राऊतांनी इशारा खरा केला आता कॅसिनोचा व्हिडिओ

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चार दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊतील कॅसिनोमधील कथित फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी राऊत यांनी आपल्याकडे कॅसिनोचे आणखी फोटो-व्हिडिओ असल्याचे सांगितले होते. आज राऊत यांनी त्यातील एक व्हिडिओ शेअर करून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला.
या 6 सेकंदांच्या व्हिडिओत कुणीच व्यक्ती दिसत नसली तरी तो चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊतील कॅसिनो प्रकरणाशी संबंधित असावा, हे कुणीही ओळखू शकेल. विशेष म्हणजे या दुसर्‍या व्हिडिओवर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या एकाही नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही.
खा. संजय राऊत यांनी चार दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊमधील व्हेनेशियन हॉटेलातील कॅसिनोत जुगार खेळत असल्याचा फोटो शेअर करत, 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्री मकाऊमध्ये साडेतीन कोटी रुपये जुगारात उडवल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने केला होता. त्यावेळी संजय राऊत यांनी या कॅसिनोचे माझ्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडिओ असल्याचा दावाही केला होता. आपल्यावर चांगले संस्कार असल्याने हे फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध करणार नाही, असे राऊतांनी म्हटले होते. बावनकुळे यांनी हे आरोप फेटाळत मकाऊला कुटुंबासोबत रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना काढलेला हा फोटो असल्याची सारवासारव केली होती. तर भाजपने ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा एका समारंभातील हातात ग्लास घेतलेला फोटो प्रसिद्ध करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर संजय राऊत यांनी कॅसिनोचा आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आपल्याकडे असलेल्या मकाऊच्या उर्वरित फोटो-व्हिडिओंची झलक दाखवली.
राऊत यांनी शेअर केलेल्या नव्या व्हिडिओमध्ये, तोच मकाऊचा कॅसिनो दिसत आहे.आजूबाजूला अनेक लोक टेबल खुर्चीवर बसले आहेत. मात्र, या व्हिडिओत कुणाचाही चेहरा दिसत नाही. राऊतांनी यावेळीही कुणाचे नाव घेतलेले नाही. व्हिडिओसोबत अ‍ॅन इव्हिनिंग इन मकाऊ, मकाऊ की रातें, पिक्चर अभी बाकी है, ही कमेंट आहे. त्यामुळे राऊत आणखी व्हिडिओ त्यांच्याकडे असल्याचा इशाराच देत आहेत. हा व्हिडिओ त्यांनी महाराष्ट्र भाजप, देवेंद्र फडणवीस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांना टॅगही केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top