लासलगावात आजपासून कांदा लिलाव सुरु होणार

नाशिक

लासलगाव बाजार समितीचे लिलाव उद्यापासून सुरू होणार आहेत. याबाबत लासलगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. गेल्या सात दिवसांपासून लेव्ही प्रश्नावरून बंद असलेल्या लासलगाव बाजार समितीची काल बैठक पार पडली. यावेळी संचालक मंडळाने बैठकीत प्रचलित पद्धतीने लिलाव सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे.

सध्या कार्यरत असलेल्या व्यापाऱ्यांनी प्रचलित पद्धतीने लिलाव कामकाजात सहभागी व्हावे, असे आवाहन व्यापारी प्रतिनिधींना केले होते. शेतकरी हित विचारात घेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्या ८ एप्रिलच्या पत्रानुसार व्यापारी प्रचलित पद्धतीने सहभागी न झाल्यास पर्यायी व्यवस्था केली जाणार होती त्यामुळे ज्या परवानाधारक व्यापाऱ्यांना प्रचलित पद्धतीने लिलावात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी उद्यापासून लिलावात सहभागी व्हावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. व्यापारी सहभागी न झाल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल. दरम्यान लासलगाव बाजार समिती संचालक मंडळाने ज्या व्यापाऱ्यांनी परवान्यासाठी बाजार समितीकडे मागणी केल्या आहेत, त्यांना तात्काळ अनुज्ञाप्ती देण्यात येईल व वेळप्रसंगी विंचूर उपबाजार समितीच्या व्यापाऱ्यांना लिलाव प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येईल असेही बैठकीत ठरवण्यात आले. या बैठकीला बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, संचालक जयदत्त होळकर, संदीप दरेकर, डॉ. श्रीकांत आवारे, छबुराव जाधव, सोनिया होळकर महेश पठाडे, राजेंद्र बोरगुडे, प्रवीण कदम, बाळासाहेब दराडे, रमेश पालवे व सचिव नरेंद्र वाढवणे उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top