2008 Rail Recruitment Case – Raj Thackeray Gets Clean Chit – 2008 मधील रेल्वे भरती आंदोलन व परप्रांतीयांना मारहाण केल्याच्या प्रकरणात ठाणे न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पुरावा सादर करण्यात कसूर केल्याने राज ठाकरेंसह सातही आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे. सगळेच निर्दोष असतील तर परप्रांतीय उमेदवारांवर हल्ला नेमका कोणी केला, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहिला आहे.
या निकालाबाबत बोलताना राज ठाकरे यांचे वकील म्हणाले की, आरोपी क्रमांक 1 ते 7 यांच्यावर उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केल्याचा आरोप होता. मात्र त्यांच्याविरोधात ठोस आणि सबळ पुरावे न्यायालयात सादर करण्यात अपयश आले. केवळ ओळखपत्र सापडल्याच्या आधारावर कोणाला मनसे कार्यकर्ता म्हणता येणार नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले. राज ठाकरे यांच्याविरोधात मुख्य आरोप होता की, त्यांच्या कथित चिथावणीखोर भाषणामुळेच हा हिंसाचार घडला.
मात्र, हे सिद्ध करण्यासाठी सादर करण्यात आलेली सीडी न्यायालयाने ग्राह्य धरली नाही. कारण त्या डिजिटल पुराव्यासोबत आवश्यक असलेले 65 बी प्रमाणपत्र सादर करण्यात आले नव्हते. त्यामुळे त्या सीडीला कोणतीही कायदेशीर किंमत देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याशिवाय, परप्रांतीय विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते, हा दावा देखील सिद्ध करता आला नाही.
या सर्व कारणांमुळे न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.मागील सुनावणीदरम्यान 13 मे रोजी राज ठाकरे न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या विरोधातील सर्व आरोप फेटाळून लावत, माझा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही, आंदोलनावेळी मी नाशिकला होतो, असे सांगितले होते. आजच्या अंतिम निकालात न्यायालयानेही पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयामुळे राज ठाकरे यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.
2008 मध्ये कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या परप्रांतीय उमेदवारांवर हल्ला केल्या प्रकरणी राज ठाकरेंसह मनसेच्या आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यापैकी एका आरोपीचा खटला सुरू असतानाच मृत्यू झाला. तब्बल अठरा वर्षांनंतर या प्रकरणाचा अंतिम निकाल लागला. त्यात राज ठाकरेंसह सगळे निर्दोष ठरले.










