काँग्रेसचे बंड थंडावले! सांगलीत माघार फेरविचार करण्याची केवळ विनंती केली

सांगली – सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला देऊन वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी अथक प्रयत्न करणारे काँग्रेसचे आमदार विश्‍वजित कदम यांनी आज नरमाईची भूमिका घेतली आणि बंड थंडावल्याचे स्पष्ट झाले.
विश्‍वजित कदम, विशाल पाटील आणि सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी आज भारती विद्यापीठात पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत ते ठोस निर्णय घेतील अशी अपेक्षा होती. मात्र विश्‍वजित कदम यांनी नरमाईची भूमिका घेत सांगलीच्या जागेबद्दल फेरविचार करण्याची विनंती करणार आहोत एवढेच म्हणत पत्रकार परिषद आटोपती घेतली. त्यांनी माघार घेतली असली तरी काँग्रेस कार्यकर्ते व नेते आता उबाठाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासाठी काम करतील याची फारशी शक्यता नाही. त्यामुळे उबाठा गटाने अट्टाहासाने ही जागा घेतली असली तरी आता इथे विजयासाठी विशेष कसरत करावी लागणार आहे.
आज पत्रकार परिषदेत विश्‍वजित कदम आणि विशाल पाटील दोघेही होते. मात्र विशाल पाटील काहीच बोलले नाहीत. विश्‍वजित कदम म्हणाले की, सांगली लोकसभा मतदारसंघ हा स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या निवडणुकीतही सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी अशी सांगलीतील काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य सांगलीकरांची भावना होती. सांगलीतून उद्धव ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करणे हे दुर्दैवी आहे. हा निर्णय घेताना त्यांनी आमच्या आणि तमाम सांगलीकरांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही आजही त्यांना विनंती करतो की, काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या, पदाधिकार्‍यांच्या आणि जनतेच्या भावना त्यांनी जाणून घ्याव्यात. येथील राजकीय वास्तव जाणून घ्यावे आणि आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा. मात्र ते पुढे असेही म्हणाले की, मविआ आता एकत्र आली आहे. मोदींना पराभूत करणे महत्त्वाचे आहे. आम्ही आता कार्यकर्त्यांशी बोलू. दुसरीकडे आज सकाळी ठाकरे गटाचे नेते राऊतांनी मात्र स्पष्ट केले की, कोणत्याही परिस्थितीत जागावाटपावर फेरविचार केला जाणार नाही.
वंचितचा पाठिंबा?
आज सकाळी विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन विशाल पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यावर आंबेडकर यांनी विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू,असे सांगितले. यामुळे बंडखोरी होते का असा सवाल निर्माण होत असला तरी विश्वजित पाटील यांच्या आजच्या वक्तव्यावरून बंड थंड झाले असेच चित्र आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top