22 वर्षांनी पुन्हा संसदेवर दहशतवादी हल्ल्यासारखाच थरार! दोन तरुणांच्या सभागृहात उड्या! पिवळा गॅस सोडला

नवी दिल्ली- देशाच्या संसदेवर 13 डिसेंबर 2001 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखाच थरार 22 वर्षांनी आज 13 डिसेंबरलाच संसदेत पाहायला मिळाला. दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभा सभागृहात उडी मारली आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत एक तरुण अध्यक्षांच्या दिशेने निघाला. त्याने मधेच बूट काढून त्यातून स्मोक कँडलने पिवळ्या रंगाचा गॅस सोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या तरुणांना खासदारांनी घेरून पकडले आणि बेदम मारहाण करीत सुरक्षा दलाच्या ताब्यात दिले. याचवेळी संसदेबाहेरही एका महिलेसह दोघांनी असाच प्रकार केला. त्यांनाही ताब्यात घेतले. बेरोजगारीच्या विरोधात सहा जणांनी हे आंदोलन केले. मात्र या तरुणांच्या आंदोलनाने संसद हादरली. या आंदोलकांमधील एक महाराष्ट्राच्या लातूरचा होता.
संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात नऊ जण शहीद झाले होते. या शहिदांना आज स्मृतीदिनी सकाळी खासदारांनी श्रद्धांजली वाहिली. लोकसभेचे कामकाज सुरू असताना दुपारी 12 वाजता अचानक दोन तरुण प्रेक्षक गॅलरीतून पिलरच्या सहाय्याने खाली येत उडी मारून सभागृहात आले. त्यातला एक तरुण खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत पुढे पुढे जाऊ लागला. त्याने नंतर त्याचा बूट काढला आणि सभागृहात पिवळ्या रंगाचा धूर पसरला. ‘तानाशाही बंद करो’ अशा घोषणा तो देत होता. सर्व खासदार या अचानक घडलेल्या घटनेने आधी बिथरले. पण नंतर खासदारांनी त्या तरुणाला घेरण्याचा प्रयत्न केला. त्याला चहूबाजूंनी घेरत पकडले आणि चोप दिला. त्याच्यामागून सभागृहात उतरलेल्या दुसऱ्या तरुणाला उतरल्या उतरल्याच तिथल्या बाकावर असलेले खासदार कोटक यांनी पकडले. त्याच्याजवळही स्मोक कँडल होती. मनोरंजन डी. आणि सागर शर्मा अशी या दोन तरुणांची नावे आहेत. त्यांना सुरक्षा रक्षकांनी तत्काळ अटक केली. याच वेळी संसदेच्या आवारातही एक तरुणी आणि एका तरुणाने असाच धूर करत घोषणाबाजी केली. अमोल धनराज शिंदे आणि नीलम सिंह अशी या दोघांची नावे आहेत. त्यांनाही तत्काळ अटक करण्यात आली. यापैकी नीलम सिंह ही तरुणी तिला पकडून घेऊन जाताना म्हणत होती की, आम्ही बेरोजगार, विद्यार्थी आहोत. आमचा आवाज दाबला जातो, आमच्या प्रश्नांची कोणी दखल घेत नाही. तिने भारत माता की जय… तानाशाही बंद करो… जय भीम, जय भारत…अशा घोषणाही दिल्या. हा प्रकार घडताच संसदेचे कामकाज काही वेळ थांबवण्यात आले. या पिवळ्या धुरातून जळाल्यासारखा वास येत होता, असे खासदारांनी सांगितले.
संसदेत घुसून गोंधळ घातलेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली तर अन्य दोन फरार आहेत. अटक केलेल्या चौघा तरुणांपैकी संसद भवनाबाहेर अटक झालेला अमोल धनराज शिंदे हा महाराष्ट्रातील लातूरचा विद्यार्थी आहे. तो चाकूरच्या थोरली झरी गावचा रहिवासी आहे. तो 12 वी शिकलेला बेरोजगार तरुण आहे. त्याचा भाऊ पनवेल येथे रिक्षा चालवतो. त्याचे आईवडील मजुरी करतात. त्याच्यासह अटक केलेली नीलम सिंह आझाद ही 37 वर्षांची महिला हरियाणातील जिंद जिल्ह्यातली घासो गावची रहिवासी आहे. तिच्या वडिलांचे मिठाईचे दुकान. डाव्या विचारसरणीची नीलम हरियाणा स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. नीलम याआधी 2020-21 मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाच्या वेळीही तिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नंतर काही तासांनी तिची सुटका झाली होती. सभागृहात गोंधळ घालणारे सागर शर्मा आणि मनोरंजन डी. हे तरुण भाजपा खासदार उदय प्रताप सिंह यांच्या पासवर हे प्रेक्षक गॅलरीत आले होते. हे चौघेही एकमेकांच्या दीर्घकाळपासून संपर्कात असल्याची माहितीही चौकशीतून पुढे आली. चौघेही फेसबुकवरून एकमेकांच्या संपर्कात आले आणि काहीतरी मोठे करण्याच्या हेतून त्यांनी हा प्रकार केल्याचे ते सांगत आहेत, पण त्यांच्या या माहितीवर सुरक्षा यंत्रणांचा विश्वास नाही. मनोरंजन डी. गेल्या तीन महिन्यांपासून संसद भवनात पाससाठी खेटे घालत होता. मनोरंजनच्या वडिलांनी सांगितले की, तो दोन दिवसांपासून आमच्या संपर्कात नव्हता. हे सर्वजण गुरुग्राम सेक्टर 7 मध्ये ललित झाच्या घरी राहिले होते. सागर शर्मा हा लखनौ येथे राहणारा आहे. त्याच्या घरीही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सागर दोन वर्षे बंगळुरूत राहत होता आणि ऑगस्ट 2023 मध्ये पुन्हा लखनौत परतला होता. या आंदोलनाच्या कटात ललित झा यासह सहा जण सामील होते. ललित झा याच्याकडे इतर सर्व जणांचे मोबाईल होते. ललित झा फरार आहे. दरम्यान, गुरुग्राममधील ज्या घरी सर्व आरोपी राहिले होते, त्या घराचे घरमालक विक्की शर्मा आणि त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
या तरुणांचा हा सर्व गोंधळ घालण्यामागचा हेतू काय होता, त्यांना कोणी पाठवले होते का, या चौघांनी सुरक्षा यंत्रणा भेदून जो प्रकार केला तो अन्य कोणत्या मोठ्या कटाचा भाग होता का, या सर्व प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांची चौकशी सुरू आहे. याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, चौघांनाही अटक केली. त्यांच्याकडील वस्तू जप्त केल्या आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी सुरू आहे. संसदेचे पास रद्द करण्याचे आदेशही बिर्ला यांनी दिले. सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल सिंह आणि फॉरेन्सिक टीमही नंतर संसद भवनात दाखल झाली होती. संसदेच्या आवारात चोख बंदोबस्त असतो. अधिवेशन काळात तर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. संसदेचे काम पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरीत जाणाऱ्या विद्यार्थी आणि अन्य लोकांकडील सर्व वस्तू बाहेर ठेवायला सांगितल्या जातात. असे असतानाही हे दोन तरुण ही सुरक्षा व्यवस्था भेदून कसे गेले, त्यांच्याकडील धुराची नळकांडी विषारी असती तर काय झाले असते असे अनेक प्रश्न आणि सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या त्रुटी यानिमित्ताने पुढे आल्या आहेत. सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सायंकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली.
संसदेवरील पहिला हल्ला
संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या घटनेला आज 22 वर्षे पूर्ण झाली. आजच्या दिवशी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना पांढऱ्या ॲम्बेसेडर कारचा वापर करीत संसदेत अतिरेकी घुसले आणि त्यांनी ए.के.47 ने अंधाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात संसदेची सुरक्षा करणारे कर्मचारी आणि दिल्ली पोलीस असे एकूण नऊ जण शहीद झाले तर 15 जण जखमी झाले होते. या हल्ल्याप्रकरणात प्रमुख दहशतवादी मोहम्मद अफझल गुरु याला 9 फेब्रुवारी 2013 रोजी फाशी देण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top