नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरण दिवंगत भाजप खासदारांच्या घरावर मोर्चा

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील नगर अर्बन बँक बुडवणारे राजकीय पाठबळामुळे खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे या गैरव्यवहाराविरोधात उद्या भाजपचे दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्यावर आसूड मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात बॅंकेतील गोरगरीब ठेवीदार, पेन्शनर, ज्येष्ठ नागरिक, महिला ठेवीदार सहभागी होणार आहेत, अशी माहिती बँक बचाव कृती समितीने दिली आहे.

नगर अर्बन बँक परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे. बँकेवर गैरव्यवहार प्रकरणी गुन्हेही दाखल झाले आहेत. ज्यांच्यामुळे बँकेत गैरव्यवहार होत आहेत आणि ज्यांच्यामुळे बँक बुडाली, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बँकेचे अधिकारी आणि ठेवीदारांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. आता या गैरव्यवहाराविरोधात उद्या भाजपचे दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्यावर आसूड मोर्चा काढण्यात येणार आहे.

हा मोर्चा उद्या सकाळी साडेदहा वाजता नगर अर्बन बँक येथून निघून माजी खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्यावर जाणार आहे. तिथून हा मोर्चा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडकेल, अशी माहिती बॅंक बचाव कृती समितीचे सदस्य धोंडोपंत कुलकर्णी यांनी दिली. नगर अर्बन बॅंकेची धुरा भाजपचे दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी संभाळत होते. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी बँकेचा कारभार हाती घेतला. सुवेंद्र गांधी यांची पत्नी दीप्ती गांधी या बॅंकेत उपाध्यक्ष होत्या. परंतु, ११३ वर्षांची परंपरा असलेली नगर अर्बन बँक बुडाली.

सभासदांनी विश्वासाने बॅंकेची जबाबदारी ज्यांना दिली, त्यांनी बॅंकेचा राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेतला. यामुळे बँक बुडाली. बँक वाचवण्यासाठी अजूनही कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. बँक लुटणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या बँकेवर ठेवीदारांचा आजही विश्वास आहे. बँकेत आजही सुमारे ३५० कोटी रुपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. बँकेत शेकडो कर्मचारी काम करत आहेत. बँक बुडीत निघाल्याने कर्मचाऱ्यांचे संसारदेखील रस्त्यावर आलेत. त्यामुळे बॅंक वाचवण्यासाठी या मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन बँक बचाव कृती समितीचे सदस्य धोंडोपंत कुलकर्णी यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top