कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर पुन्हा भाजपात ?

बंगळूर – गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाला सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे आता पुन्हा भाजपामध्ये डेरेदाखल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शेट्टर यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा भाजपाचा विचार आहे. त्यासाठी भाजपाचे काही नेते शेट्टर यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत शेट्टर यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी थेट अखेर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढविली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.शेट्टर हे निवडणूक हरले तरी त्यांना कॉंग्रेसने विधानपरिषदेवर घेतले होते.
शेट्टर हे बेळगावचे दिवंगत माजी खासदार सुरेश अंगडी यांचे जवळचे नातलग आहेत. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले आहे. त्यामुळे मतदारसंघाची त्यांना चांगली माहिती असून, मतदारांशी चांगला संपर्कही आहे. शिवाय बेळगाव लोकसभा क्षेत्रातील लिंगायत मतदारांवर त्याचा प्रभाव पडू शकतो, असे भाजपाचे मत आहे. दरम्यान, शेट्टर यांनी आपण कोणत्याही कारणास्तव भाजपामध्ये पुन्हा जाणार नसून, काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top