नाही. हे निवडणूक आयोगाने माझ्या पत्राला दिलेल्या लेखी उत्तरात मला कळवले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे जे ग्राह्य होते तेच तपासून मी निर्णय दिला. मला सर्वोच्च न्यायालयाने तसेच सांगितले होते. जो युक्‍तिवाद त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला तो माझ्यासमोर केला नव्हता. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाबाहेर जाऊन निर्णय घेतला हा ठाकरेंचा आरोप चुकीचा आहे. शिंदेंची गटनेता म्हणून निवड ही परिशिष्ट 20 प्रमाणेच ट्रिपल टेस्ट नुसारच झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top