मालदीवच्या निवडणुकीत भारतविरोधी मुइज्जूंचा विजय

माले
मालदीव केंद्रीय निवडणुकांमध्ये सत्ताधारी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जु यांचा पक्ष आघाडीवर असून त्यांनी ८६ पैकी ६६ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे ते आता सत्तेच्या अगदी जवळ आले असून आता केवळ औपचारिकताच शिल्लक राहिली आहे. मुइज्जू यांचे चीनबरोबर असलेले जवळचे संबंध भारतासाठी चिंतेची बाब ठरू शकतात. या निवडणुकीत भारत समर्थक मालदिवियन डेमोक्रॅटिक पार्टी चा सपशेल पराभव झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वीच मालदिव आणि भारत यांच्या संबंधात वितृष्ट आले आहे. काही दिवसांपूर्वी मुइज्जू यांनी भारतीय सैन्याला मालदीव सोडण्याचे आदेश दिले होते. मालदीवने भारताऐवजी चीनबरोबर आपली जवळीक वाढवली. त्यासाठी मुइज्जू यांनी पुढाकार घेतला होता. चीनधार्जिणे सरकार मालदीवमध्ये आल्यामुळे हिंद महासागर द्वीपसमूहातील चीनचा हस्तक्षेप वाढण्याची शक्यता आहे.

भारत आणि चीन या दोन्ही देशांनी हिंदी महासागरात आपला प्रभाव प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मालदीवबरोबर जवळचे संबंध ठेवले होते. दोन्ही देशांनी अलीकडच्या वर्षांत मालदीवमधील मोठ्या पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण प्रकल्पांसाठी अब्जावधी डॉलर्स गुंतवणूक केली. चीनशी जवळीक ठेवणारे सरकार मालदीवमध्ये आल्यामुळे भारताच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे.

गेल्या वर्षी सत्तेवर आल्यापासून, मुइज्जू यांनी मालदीवला चीनकडे झुकवताना भारतासोबतच्या दीर्घकालीन संबंधांकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यातच गेल्यावर्षी लक्षद्वीप प्रकरणावरुन भारताबरोबरच्या संबधात अधिकच तणाव निर्माण झाला. त्यानंतर मुइज्जू यांनी चीन दौरा केला व त्यांच्याकडून मोठी मदत मिळवली. मुइज्जू यांनी त्यांच्या कारकिर्दीत मालदीवचे भारतावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top