संसदेत पुन्हा 57 खासदारांवर कारवाई! शेतकऱ्यांवर बोलले! सुळे-कोल्हेही निलंबित

नवी दिल्ली- संसद घुसखोरी प्रकरणावरून लोकसभेत गोंधळ केल्याचा ठपका ठेवत आजही 49 लोकसभा खासदारांचे आणि 8 राज्यसभा खासदारांचे असे 57 खासदारांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत निलंबित केलेल्या खासदारांची संख्या 161 झाली आहे. आज निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर, सपा खासदार डिंपल यादव आणि राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठवला. तरीही त्यांना निलंबित करण्यात आल्याने त्यांनी ही सरकारची दडपशाही असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे.
संसद सुरक्षा भंग प्रकरणी गोंधळ घातल्यावरून सोमवारी 14 खासदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्यामध्ये लोकसभेच्या 13, तर राज्यसभेच्या एका खासदाराचा समावेश होता. तर काल 78 खासदारांचे निलंबन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये लोकसभेच्या 33 आणि राज्यसभेच्या 45 खासदारांचा समावेश होता. आजही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेतील सुरक्षेच्या मुद्यावरून घेरले. संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन निवेदन करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर 49 लोकसभा आणि 8 राज्यसभा खासदारांना निलंबित करण्यात आले. भारतीय संसदेच्या इतिहासात आजवर इतक्या खासदारांचे निलंबन कधीच झालेले नाही. त्यामुळे संसदेत आता विरोधी पक्षाचे 100 खासदारही उरलेले नाहीत. या कारवाईनंतर संतप्त खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन करत सरकारचा निषेध केला.
यावेळी एका खासदाराने उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल केल्याने आणखी नवा वाद ओढवला.
आपल्या निलंबनावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे संताप व्यक्त करत म्हणाल्या की, आम्ही फक्त संसदेच्या सुरक्षाभंगाच्या घटनेवर सरकारकडून उत्तर आणि सभागृहात चर्चा करण्याची मागणी करत होती. पण सरकार त्यापासून पळ काढत आहे. या चर्चेला निलंबनाचे उत्तर दिले. याशिवाय आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली म्हणून आम्हाला लोकसभेतून निलंबित केले. ही दडपशाही आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी आजपर्यंत आणीबाणी ऐकली होती. मात्र आता आणीबाणी अनुभवत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लावली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याने ही निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी संसदेत करण्यात आली असता आमच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. संसदेत सांगून जर सरकारला ऐकू येत नसेल तर यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.
या कारवाईने निलंबित खासदार आक्रमक झाले. त्यांनी संसद परिसरातील मकरद्वार येथे ठिय्या मांडला. यावेळी तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा सभापती जयदीप धनखड यांची नक्कल केली. काँग्रेसचे राहुल गांधी यांनी त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये हशा पिकला. याचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोबाईल फोनवर चित्रीकरण केले. या घटनेवरून राज्यसभा सभापती जगदीप धनखड संतापले. ते म्हणाले की, मी नुकतेच एका टीव्ही चॅनलवर पाहिले की, एक खासदार अध्यक्षांची खिल्ली उडवत होता आणि तुमचा एक मोठा नेता त्याचा व्हिडिओ बनवत होता. त्यांना बुद्धी मिळो, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. अध्यक्षपद वेगळे आहे. राजकीय पक्ष एकमेकांच्या बाजूने किंवा विरोधात सामना करू शकतात. मात्र सभापतींना यापासून दूर ठेवले पाहिजे. खासदार निलंबन प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पत्र लिहिले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, मला असेही समजले आहे की, जे सदस्य त्या सगळ्या गोंधळात नव्हते. त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की, संसदीय कामकाज पद्धती व लोकशाही मूल्य अबाधित राखण्यासाठी आपण या प्रकरणात लक्ष घालावे. केंद्र सरकारने या सगळ्या प्रकारावर स्पष्टीकरण तर दिले नाहीच. उलट सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करणाऱ्या खासदारांवरच निलंबनाची कारवाई केली. हे सगळे खेदजनक आहे.
विरोधकांचा घुसखोरांना पाठिंबा – मोदी
भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले की, घुसखोरांना समर्थन म्हणून विरोधक असे वागत आहेत. त्यांचे वर्तन निराशाजनक आहे. नुकत्याच झालेल्या तीन राज्यांतील निवडणुकांच्या पराभवाने ते हताश आहेत. त्यामुळे ते याला राजकीय रंग देत आहेत. ही गोष्ट चिंताजनक आणि निंदनीय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top