Home / News / ‘Cockroach Party’ Account Blocked : दोन दिवसांत दीड कोटी तरुणाईने तुफान प्रतिसाद देताच‘कॉकरोच जनता पार्टी’चे अकाऊंट भारतात बंद केले! संतापाची लाट

‘Cockroach Party’ Account Blocked : दोन दिवसांत दीड कोटी तरुणाईने तुफान प्रतिसाद देताच‘कॉकरोच जनता पार्टी’चे अकाऊंट भारतात बंद केले! संतापाची लाट

‘Cockroach Party’ Account Blocked – बेरोजगार, आळशी तरुण झुरळाप्रमाणे संस्थांवर हल्ला करतात असे वक्तव्य भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केले...

By: Team Navakal
‘Cockroach Party’ Account Blocked
Social + WhatsApp CTA


‘Cockroach Party’ Account Blocked – बेरोजगार, आळशी तरुण झुरळाप्रमाणे संस्थांवर हल्ला करतात असे वक्तव्य भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केले असल्याचे वृत्त पसरले आणि तरुणाई भडकली. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी लगेचच आपण त्या अर्थाने बोललो नव्हतो असे स्पष्ट केले. मात्र तोपर्यंत ‘झुरळ’ अर्थात कॉकरोच ट्रेंडिंग झाले. त्यातूनच अमेरिकेत शिक्षण घेणार्‍या अभिजित दिपके याने माणसाला झुरळाचा चेहरा लावून एक्स अकाऊंटवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ सुरू केली आणि म्हणता म्हणता दोन दिवसांत दीड कोटी भारतीय त्याचे सभासद झाले.

या पार्टीने भाजपाला मागे टाकले. आता अभिजित ही चळवळ पुढे कशी नेतो यावर सर्व स्तरात उत्सुकता असतानाच एक्स वरील त्याचे अकाऊंट बंद करण्यात आले. यामुळे तरुणाई अधिकच संतापली असून, अभिजितने तातडीने सुरू केलेले ‘कॉकरोच इज बॅक’ या अकाऊंटवर उड्या पडल्या.
मूळचा हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथील मराठी तरुण अभिजित दीपके म्हणाला की, आम्ही काही नियोजन करून हा पक्ष स्थापन केलेला नाही, ही एक अपघाताने निर्माण झालेली डिजिटल चळवळ आहे. पक्षाचे घोषवाक्य ‘धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी’ असे ठेवण्यात आले.

https://cockroachjantaparty.org/join या लिंकच्या माध्यमातून त्यांनी सदस्य होण्याचे आवाहन युवकांना केले. वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर अचानक ‘कॉकरोच जनता पार्टी’चे अधिकृत ‘एक्स’ अकाऊंट भारतात ब्लॉक करण्यात आले. अकाऊंटवर ‘अकाऊंट विथहेल्ड’ असा संदेश दिसू लागला आणि त्यावरील सर्व मजकूर हटवण्यात आला. या कारवाईमागील अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही.

अभिजित दीपके यांनी आरोप केला की, आधी त्याच्या अकाऊंटला हॅक करण्याचे प्रयत्न झाले, वारंवार पासवर्ड रिसेटचे संदेश येत होते आणि ते अयशस्वी झाल्यानंतर अकाऊंट थेट बंद करण्यात आले. आम्ही काही चुकीचे बोललो नव्हतो. आम्ही फक्त प्रश्न विचारत होतो. आम्ही नीट प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागत होतो. मग आमचे अकाऊंट का बंद केले? आमची लोकप्रियता वाढत होती. त्यामुळे हे पाऊल उचलले गेले. दरम्यान, याआधी हिंदुस्थान भाऊचे देखील सोशल मीडिया बंद केले होते.

कोरोना काळात दहावीची परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार होती. मात्र उद्धधव ठाकरे सरकारने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. याविरुध्द हिंदुस्तान भाऊने सोशल मीडियावर आवाहन केले आणि विद्यार्थी प्रतिसाद देत रस्त्यावर उतरले. नंतर भाऊला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि हे आंदोलन थंडावले. ‘कॉकरोच जनता पार्टी’ केवळ एक इंटरनेट ट्रेंड म्हणून राहणारा आहे की, ती कालांतराने एक मोठी राजकीय चळवळ बनेल, पक्षात रुपांतर होईल हे काळच ठरवेल.

‘कॉकरोच पार्टी’चा जाहीरनामा


कॉकरोच पार्टी जाहीरनामा सध्या चर्चेत असून, न्यायव्यवस्था, निवडणूक प्रक्रिया, महिला सक्षमीकरण, माध्यम स्वातंत्र्य आणि पक्षांतर यांसारख्या मुद्यांवर आक्रमक भूमिका घेणार आहे. महिलांसाठी संसदेत 50 टक्के आरक्षण आणि केंद्र-राज्य मंत्रिमंडळातही महिलांना 50 टक्के प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पक्षांतर रोखण्यासाठी पक्ष बदलणार्‍या आमदार-खासदारांना 20 वर्षे निवडणूक लढवण्यास व सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे.

माध्यम स्वातंत्र्याच्या मुद्यावर अंबानी आणि अदानी समूहांच्या माध्यम संस्थांचे परवाने रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून, काही पत्रकारांच्या बँक खात्यांची चौकशी करण्याचीही भूमिका मांडली आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी मतदानाचा हक्क हिरावून घेणे हा गंभीर गुन्हा ठरवण्याचा प्रस्ताव आहे. सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर कोणतेही राजकीय पद किंवा लाभ देऊ नये, अशी मागणीही जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.

अभिजित दीपके कोण?


अभिजित दीपके ‘कॉकरोच जनता पार्टी’चा संस्थापक असून, तो मूळचा महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या गावचा आहे. त्याने पुण्यात ब्रॉडकास्ट जर्नलिझमचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या तो अमेरिकेत बोस्टन विद्यापीठात जनसंपर्क (पब्लिक रिलेशन्स) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. अभिजित दीपके हा पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट म्हणूनही काम करतो. राजकीय नॅरेटिव्ह तयार करणे, सार्वजनिक संवाद घडवणे आणि डिजिटल माध्यमांद्वारे जनमतावर प्रभाव टाकणे या क्षेत्रात त्याचा अभ्यास आणि अनुभव आहे.

सोशल मीडिया, विशेषतः मीम्स आणि डिजिटल कॅम्पेनच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यात त्याचा विशेष हातखंडा आहे. 2020 ते 2023 या काळात त्याने आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणून शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात काम केले. दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 दरम्यान त्याने मीम-आधारित डिजिटल प्रचारात सक्रिय भूमिका बजावली होती. त्या काळात ‘देश के गद्दारों को, गोली मारो सालों को’ या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून ‘देश के गवारों को, स्कूल भेजो सारों को’ हा सोशल मीडिया कॅम्पेन राबवण्यात आला होता. त्यामध्येही त्याचा सहभाग होता. या डिजिटल मोहिमेला तरुण मतदारांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याचे मानले जाते.


Web Title:
संबंधित बातम्या